- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड
शिक्षकांसाठी त्यांचे विद्यार्थी ही त्यांची मुलेच असतात. शिक्षक आपल्या मुलांवर जसे प्रेम करतात; तसेच त्यांच्या विद्यार्थी असलेल्या मुला-मुलींवरही प्रेम करतात. उदयाचल ही माझी पहिली शाळा. आशिया खंडात तिला नाव होतं. लौकिक होता. इथे मुलांना जीवनविद्या शिकविली जाई. स्वतंत्र भारताचे ताठकण्याचे नागरिक म्हणून त्यांना तयार केले जाई.
एखादी चाचणी परीक्षा म्हणजे एखादे नवे पर्व समजले जाई. अतिशय काटेकोरपणे परीक्षण-निरीक्षण चाले. जे विद्यार्थी नापास होत त्यांना तीन तीस ते पाच या वेळात वैयक्तिक शिक्षण दिले जाई. त्यासाठी शिक्षक परिश्रम घेत.
एखादी केस बिकट असेल, तर त्यावेळी गोदरेज कंपनीत काम करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची मदत घेतली जाई. तेही तत्परतेने मदत करीत असत.
एकदा चाचणी परीक्षा चालू असताना एक मुलगा मागच्या मुलीला सहज दिसेल असा पेपर लिहीत बसला होता. ती मुलगीही भराभरा त्याचा पेपर पाहून आपल्या पेपरात तोच मजकूर उतरवून काढीत होती.
मी निरीक्षक म्हणून त्या वर्गावर सुपरविजन करीत होते. “का रे तू असा बसला आहेस?” मी त्याला विचारले. “तिला पेपर दिसावा म्हणून” “अरे, पण का? ही चाचणी परीक्षा आहे.” “बाई, तिची आई सावत्र आहे. तिला छळते.” “अभ्यास करू देत नाही.” “हे तुला कसं कळलं?” “मी तिच्या शेजारीच राहतो. बाई, ती परीक्षेत नापास झाली तर तिला घरून वडिलांचा नि वडील कामावर गेले की आईचा मार पडेल. मी पाहतो ना! पण काही करू शकत नाही. दुसऱ्याच्या भानगडीत पडायचे नाही, अशी आईची शिकवण आहे.” माझ्या पोटात तुटले. गरीब बिच्चारी पोरं! मी डॉ. आनंद नाडकर्णी यांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यांना शाळेत बोलावले. केस समजून सांगितली. “आपण निश्चित मदत करू.” डॉ. नाडकर्णी यांनी शब्द दिला. “लवकरात लवकर तिच्या घरी जाऊ. दोघेही जाऊ. तुम्ही सुपरवायझर आहात, मी कंपनीत डॉक्टर म्हणून काम काम करतो. आईला वचक बसायला तेवढे पुरेसे आहे.” डॉ. नाडकर्णी आणि मी लवकरच पत्ता काढून अचानक तिच्या घरी पोहोचलो. गोदरेज कंपनी कामगारांना क्वार्टर्स राहायला देते. हे कित्येकांस माहीत आहे. त्यांचे भाडेही अगदी अल्प असते. ही नवलशेठची सारी कृपा. आपले कामगार ही आपली मुले आहेत अशी धारणा बाळगणारा मालकवर्ग! असे शेठ मिळणे आता दुरापास्त आहे. मुलगी जात्यावर दळत होती. “मिक्सर नाहीये का घरी?” मी विचारले. “आहे ना! पण बिघडलाय.” आई गडबडली. मुलगी सरळ न घाबरता उठली आणि तिने मिक्सर चालू केला. “ठाकठीक तर आहे मिक्सर.” “तिला दळायची प्रॅक्टिस देत होते.” आई बोलायचे म्हणून बोलली. “हे बरोबर नाही.” डॉक्टर म्हणाले. “कंपनीत कळवतो सगळे. प्लॅट इनचार्जला सांगतो. मग नोकरी जाईल. मग कुठल्या क्वार्टर्स आणि कसलं काय !” आई घाबरून गेली. डॉक्टरांचे हात हाती घेतलंन. मग म्हणाली, “चुकले डाॅक्टर.” “तिची आई लवकर गेली, हा तिचा दोष आहे का?” मी तिच्या खांद्यावर हात ठेवला “उद्या मोठी झाली की तिचे लग्न होईल. ती सासरघरी जाईल. पण प्रेमाचं माहेरपण बिचारी उपभोगू शकणार नाही. तिला माहेरी यावेसेचं वाटणार नाही. एकटीच सासरघरी राबत राहील. यात तुला मोठेपणा वाटतो का गं माऊली? अगं, तू पण उद्या कोणाची तरी माय होशील ! त्या लेकराशी तू असाच व्यवहार करशील का गं?” माझ्या डोळ्यांत पाणी आलं तशी माऊली गहिवरली.
“चुकले बाई.” ती रडत म्हणाली. “खरंच चुकले बाई.” त्याक्षणी तिला वाटणारा पश्चाताप खूप खरा होता. “हे बघ, आपण शक्यतो छान वागावं, छान बोलावं. नुसतं टापटीप राहाणं म्हणजे जगणं नव्हे. मी तिला घेऊन जाऊ का? माझ्या घरी प्रेमाने वाढवीन. शपथ सांगते. तिला माझ्या मुलांसारखे प्रेम देईन.”
“चुकले बाई मी ! शपथ घेते. यापुढे खूप चांगली वागेन. न बोलता, न रागावता प्रेमाने व्यवहार करेन” ती रडत रडत म्हणाली. मी तिला प्रेमाने जवळ घेतले. “आमचे कामगार नि त्यांची कुटुंबे ही आमचीच जवळची माणसे असतात गं!” मी गहिवरले. ते घर सुधारले मित्रांनो !






