मुंबई : राज्याची 'आयटी' राजधानी असलेल्या पुण्यात ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'अग्रेको इंडिया' कंपनीकडून ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून पुण्यात अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारण्यात येणार असून, याद्वारे पुढील दहा वर्षांत सुमारे एक हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी राज्य शासन आणि अग्रेको इंडिया यांच्यात या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या करारप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख, व्यापार सल्लागार मार्क बिरेल आणि वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
"पुणे हे आता 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'चे (जीसीसी) अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या 'जीसीसी कॅपिटल'मध्ये अग्रेको कंपनीचे स्वागत आहे. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात या कंपनीला अत्यंत उत्कृष्ट आणि पोषक कार्यपरिसर मिळेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, पुणे येथील प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, नोंदणी आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजुरा येथील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार ...
स्कॉटलंडबाहेरील सर्वात महत्त्वाचे केंद्र
अग्रेको इंडिया ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रात कार्यरत आहे. आज झालेल्या करारानुसार, पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे कंपनीतर्फे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे काम याच वर्षाच्या मध्यावर सुरू होणार असून, विशेष म्हणजे स्कॉटलंडबाहेर उभारले जाणारे हे अग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक केंद्र ठरणार आहे.
एमएसएमई उद्योगांना मोठा फायदा
या प्रकल्पामुळे केवळ थेट रोजगारच निर्माण होणार नाही, तर स्थानिक पुरवठा साखळीलाही मोठी चालना मिळणार आहे. पुण्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची सुवर्णसंधी यामुळे उपलब्ध होईल. याशिवाय अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि 'प्रिसिजन इंजिनिअरिंग' क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे.
नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याने फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मोहिमेला शानदार सुरुवात केली. ...
शाश्वत तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर
अग्रेको कंपनीचा या प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर असणार आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासाठी कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जातील. राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा प्रणालींच्या प्रसारासाठीही शासनाला सहकार्य करण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे.






