Saturday, May 30, 2026

सरकारी बंगला सोडण्यास राबडी देवींचा नकार

सरकारी बंगला सोडण्यास राबडी देवींचा नकार

पाटणा : बिहार सरकारने माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना त्यांचा सरकारी बंगला '१० सर्कुलर रोड' खाली करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र राबडी देवी यांनी हा बंगला खाली करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना राबडी देवी यांनी बिहार सरकारला थेट आव्हान दिले आहे. तसेच ‘कितीही फोर्स बोलवा, कोणत्याही परिस्थितीत आपला बंगला खाली करणार नाही’, असे सांगितले. राबडी देवी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एक नवीन वाद सुरू झाला आहे.राबडी देवी आपला नातू इराजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पाटण्याला परतल्या होत्या. विमानतळावर पत्रकारांनी सरकारी बंगला खाली करण्याच्या आदेशाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सम्राट चौधरींनी कितीही फोर्स बोलावून बंगला खाली करण्याचा प्रयत्न केला तरी मी बंगला खाली करणार नाही’.

राबडीदेवींच्या सरकारी बंगला प्रकरणावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

जे नियम आहेत, त्यांचे पालन करावं लागेल. सर्व कामं कायद्यानुसारच होतात आणि सर्वच लोकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. - बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी

राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत, त्यांनी असं विधान करायला नको होतं. यासाठी बिहार पोलिसांचीही गरज नाही, एक अधिकारी जाऊन बंगला खाली करून घेईल. - भाजप राज्यसभा खासदार भीम सिंह

हे काही जंगलराज नाही, इथे कायद्याचे पालन करावेच लागेल. उपचारासाठी सिंगापूरला जातात, नातवाचा वाढदिवस साजरा करायला दिल्लीला जातात आणि जेव्हा लुटण्याची वेळ येते तेव्हा बिहारमध्ये पळून येतात. हे सर्व आता चालणार नाही, कायद्याचा आदर करावाच लागेल. लालू कुटुंबियांनी अखेर ‘१० सर्कुलर रोड’च्या बंगल्यात असा कोणता खजिना लपवून ठेवला आहे? जर तिथे खजिना लपवलाही असेल, तर बिहार पोलीस तो शोधून काढतील. - नीरज कुमार, भाजप प्रदेश प्रवक्ते

Comments
Add Comment