महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
धर्मशास्त्र व पुराणात मनुष्यासाठी धर्माचरण व आचरणाचे नियम सांगितलेले आहेत. या नियमानुसार कर्म न करता अधर्मयुक्त कर्म करणे म्हणजे पाप होय. पापामुळे मनावर तसेच शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात. पाप हे केवळ कृतीनेच नव्हे तर काया, वाचा व मनाच्याद्वारेही घडते.
पापांचे प्रकार
याज्ञवल्क स्मृतीत पापांचे प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजे १) महापातक २) उपपातक आणि ३) लघुपातक
महापातके ही गंभीर स्वरूपाची पातके असतात. यात ब्रह्महत्या, मदीरापान, सुवर्णचोरी, गुरू पत्नीगमन आदी प्रकारे येतात.
उपपातके ही महापातकांपेक्षा थोडी कमी पण तरीही गंभीर स्वरूपाची पातके असतात. यात गोहत्या, देवद्रव्याची चोरी, गुरूचा अपमान, खोटी साक्ष देणे, ब्राह्मणाचा अपमान करणे, आदींचा समावेश होतो.
लघुपातके म्हणजे दैनंदिन जीवनात होणारी ही पापे असून यात खोटे बोलणे, क्रोध करणे, अपशब्द वापरणे, अशुद्ध आहार घेणे आदींचा समावेश होतो.
पापामुळे मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम होतात. सतत अस्वस्थ राहणे, ग्लानी येणे, अपराधीपणाची भावना वाटत राहणे, असे दृश्य परिणाम होत असतात. हे परिणाम दूर व्हावेत तसेच व्यक्तीची आत्मशुद्धी व्हावी यासाठी धर्मशास्त्रात काही प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत.
प्रायश्चित्ते
महापातकापैकी ब्रह्महत्तेसाठी बारा वर्षे कठोर तप करणे, जंगलात जाऊन तप करून भिक्षा मागणे, सतत जप व प्रायश्चित्त व्रत याचा समावेश आहे. तर मदीरापान करणाऱ्यांसाठी कठोर उपवास, तपश्चर्या, तसेच गरम लाल तप्त झालेले दूध, मध किंवा गोमूत्र प्राशन करणे, तीर्थक्षेत्रांची यात्रा तसेच प्रायश्चित्त व्रत ही प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत व हे गरम करण्यासाठी लोह ताम्र अथवा शिसेच्या पात्राचाच उपयोग करावा, तरच त्याची शुद्धी होते. अन्य कशानेही होत नाही. औषध म्हणून मद्य घ्यावे लागले, तर पुन्हा उपनयन करावे आणि दोनदा चांद्रयाण व्रत करावे. मदिरेचा स्पर्श झालेले पात्र सुद्धा अपवित्र मानले जाते. चंद्रग्रहणात भोजन केल्यास मदिराप्राशनाचेच पाप लागते, असा उल्लेख नारद पुराणात आहे. सुवर्ण चोरीसाठी चोरलेले द्रव्य परत देऊन बारा दिवस उपवास करावा, राजा अथवा समाजासमोर अपराध मान्य करणे व तप ही प्रायश्चित्ते सांगितली आहेत. रत्न, भूमी, स्त्री, मनुष्य यांचीही चोरी केल्यास सुवर्ण चोरीच्या प्रायश्चित्तासारखेच प्रायश्चित्त घ्यावे लागते. गुरूपत्नीशी समागम करणाऱ्यांसाठी कठोर तप, दीर्घकाळ ब्रह्मचर्य व्रत आणि काही काळासाठी सामाजिक बहिष्कार हे सांगितले आहे. महापातक्या बरोबर संबंध ठेवणाऱ्यांसाठीही उपवास जप, तप ही प्रायश्चित्ते सांगितली आहेत.
लघुपातकामधील अनवधानाने झालेल्या गोहत्तेसाठी गोदान करणे, उपवास, जप करणे, तसेच तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे व पराकव्रत आदी प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत. मुद्दाम केलेल्या गोहत्तेला प्रायश्चित्त नाही असे नारद पुराण सांगते. चोरी करणाऱ्यांच्यासाठी चोरलेले धन परत देणे, दंड भरणे व उपवास, व तप करणे ही प्रायश्चित्ते आहेत. खोटे बोलणाऱ्यांसाठी सत्य बोलण्याचे व्रत घेणे व उपवास ही प्रायश्चित्त आहेत. गुरूंचा अपमान करणाऱ्यांसाठी गुरूची क्षमायाचना करणे व त्यांची सेवा करणे ही प्रायश्चित्ते आहेत. व्यभिचारासाठी कठोर उपवास, तपश्चर्या व काही काळापुरता सामाजिक बहिष्कार सांगितलेला आहे. एखाद्याने कामवासनाने स्त्रीचा मानभंग केल्यास त्याला अग्निप्रवेश हेच प्रायश्चित्त नारद पुराणात सांगितले आहे. हिंसा म्हणजे निरपराध जीवाला मारणे या पातकासाठी कृच्छव्रत, दान, उपवास व तप सांगितलेले आहे. लाकूड, गवत, वृक्ष, गूळ, चामडी, वस्त्र व मांस चोरणाऱ्यांनी तीन दिवस उपवास करावा असे धर्मग्रंथात सांगितले आहे.
