स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर
नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे नीटच्या परीक्षेचं पेपरफुटीचं प्रकरण घडून गेलं आहे. विद्यार्थ्यांना दावणीला बांधणाऱ्या या परीक्षापद्धती, विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांच्या मनोबलाची आणि संयमाची परीक्षा बघणाऱ्या ठरत आहेत. पुढील करिअरची नांदी ठरणाऱ्या नीट, जेईई या परीक्षांभोवती असणारं प्रतिष्ठेचं वलय, प्रचंड स्पर्धा, प्रवेशासाठी असणारी रस्सीखेच बाजारीकरण या सगळ्या प्रवाहात भरडला जात आहे तो, देशाचं उद्याचं भवितव्य असणारा विद्यार्थी. त्यात भरीस भर म्हणून की काय सामजिक प्रतिष्ठेपायी पालकांकडून मार्कांना दिल्या जाणाऱ्या अवाजवी महत्त्वामुळे विद्यार्थ्यांच्या उपजत आवडीनिवडी, उर्मी अनेकदा मारल्या जातात. मग यातून विद्यार्थ्यांना येणारे नैराश्य, नैराश्यातून उचलली गेलेली चुकीची पावलं अशा बातम्या सर्रास आपल्या कानावर येत राहतात.
आज करिअरच्या अनेक संधी उपलद्ध असतानाही परीक्षेतील गुण म्हणजे जणू काही अंतिम व शेवटचा पर्याय आहे, हा समाजातील दृष्टिकोन आजही बदलत नाही आहे. यशाची परिभाषा केवळ मार्कांच्या तराजूत तोलली जाते, तिथेच आपण देश घडवणाऱ्या तरुण पिढीच्या मनोबलाचं खच्चीकरण करत असतो. दिव्याचा शोध लावणाऱ्या एडिसनचेही ९९९ प्रयोग फसले होते आणि मग त्याच्या पदरी यश पडलं होतं. यावर हा प्रतिभाशाली शास्त्रज्ञ म्हणतो ‘‘मी ९९९ वेळा अपयशी नाही झालो, तर मी यशस्वी का होत नाहीये याची मला ९९९ कारणं सापडली. ” अपयशाला सामोरं जाताना आपल्याला हवी आहे सकारात्मक दृष्टी आणि ही सकारात्मक दृष्टी आजच्या पिढीकडे येण्यासाठी गरज आहे ती कुटुंब, शिक्षण आणि समाज या तिन्ही व्यवस्थांच्या सामूहिक प्रयत्नांची!
यश मिळवण्याचे मूलमंत्र... जिंकण्यासाठी काय करावे... अशा मोटिवेशनल व्याख्यानांची... मार्गदर्शनाची आजच्या पिढीला गरज आहेच. पण आजच्या काळात वाढत्या स्पर्धेला तोंड देणाऱ्या आजच्या पिढीला तितकीच गरज आहे ती, अपयश आल्यास त्या अपयशाला आपण सामोरं कसं जायचं... नैराश्याच्या गर्तेत न सापडता प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग कसा काढायचा या संदर्भातल्या मार्गदर्शनाची!
खरं म्हणजे ‘३९ यश आणि ३९ कशाला म्हणावं निअपयश’ ३९; कशाला म्हणावं याचे ठोकताळेच आपण बदलायला हवेत. आपणा सर्वांना ज्ञात असलेले उदाहरण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे! शालेय जीवनात फारसा यशस्वी न ठरलेला जागतिक विक्रम रचणारा सचिन तेंडुलकर!
सचिन तेंडुलकर यांचं हे यश आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण त्याच वेळी सचिन तेंडुलकर शाळेत असताना त्याच्या वर्गातील कोणी एक मुलगा डॉक्टर झाला असेल... इंजिनीयरही झाला असेल... व्यावसायिकही झाला असेल अथवा कारकूनही झाला असेल. आता या सर्व उदाहरणांमध्ये यशस्वी कोण, याचे उत्तर आपण काय देऊ? खरं तर प्रत्येक जणच त्याच्या - त्याच्या परिक्षेत्रात यशस्वीच आहे असं आपल्याला म्हणावे लागेल. कारण प्रत्येक मूल जन्माला येतं ते वेगवेगळ्या क्षमता घेऊन. प्रत्येकाची जातकुळीच मुळात विभिन्न. त्यात प्रत्येकाची कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी तर त्याहूनही विभिन्न!
जसं बा. भ. बोरकर आपल्या कवितेत म्हणतात -
प्रति एक झाडा माडा, त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पानां फुलां, त्याचा त्याचा तोंडवळा
या काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाचा आदर ठेवून आपण यशापयश नेमकं कशाला म्हणावं याचा विचार केला पाहिजे. किंबहुना काल आपण होतो त्यापेक्षा आज अधिक चांगले आहोत. कालच्यापेक्षा आज आपली प्रगती अधिक झाली आहे, हे जर आपल्या यशाचे परिमाण असेल तर निश्चितच आपले व्यक्तिमत्त्व अधिक बहरेल आणि जीवन जगण्याचा आनंदही आपल्याला मिळेल व समाधानही लाभेल.
