Friday, August 21, 2026

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक सुरक्षा व्यवस्थेत तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले. इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात पाठवण्यास योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. (Imran Khan)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांना रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यांच्या रुग्णालयातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी रुग्णालय तसेच आसपासच्या परिसरात बंदोबस्त ठेवला होता. (Imran Khan Hospital)

इम्रान खान यांच्या आगमनापूर्वी रुग्णालयात सुरक्षा आणि इतर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली होती. इस्लामाबादचे पोलीस प्रमुख सय्यद अली नासिर रिझवी यांनी रुग्णालयाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांच्या सुरक्षेसाठी 800 हून अधिक जवान तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधानांना पुढील दोन दिवसांत शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्याचे आदेश दिले होते. तसेच कुटुंबीयांना आठवड्यातून एकदा त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

इम्रान खान हे 5 ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. तोशाखाना प्रकरणासह भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अल-कादिर ट्रस्टशी संबंधित 190 दशलक्ष पाऊंडच्या प्रकरणात त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तुरुंगात असताना इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीय आणि पक्षातील नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर त्यांना पुन्हा अदियाला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >