- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे
मे महिना आला की, लग्नाचे वाढदिवस. सर्वांचेच सारखेच आनंदाने भरलेले. त्या संसाराच्या सुख स्वप्नांना कोणाची नजर लागू नये. सोशल मीडियावर स्टेटस पाहत असताना लग्नाचा वाढदिवस असल्याचे लक्षात येते. खूप गुण्यागोविंदाने, आनंदाने निभावणारे, एकमेकांना साथसोबत देणारे सुखदुःखाचे वाटेकरी असं सगळं या पती-पत्नीचं आयुष्य असतं.
प्रत्यक्षात ३६५ दिवस आपण वयाने जसे मोठे होतो, तसे संसाराचेही वय असतं. ते आपल्या वयावर अवलंबून. संसाराची किमया कशी असावी त्याचे माझ्या नजरेतून केलेले निरीक्षण. अमृत गोडीने भरलेला संसार खरंच कौतुकास्पद. उभयतांची एकमेकांवर असलेली जीवापाड माया. साजेशी जोडी, एकमेकांना शोभेल अशी मेड फॉर इच अदर. तुम्ही एकमेकांना गाढ विश्वासाने देत असलेली साथ म्हणजे संसाराची अमृतवेलच जी आज प्रेमाने फुलली आहे. संसारातील सुख समृद्धी जपत जपत ती गंधाळली आहे.
संसार म्हणजे सप्तपदी. पहिले पाऊल विश्वासाचे. दुसरे पाऊल आधाराचे. तिसरे पाऊल स्नेहाचे. चौथे पाऊल सामंजस्याचे. पाचवे पाऊल सहकार्याचे. सहावे पाऊल जबाबदारीचे. सातवे पाऊल समर्पणाचे. सोबत सात पावले चालून अख्खा संसार सोबतीने निभवायचा असतो. ही अवीट गोडीची मधुर वाटचाल स्मरण करण्याचा आजचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्यापेक्षा नक्कीच मोलाचा, अनमोल असा असतो.
इथून पुढचा संसार विश्वासाने करायचा, प्रत्येक वळणावर आनंदाची उधळण करायची, फुलपाखरासारखी रंगीत स्वप्नं पाहायची, प्रयत्नांचे गड सर करायचे, जीवनाच्या क्षितिजावर मोहमयी स्वप्नांना ओंजळीत घेत चलायचं, झुलायचं, लढायचं, हसायचं, कधी रडायचं, स्वप्नांची भरारी एकमेकांचे प्रेम दृढ करायचं. सुखदुःखाची साथ. प्रेम आणि कर्तव्य यांची गोळा बेरीज यांचा अनोखा संगम. आपली गुपितं आपल्याच मनी ठेवावी. शाश्वत प्रेम हेच टिकतं. मंगलक्षणांची ज्योत नित्य तेवत राहते गोड बंधनात. किती कष्ट पडले तरी त्रासाचे वाटत नाही. एकमेकांसाठी एकमेकांच्या आवडीचं करावंसं वाटतं. बहरलेला हा संसार कधी पारिजात तर कधी रजनीगंधा. प्रेमाने फुलणारा हा सुखी संसाराचा वृक्ष आजवर डवरलाय, मोहरलाय याचं श्रेय दोघांनाही जातं. सामंजस्य, विश्वास, परिश्रम सर्वात महत्त्वाचं काय तर संयम. एकमेकांना सांभाळून घेण्याची कला जमली पाहिजे तरच हे जीवन आनंदी, स्वच्छंदी आणि एकमेकांसाठी जगता येईल. प्रवासात एकमेकांच्या हाती हात देऊन चालणे म्हणजे केवळ सोबत नसते तर ते जीवन गाणे होते. आज आपले हितचिंतक, नातेवाईक, स्नेही-आप्तेष्ट शुभेच्छा देतातच. त्यांच्या शुभेच्छांची ही तितकीच गरज आहे असे मला वाटते. नवीन स्वप्नं, नव्या वाटा, नवा आनंद, नवी आव्हाने पेलता पेलता आपण कधी पुढच्या दिशेला वळतोय हे कळतच नाही.
समजून घेण्यात, समजावून सांगण्यात आयुष्य पुढे सरकत असतं आणि आनंद घ्यायचा राहून जातो, पण एकमेकांच्या साक्षीनं घेतलेल्या सात वचनांनी आनंदही पुरविला जातो. हृदयातील भावना अथांग सागराप्रमाणे खोलवर रुजलेल्या असतात, त्या शब्दात मापता येत नाहीत. पण जीवन फुलवून टाकणाऱ्या असतात. जीवनाची अवघड वाट सहज सोपी करतात आणि सुखदुःखाचा मेळही घालतात. सुखाचे एक भांडार, आगार हसू लागते. मनात जिद्दीचं बळही संचारतं.
ध्येयपूर्तीकडे जाताना हृदयस्पर्शी आठवणी मनावर कोरल्या जातात. वर्षामागून वर्ष, दिवसामागून दिवस जातच असतात. खरं तर अशा भावना शब्दांत प्रकट करणे शक्यच नाही. हृदयाच्या कप्प्यात खोलवर सजवलेल्या बऱ्या. त्याचे बिंब-प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर उमटतच असते. उज्ज्वल भविष्यातून स्वप्न साकारण्यातून. नव्या दिशा उजळतात. इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आणि ही वळणं आयुष्याच्या या टप्प्यावर कुठवर आलोय? मागे वळून पाहिल्यावर समजतात! शुभेच्छा देणारे हितचिंतकही आपले असतात. स्मृतिगंध मनात दरवळतात. कायमस्वरूपी मनात कोरले जातात. नात्यातला हळुवारपणा टिपता येतो. काळजात जपता येतो. उत्सव साजरे केले जातात. जीवनाचाही उत्सव आहे. असाच आव्हानांना पेलणारा उत्सव, वेळोवेळी साजरा करायला हवा ना. आपल्या चिल्यापिल्लांसाठी संसाराचा भार पेलायचाच असतो. एकमेकांच्या साथीने. म्हणूनच आशीर्वाद दिला जातो
नांदा सौख्यभरे.