सामजिक कार्यकर्त्या शिल्पा खेर याचं ‘यश म्हणजे काय?’ हे पुस्तक वाचनात आलं होतं. या पुस्तकाचं वेगळेपण आणि महत्त्व यासाठी की हे पुस्तक यश म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचा मूलभूत विचार करायला लावत, केवळ पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा म्हणजे यश नव्हे. या पलीकडे जाऊन यशाची परिभाषा व्यापक आहे, याचे प्रत्यंतर शिल्पा खेर यांनी ‘यश म्हणजे काय’ या विषयावर आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई, अॅड. उज्ज्वल निकम अशा विविध क्षेत्रांतील सुप्रसिद्ध मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखतींमधील विचारांतून येते. या पुस्तकाला शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत डॉ. काकोडकर लिहितात, ‘उदात्त ध्येयावर आधारलेले जीवन समर्थपणे जगण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणे व ध्येयपूर्तीच्या दृष्टीने ठोस प्रगती करणे म्हणजे यशस्वी जगणे. यशाच्या परिभाषेचा व्यापक विचार डॉ. काकोडकर आपल्याला देतात आणि आपल्या डोळ्यांसमोर महात्मा गांधी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, बाबा आमटे, नारायण मूर्ती, स्वतः डॉ. काकोडकर अशी यशस्वी व्यक्तिमत्त्वे उभी राहतात. आपल्या कामावर व ध्येयावर श्रद्धा ठेवून ही माणसं काम करत राहिली. जीवनात मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवण हे त्याचे ध्येय नव्हत, जे त्यांना त्यांच्या कामामुळे आपसूकच मिळत गेलं. इतकं आदर्शवत जीवन जरी आपल्याला जगता आलं नाही, तरी अशी उदाहरणं डोळ्यांसमोर ठेवून आपण अंतर्मुख झालो तरी आपलं जीवन सहजसाध, सोपं नि आनंदी होईल. शिल्पा खेर यांनी विविध उदाहरणांमधून यशापयशाची परिभाषा मांडली आहे. त्यातला एडिसन या शास्त्रज्ञाच्या आयुष्यातील एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो. एडिसन या शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा जळून पूर्ण खाक झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘बरं झालं. माझ्या प्रयोगात ज्या सगळ्या चुका झाल्या होत्या, त्या जळून गेल्या. आता मी नव्या उमेदीने संशोधन करीन.’ एडिसनचं हे उदाहरण मनात सकारात्मकतेचं बीज पेरणारं आहे.
खरं तर कोणतीही ध्येयपूर्ती करताना निराशा, अपयश, अपमान अशा अनेक नकारात्मक गोष्टींशी प्रत्येकाचीच आयुष्यात कधी ना कधी गाठ पडत असते. कोणीच याला चुकलेलं नाही. अगदी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरानांही समाजाने ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवले, तेव्हा तेही उद्विग्न झाले... निराश झाले आणि त्यांनी दार लावून स्वतःला कोंडून घेतले.
तेव्हा त्यांच्या धाकट्या बहिणीने मुक्ताईने “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्त हाक मारून आत्मबळाचा साक्षात्कार घडविणारे “ताटीचे अभंग’’ म्हटले... मुक्ताई नसती तर संपूर्ण जगाला ‘‘पसायदाना”चा मूलमंत्र देणाऱ्या ज्ञानेश्वरांचं काय झालं असतं याचा विचारही आपण करू शकत नाही.आजच्या या वाढत्या स्पर्धेला तोंड देताना प्रत्येकाला सावरण्यासाठी हवी आहे अशी एक मुक्ताई! एखाद्याचे अपयश वा नैराश्य पाहून त्याला हसण्यापेक्षा, त्याच्यावर कुत्सित शेरेबाजी करण्यापेक्षा मुक्ताई होऊन आपण एखाद्याचे अश्रू पुसले तर आपल्या आयुष्यातही असा एखादा बिकट प्रसंग आल्यावर आपल्याला सावरण्यासाठी अनेक मुक्ताई आपल्या मागे उभ्या राहतील आणि कुणा मुक्ताईने आपल्याला सावरण्यासाठी हात दिलाच नाही, तर आपणच आपली मुक्ताई होऊया. कोणत्याही कामात अपयश आलं, तर समाज आपल्याला काय म्हणेल, आपली खिल्ली उडवेल का अशी भीती वा लाज न बाळगता निराशेची बंद कवाडे उघडून आपल्या आत्मबळावर विश्वास ठेवू या. यशाचा मूलमंत्र आपल्यापाशीच आहे, या स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवू या.
ashwinibhoir23@gmail.com