मनोविकासाचे ध्यासपर्व

श्रद्धांजली; डॉ. साधना कुलकर्णी


- समाज हा मूठभर चांगल्या लोकांमुळे चालत असतो. समाजातली सकारात्मकता, आशावाद, अस्सलपणा, सामंजस्य, कृतज्ञता टिकवून ठेवणारी आनंद नाडकर्णींसारखी माणसं जाऊ नयेत असं वाटतं. त्यांच्यातला अखंड ऊर्जेचा झरा प्रेरणा देणारा असतो. आजच्या विवेकभ्रष्ट समाजाला शहाणी असणारी माणसं हवी आहेत. आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही. हे कितीही खरं असलं तरी, डॉ. नाडकर्णी सर, तुम्ही अजून राहायला हवं होतं.


सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत, गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्तिगत साधना आणि सामाजिक कार्य यातील भेद मिटवून टाकावा लागेल. आपण या दोन गोष्टी भिन्न समजतो. त्यामुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक कार्य यात ओढाताण होते. व्यक्तिगत अध्यात्मिक चिंतन आणि सामाजिक कर्मयोग हे दोन्ही एकच मानले पाहिजेत. म्हणजे आपली कार्ये सदैव प्राणवान राहतील. चिंतन ही सुद्धा सेवा आहे आणि सेवेमध्ये चिंतन केले पाहिजे.” - आचार्य विनोबा भावे.


‌‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट‌’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वरील परिच्छेद डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उद्धृत केला आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्यामागची वैचारिक बैठक या परिच्छेदातून दिसून येते. ‌‘सेवा आणि चिंतन यांची सांगड घालण्याचा माझा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक,‌’ असं ते म्हणतात. पण हा प्रयत्न डॉ. नाडकर्णी यांनी आयुष्यभर केला आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले असं आज ठामपणे म्हणता येतं. आज डॉ. आनंद नाडकर्णी अनंताच्या प्रवासाला निघून गेले. आनंदी वृत्ती कायम रक्तात असणारा हा आनंदयात्री, आपल्यासाठी, आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कायम असणार आहे, असंच वाटत होतं; नव्हे तशी खात्रीच होती. त्यांच्याशी संबंधित प्रत्येकाला आता निराधार, पोरकं वाटत असेल. हजारो लोकांना जगण्याची उमेद देणाऱ्या डॉक्टर नाडकर्णींचं अकाली जाणं हे न पटण्यासारखं आहे. अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येत असतात. अनेकांमुळे आपण प्रभावित होतो, अनेकांमुळे जगण्याला दिशा मिळते. हे सगळं असूनही कायमस्वरूपी आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी असते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जसं मराठी वाचकांच्या मनातून बाहेर काढता येत नाही, तसाच डॉ. आनंद नाडकर्णींबद्दल माझा अनुभव आहे.


‌‘आपल्यासहित जे चालतं ते साहित्य‌’ अशी विनोबा भावे यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. नाडकर्णी सरांचं साहित्य आणि व्याख्यानं या व्याख्येची पुष्टी करणारं आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख होती का? तर नाही. मी कधी तरी त्यांना भेटले होते का? तर नाही. कधी तरी त्यांच्याशी पत्रव्यवहार किंवा फोनवर संवाद झाला होता का? अजिबात नाही, पण त्यांच्या पुस्तकांमधून, व्याख्यानांमधून माझ्या मनावर, मेंदूवर, जडणघडणीत कायमस्वरूपी परिणाम करणारी, माझ्यासोबत असल्याची प्रकर्षाने जाणीव देणारी ही व्यक्ती आहे, हे मात्र खरंय. हाच माझा आणि त्यांच्यातील दुवा. वैयक्तिक ओळख नसतानाही आपली जवळची व्यक्ती गमावल्याची वेदना आज वेढून बसली आहे.


इथे पुलंचा संदर्भ आठवण्याचं कारण हे, की महात्मा गांधी, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, स्वा. सावरकर, साने गुरुजी इत्यादी विभूतींचं मोठेपण पुलंच्या शब्दातून सहज उमजत गेलं, तर त्यांच्या जगण्यातलं उन्नत मानसशास्त्र आणि अध्यात्म डॉ. नाडकर्णींनी अलगद उलगडून सांगितलं - तेही अगदी सोप्या भाषेत. मानस विज्ञानाचे अनेक शास्त्रीय सिद्धांत अध्यात्माला सहज जोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. मानसशास्त्रीय विवेचन आणि अध्यात्म यांची बेमालूम सांगड घालून आधुनिक प्रवचन करणारा हा महर्षी होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मनोविकार होऊच नये म्हणून मनोविकास व्हायला हवा, हा त्यांचा अट्टहास होता आणि हे व्रत त्यांनी कायम पाळलं. एवढंच नाही तर या व्रतात अनेक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली.


एका सायकिॲट्रिस्टची डायरी, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, स्वभाव विभाव, विषादयोग, गद्धेपंचविशी, कर्मधर्मसंयोग, वैद्यकसत्ता, मनोगती, हेही दिवस जातील. या पुस्तकांनी मला खूप काही शिकवलं. केवळ शिकवलंच नाही तर ती शिकवण आजतागायत सोबत करते आहे. याशिवाय डॉ. नाडकर्णी अधिक जवळ आले ते कोविड काळात. सायंकाळची संवादमाला, माईंड फीस्ट, कळण्याचे दिवस, करण्याचे दिवस या व्याख्यानमालेतून त्यांचा अधिक चांगला परिचय झाला. कोविड काळातील ताण विवेकबुद्धीने कसा हाताळायचा, अशा परिस्थितीत सकारात्मकता आणि आनंद कसा टिकवून ठेवायचा याचं उत्तम विवेचन त्यांनी केलं. त्यांच्यातील अंगभूत सामंजस्य, व्यवहारातील यथोचित उदाहरणं, त्यावर विनोदाचा तडका आणि समाजाला नवीन दृष्टिकोन देण्याची तळमळ... या सगळ्यांचं मिश्रण त्यांच्या वाचिक शब्दांना अस्सल रूप देई. याशिवाय त्यांच्या व्याख्यानात संत साहित्याचे दाखले, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांचे अभंग, भगवद्गीतेचे संदर्भ, विवेकानंद, महात्मा गांधी, ओशो, विनोबा भावे, सर्वपल्ली राधाकृष्णन अशा विद्वानांच्या वचनांचे संदर्भ असल्याने त्या व्याख्यानांची उंची कमालीची वाढलेली असे. कोविड काळातील तसंच इतरही त्यांच्या अनेक व्याख्यानांमध्ये निराशेतून बाहेर काढण्याची, ऊर्जा प्रदान करण्याची आणि मनोविकास घडवून आणण्याची जबरदस्त क्षमता होती. वेद, उपनिषद, कुराण, बायबल यांचा प्रगाढ व्यासंग त्यांच्या व्याख्यानातून जाणवत असे.


वाचक आणि श्रोत्याला समृद्ध करणारं त्यांचं साहित्य वारंवार वाचनाला प्रवृत्त करणारं आहे. कोविड काळातील त्यांची व्याख्यानं आजही मनाला उभारी देतात. महत्त्वाचं म्हणजे ही व्याख्यानं ऐकताना या सखोल विद्वत्तेच्या वर, सामाजिक बांधिलकीच्या वर दशांगुळे पुरून उरणारा एक मिश्कील, पारदर्शक, डोळ्यांत लहान लेकराचं कुतूहल असणारा एक निर्व्याज, सच्चा माणूस बघताना विलक्षण अनुभव येत असे.