विविध व्रते
याशिवाय प्रायश्चित्त प्रकारात अनेक प्रकारची व्रत वैकल्ये सांगितलेली आहेत.
सामान्य कृच्छ व्रत : यात बारा दिवस उपास सांगितला आहे. त्यापैकी पहिले दिन दिवस एकदा अन्न घेणे, पुढचे तीन दिवस एकदाच रात्री अन्न घेणे त्यानंतरचे तीन दिवस न मागता मिळेल तेवढेच अन्न घेणे आणि पुढचे तीन दिवस पूर्ण उपवास असा क्रम आहे.
अतिकृच्छ व्रत : हे अधिक कठोर उपास करणे आहे. बारा दिवसांपैकी पहिले तीन दिवस फक्त एक घास अन्न, पुढचे तीन दिवस रात्रीच एक घास अन्न, या पुढील तीन दिवस केवळ द्रव किंवा पाणी आणि शेवटी पूर्ण उपवास असा क्रम आहे.
पराक कृच्छ व्रत : हे सर्वात कठीण व्रत असून यात बाराही दिवसपूर्ण उपवास सांगितला आहे. काही परंपरेत अल्प प्रमाणात दूध अथवा पाण्याचे प्राशन चालू शकते. याशिवाय या काळात जप, देवपूजा मौनव्रत ब्रह्मचर्य, भूमी शयन व इंद्रिय संयम आदी नियमांचे पालन करावे लागते या व्रताचा उद्देश शरीराला कष्ट देणे नसून मनशुद्धी पापक्षालन पश्चाताप व आत्म नियंत्रण हा आहे.
चांद्रयाण व्रत : हे व्रत मोठ्या पापासाठी असून पौर्णिमेनंतर चंद्र ज्याप्रमाणे
कलेकलेने कमी होत जातो त्याप्रमाणे अन्न कमी कमी करत जाणे व अमावस्येला उपवास करून पुन्हा चंद्र जसजसा पौर्णिमेसाठी वाढत जातो तसतसे अन्न हळूहळू वाढवणे याला चांद्रयाण व्रत असे म्हणतात.
याशिवाय जप व होम आदीद्वारे ही प्रायश्चित्त घेता येते. यात वेदमंत्र, जप अग्नीहोत्र, देवपूजा, आदींचा समावेश आहे. अन्न व शुद्धीसाठी पवित्र स्नान, मंत्र, जप, पवित्र आहार हे उपाय आहेत. अपवित्रता दूर करण्यासाठी तीर्थयात्रा ब्राह्मण भोजन, दान, मंडपदान, आदी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत.
पाराशर स्मृतीनुसार कलियुगात मनुष्य दुर्बल असल्याने कठोर तपश्चर्या शक्य नाही. त्यामुळे या युगात धर्म साधण्यासाठी व सर्वांना सोपा व करता येणारा उपाय म्हणजे नामस्मरण, दान, उपवास, तीर्थयात्रा, जप, आदी प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत. ऋषीमुनींनी सांगितलेल्या प्रायश्चित्तांनी अथवा व्रताने जेवढी शुद्धी होत नाही तेवढी शुद्धी केवळ भगवंताच्या नामस्मरणाने व उच्चाराने होते, हे भागवतात अजामेळाच्या उदाहरणावरून सांगितले आहे. म्हणून पापक्षालनासाठी भगवंताचे नामस्मरण हाच एकमेव श्रेष्ठ उपाय आहे. महान पापी ही भगवद्भक्तीमुळे उत्तम पद प्राप्त करू शकतो.
कलियुगातील प्रायश्चित्ते ही अन्य धर्मग्रंथाच्या तुलनेत अधिक सोपी व व्यवहार्य आहेत. प्रायश्चित्ताचा उद्देश मनुष्याने आपली चूक ओळखून पश्चाताप करावा व जप तपा द्वारे आत्मशुद्धी करून पुन्हा अशा प्रकारची चुकी न करण्याची खबरदारी घेणे हा आहे.