Tuesday, May 26, 2026

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी; महायुतीला विकासाची नवी ऊर्जा

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी;  महायुतीला विकासाची नवी ऊर्जा

मुंबई : " प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या यशस्वी नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी सुरू झाली असून विकसित भारताच्या संकल्पनेला देशातील १४० कोटी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासह महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून महायुती सरकारलाही विकासाची नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे," असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त त्यांनी अभिनंदनपर संदेश जारी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ सत्तेचा प्रवास नसून राष्ट्रसेवेच्या अखंड तपश्चर्येचा आदर्श आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून सलग १२ वर्षे अशी २५ वर्षांची त्यांची सार्वजनिक जीवनातील कारकीर्द देशाच्या राजकीय इतिहासात प्रेरणादायी ठरली आहे. निष्कलंक कारकीर्द, अथक परिश्रम आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांनी भारताला नव्या उंचीवर नेले आहे. स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार, चांद्रयान मोहिमेचे यश तसेच राम मंदिर उभारणीसारख्या ऐतिहासिक घडामोडींमुळे देशाच्या प्रगतीला नवे आयाम मिळाले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा महाराष्ट्रालाही मोठा लाभ झाला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, गुंतवणूक, औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला गती मिळाली असून महायुती सरकारला विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्र विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत २०४७ ही संकल्पना आता जनआंदोलन बनत असून भारत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. अमृतकाळातील ही परिवर्तनाची वाटचाल देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद असल्याचेही शिंदे यांनी म्हटले.

शिवसेना आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या त्यांच्या नेतृत्वाला भविष्यातही यश लाभो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >