“मुझे दोस्त बनके दगा न दे...”

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे


पूर्वी चित्रपटसृष्टीत हिंदी-उर्दूत लिहिणारे आणि अस्खलित उर्दू, फारसी, अरबी शिकलेले शायर असायचे! त्यामुळे अनेकदा सिनेमापेक्षा त्याची गाणी जास्त लोकप्रिय होत. केवळ गाण्यांमुळे सिनेमा लोकप्रिय झाला, अशी तर अनेक उदाहरणे आहेत!


सिनेमासाठी थोडी सोपी भाषा वापरून गाणे लिहिणारे हे कवी उर्दूत मात्र अति उत्तम अशी शायरी करत. निवडक निमंत्रित रसिकांनाच अशा मुशाय-यातून या शायरीचा आनंद घेता येई. शकील बदायुनीस असेच एक गंभीर तब्येतीचे कवी होते.


ज्या प्रेक्षकांनी दिलीपकुमारच्या १९६४ सालच्या ‘लीडर’मधले -“मुझे दुनियावालो शराबी ना समझो,मैं पिता नाही हुं, पिलाई गयी हैं” किंवा ‘दो बदन’मधले रफीसाहेबांनी गायलेले -‘रहा गर्दिशोंमें हर-दम मेरे इश्क़का सितारा, कभी डगमगाई कश्ती कभी खो गया किनारा. अनुभवले आहे, ज्यांना ‘मेरे मेहबूब’मध्ये राजेंद्रकुमारसाठी रफीसाहेबांनी गाऊन सोने केलेले शकीलजींचे शब्द - ‘यादमें तेरी जाग जागके हम, रातभर करवटें बदलते हैं.’ऐकले असेल, त्यांना शकीलजी हे मूळचे सिनेगीतकार नसून एक नामांकित शायर होते हे कदाचित खरेही वाटणार नाही.


पण याच शायर-ए-आझम साहेबांची अत्यंत लोकप्रिय रचना -
“ऐ मोहब्बत तेरे अंजामपे रोना आया,
जाने क्यूँ आज तेरे नामपे रोना आया...”
चक्क बेगम अख्तर यांच्यासारख्या नामांकित गझलगायिकेने गावून अजरामर केली आहे हेही खरेच आहे.


उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात ३ ऑगस्ट १९१६ साली जन्मलेल्या शकील अहमद यांना केवळ ५४ वर्षांचे आयुष्य मिळाले पण त्यात त्यांनी इतकी सुंदर काव्यरचना निर्माण करून ठेवली की, आजही त्यांची गाणी लोकांच्या ओठावर आहेत. त्यांचे एक गैरफिल्मी गाणे ‘आख़िरी वक़्त है, आख़िरी साँस है, ज़िंदगी की है शाम, आख़िरी आख़िरी..’ कितीतरी गायकांनी गायले. ते आजही दर्दी रसिकात कमालीचे लोकप्रिय आहे.


सन १९४२ला बी.ए.ची पदवी घेतल्यावर शकीलजी काही वर्षे दिल्लीत सरकारी नोकरीत होते. ते तिथे कविसंमेलनेही गाजवत. अशाच एका मुशायऱ्यासाठी १९४६ ला ते मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. त्यांच्या स्थलांतराचा केवढा फायदा हिंदी चित्रपटसृष्टीला झाला हे त्यांनी तब्बल १०८ सिनेमांसाठी लिहिलेल्या अप्रतिम ७५० गाण्यांतून मोजकीच गाणी जरी पाहिली तरी लक्षात येते!


‘बैजू बावरा’मधले रफीसाहेबांचे ‘मन तडपत हरीदर्शनको आज’ कुणाचे होते? त्याच सिनेमातले परमेश्वराला आळवणारे “ओ दुनियाके रखवाले, सून दर्शभरे मेरे नाले, आश-निराशके दो रंगोसे दुनिया तुने सजाई, नैया संग तुफान बनाया, मिलनके साथ जुदाई” यासारखे माणसाचे चिरंतन दु:ख मांडणारे गाणेही शकीलसाहेबांचेच होते. ‘बीस साल बाद’मधले लतादीदींचे अजरामर ‘कंही दीप जले कंही दिल’ त्यांचेच. ‘मुगले-आझम’चे अत्यंत लोकप्रिय बंडखोर गीत ‘प्यार किया तो डरना क्या’? त्यांचेच. अनेकांनी मनातल्या मनात आपल्या प्रेयसीला कल्पून गुणगुणलेले ‘चौदहवीका चांद हो, या आफताब हो, जो भी हो तुम खुदाकी कसम लाजबाब हो.’ सुद्धा शकीलजींचीच रचना होती!


त्यावेळी समाजात जी ‘गंगाजमनी संस्कृती’ प्रत्यक्षात जिवंत होती तिचा सुंदर पुरावा नोंदवणारे ‘मन तडपत हरी दर्शनको आज’ हे हिंदू श्रद्धेचे मूर्तिमंत प्रतीक असणारे भक्तीगीत लिहिणाऱ्या या महान कवीला त्याच्या पात्रतेपेक्षा फार कमी सन्मान मिळाला यांची खूप खंत वाटते. केवळ ३ फिल्मफेयर पुरस्कार आणि एक पोस्टाचे तिकीट यावरच देशाने या महान कवीची बोळवण केली!


बेगम अख्तर यांनी गायलेली त्यांची एक रसिकप्रिय गझल आहे. ती मित्राला उद्देशून लिहिली आहे की प्रेयसीला? की एकंदरच क्षणभंगुर आयुष्याला, ते सांगता येत नाही. त्या लोकप्रिय गझलेचे शब्द होते -
‘मेरे हम-नफ़स, मेरे हम-नवा
मुझे दोस्त बनके दग़ा न दे.’
माझ्या श्वासाबरोबर श्वास आणि सुराबरोबर सुरू मिळवणाऱ्या मित्रा, तू मित्र बनूनच मला दगा तर देणार नाहीस ना?’ असा कवीचा प्रश्न आहे. अतिजवळीकेतून अशी शंका प्रत्येक मनस्वी प्रेमिकाला कधीतरी येतेच!
कवी म्हणतो, ‘मी तर प्रेमातील अपयशाने इतका खचलोय की मरताना जसे प्राण कंठाशी येतात तशी माझी अवस्था आहे. आता माझी आशा सोडूनच दे. माझ्या जगण्यासाठी तू प्रार्थना करूच नकोस!’


‘मैं हूँ दर्द-ए-इश्क़से जाँवलब
मुझे ज़िन्दगीकी दुआ न दे.’
मित्रा, आम्हा प्रेमिकांची गोष्टच वेगळी असते! हृदयाला झालेल्या जखमांतूनच आम्हाला बळ मिळते. चिंता याचीच वाटते की, तू माझ्या जखमा बऱ्या करताना ती शक्तीच नष्ट करून टाकशील -
‘मेरे दाग़-ए-दिलसे है रौशनी,
उसी रौशनीसे है ज़िन्दगी.
मुझे डर है ए मेरे चारागर,
ये चराग़ तूही बुझा न दे.’
हकीमसाब, तुम्ही मला माझ्या नशिबावरच सोडून द्या. तुमच्या उपचारांच्या हिशोबी मदतीने माझ्या वेदना कदाचित अजून वाढतील!
‘मुझे छोड़ दे मेरे हालपर, तेरा क्या भरोसा है चारागर,
ये तेरी नवाज़िश-ए-मुख़्तसर, मेरा दर्द और बढ़ा न दे.’
उर्दू शायरीत गुलाबाच्या फुलातील लालभडक रंगाला ज्वालेची उपमा देतात. कवी म्हणतो, ‘माझा निर्धार झालाय. मला दुसऱ्यांनी लावलेल्या आगीचे भय वाटतच नाही. पण भीती याची वाटते की, सौंदर्यात लपलेल्या तेजाच्या ज्वालेमुळेच माझ्या प्रेमाची बाग जळून न जावो.’ ‘मेरा अज़्म इतना बुलंद है के पराये शोलोंका डर नहीं.’
‘मुझे ख़ौफ़ आतीश-ए-गुल से है, ये कहीं चमनको जला न दे.’ अनेकदा शेवटची ओळ शायर स्वत:ला उद्देशून लिहीत असत. शकीलजी शेवटी विचारतात, “अरे शकील, तू नेमका आताच कुठे गेलास? ‘ती’ बघ प्रेमाच्या सुरईतून तुला मधुर पेय द्यायला आली आहे. आता कुणी दुसऱ्यानेच त्याचा चषक पुढे केला तर काय होईल?’


‘वो उठे हैं लेके होम-ओ-सुबू, अरे ओ ‘शकील’ कहाँ है तू,
तेरा जाम लेनेको बज़्ममें कोई और हाथ बढ़ा न दे.’
हे हळुवार भावनाचे सोहळे, ही कलंदर भावनाची ही आतिशबाजी पाहायची असेल, मनस्वी शायरीचा आनंद घ्यायचा असेल, तर असे जुने कवी आणि त्यांना सांभाळणाऱ्या युट्यूबला पर्याय नाही!

Comments
Add Comment

रमय्या वस्तावय्या... रमय्या वस्तावय्या...

स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे गीत आणि संगीत हे आपल्या चित्रपटाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि कायम राहील. चित्रपटाची

मनोविकासाचे ध्यासपर्व

श्रद्धांजली; डॉ. साधना कुलकर्णी - समाज हा मूठभर चांगल्या लोकांमुळे चालत असतो. समाजातली सकारात्मकता, आशावाद,

पाप आणि प्रायश्चित्ते

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे धर्मशास्त्र व पुराणात मनुष्यासाठी धर्माचरण व आचरणाचे नियम सांगितलेले

तुज आहे तुजपाशी...

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे नीटच्या परीक्षेचं पेपरफुटीचं प्रकरण घडून

यशस्वी होण्याचे रहस्य : हुशारी की सातत्य?

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू ज्याची मुले नेहमी यशस्वी होतात त्या पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा इतरांना

दोन डोळे

जीवनगंध; पूनम राणे ताई, ताई... ” “काय गं” “तिकडे बघ” “एकटीच मुलगी बसलीय” “चल जाऊ या तिच्याकडे!” “चल, चल” “ताई, तू