उत्क्रांतीमध्ये मेंदूत होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल अपरिहार्य असतात. पण स्वतः माणूसदेखील स्वप्रयत्नाने आपल्या मेंदूचा योग्य विकास करू शकतो, मेंदूचं सामर्थ्य वाढवू शकतो हे आजच्या तांत्रिक भाषेत डॉ. नाडकर्णी खूप सोपं करून सांगायचे. हे सांगताना ‌‘आधी केले, मग सांगितले‌’ याची प्रचिती यायची. उन्नत मेंदूचे विचार, भावना आणि कृतीद्वारे कसे पोषण होऊ शकते, हे त्यांना बघूनच पटत असे. आस्था, करुणा, तन्मयता, कृतज्ञता, त्याग, सहिष्णुता, निर्मलता, कैवल्य या उन्नत मनोवृत्तींचे ते स्वतः एक जिवंत उदाहरण होते. उन्नत मेंदू (निओकॉर्टिकल ब्रेन) हे आपल्या शरीरातील सॉफ्टवेअर असून ते वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे, हे ते आवर्जून सांगत. आपण आज मेंदू नियमित अपडेट केला तर पुढील पिढ्यांनंतर हा अपडेटेड मेंदू शरीराचं हार्डवेअर होऊ शकतो, पण त्यासाठी आजपासूनच प्रयत्न करायला हवेत, हे ते अत्यंत कळकळीने सांगत.


आज डॉ. आनंद नाडकर्णी आपल्यात नाहीत. या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक विद्वान, अभ्यासू व्यक्ती लिहितील आणि भावना व्यक्त करतील. त्यांच्या कार्याचे, त्यांच्यातील विविध पैलूंचे वर्णन करतील. अशा वेळी माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीने त्यांच्यावर चार ओळी लिहिण्याचे काय प्रयोजन? त्यांच्यावर लिहिण्याची माझी पात्रता नाही. एक अभ्यासू, विद्वान, सामाजिक भान असलेला मानसविकार तज्ज्ञ हा केवळ साहित्यातून सामान्य माणसाच्या जडणघडणीत चांगला बदल घडवून आणू शकतो हे मला अधोरेखित करायचे आहे, जेणेकरून हे स्मरण कुणा गरजू व्यक्तीला डॉ. नाडकर्णी यांच्या साहित्य, व्याख्याने जाणून घेण्याची प्रेरणा देईल. हे लेखन व्यक्तिगत अनुभवापुरतं मर्यादित आहे, तसंच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग माझ्या आवाक्यातला आहे.


समाज हा मूठभर चांगल्या लोकांमुळे चालत असतो. समाजातली सकारात्मकता, आशावाद, अस्सलपणा, सामंजस्य, कृतज्ञता टिकवून ठेवणारी आनंद नाडकर्णींसारखी माणसं जाऊ नयेत असं वाटतं. त्यांचं असणं हे निरोगी समाजासाठी खूप आवश्यक, आश्वासक आणि दिलासा देणारं असतं. त्यांच्यातला अखंड ऊर्जेचा झरा प्रेरणा देणारा असतो. आजच्या विवेकभ्रष्ट समाजाला शहाणी असणारी माणसं हवी आहेत. आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही. हे कितीही खरं असलं तरी, डॉ. नाडकर्णी सर, तुम्ही अजून राहायला हवं होतं.

Comments
Add Comment

रमय्या वस्तावय्या... रमय्या वस्तावय्या...

स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे गीत आणि संगीत हे आपल्या चित्रपटाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि कायम राहील. चित्रपटाची

पाप आणि प्रायश्चित्ते

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे धर्मशास्त्र व पुराणात मनुष्यासाठी धर्माचरण व आचरणाचे नियम सांगितलेले

तुज आहे तुजपाशी...

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे नीटच्या परीक्षेचं पेपरफुटीचं प्रकरण घडून

“मुझे दोस्त बनके दगा न दे...”

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे पूर्वी चित्रपटसृष्टीत हिंदी-उर्दूत लिहिणारे आणि अस्खलित उर्दू, फारसी, अरबी

यशस्वी होण्याचे रहस्य : हुशारी की सातत्य?

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू ज्याची मुले नेहमी यशस्वी होतात त्या पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा इतरांना

दोन डोळे

जीवनगंध; पूनम राणे ताई, ताई... ” “काय गं” “तिकडे बघ” “एकटीच मुलगी बसलीय” “चल जाऊ या तिच्याकडे!” “चल, चल” “ताई, तू