Friday, May 8, 2026

कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला आहे. बारावीच्या निकालातील यशाची परंपरा जपत, दहावीतही ९७.६२ टक्के निकालासह कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राज्यातील नऊ मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली असली, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी (८८.४१ टक्के) लागला आहे. कोल्हापूर ९५.४७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी असून, मुंबई (९४.९७ टक्के) आणि पुणे (९४.२४ टक्के) यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे. मुलींचे वर्चस्व कायम

यंदाही निकालात 'लेकी' सरस ठरल्या आहेत. परीक्षेला बसलेल्या ७ लाख २२ हजार ४५ मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८ लाख २० हजार ४२७ मुलांपैकी ८९.५६ टक्के मुले यशस्वी झाली. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.

विभागनिहाय निकाल

• कोकण : ९७.६२% • कोल्हापूर : ९५.४७% • मुंबई : ९४.९७% • पुणे : ९४.२४% • नाशिक : ९०.५३% • अमरावती : ९०.५०% • नागपूर : ८९.०७% • लातूर : ८८.४२% • छत्रपती संभाजीनगर : ८८.४१% श्रेणीसुधारसाठी तीन संधी

ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मंडळाने 'श्रेणीसुधार/गुणसुधार' योजना उपलब्ध करून दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा आगामी तीन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी दिली जाणार आहे.दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर दिला. ते म्हणाले, "एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही केवळ पहिली पायरी आहे. ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता फेरपरीक्षेच्या संधीचा लाभ घ्यावा, शासन आपल्या पाठीशी आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा