ठाणे : ठाण्यात एका पॅकबंद चॉकलेट आईस्क्रीम कोनमध्ये किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी अन्न सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत उत्पादन करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. (Thane Viral Video)
मिळालेल्या माहितीनुसार, एक लहान मुलगा चॉकलेट आईस्क्रीम कोन खात असताना त्याला आईस्क्रीममध्ये काहीतरी वेगळे दिसले. बारकाईने पाहिल्यानंतर त्यामध्ये किडा असल्याचे लक्षात आले. यानंतर कुटुंबीयांनी संपूर्ण आईस्क्रीम तपासले असता त्यामध्ये भला मोठा किडा असल्याची खात्री झाली. या सदर घटनेनंतर कुटुंबियांमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असून अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मुलाच्या काकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून अशा प्रकारची उत्पादने खाणाऱ्या सर्वांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. अशा निष्काळजीपणामुळे सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
घटनेनंतर तात्काळ कुटुंबियांनी दुकानदाराशी संपर्क साधला आणि याची माहिती दिली. मात्र, दुकानदाराने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधित कंपनी आणि अन्न सुरक्षा विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि पॅकेजिंग प्रक्रियेतील स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः मुलांकडून मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ तयार करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नेमके कारण समोर येणार आहे.
इनडिजिटल मराठी या इन्स्टाग्राम अकाऊटवरून या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.