Saturday, May 23, 2026

Mumbai's Garib Nagar : वांद्रे 'गरीब नगर'मधील अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात; आज राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होणार

Mumbai's Garib Nagar : वांद्रे 'गरीब नगर'मधील अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात; आज राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Mumbai Bandra East) भागात असलेल्या 'गरीब नगर' (Garib Nagar) झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सलग पाच दिवस चाललेल्या या धडक मोहिमेचा आज शेवटचा दिवस आहे. प्रशासनाने आता आपला संपूर्ण मोर्चा पाडकाम करण्यावरून राडारोडा (Debris) हटवण्याकडे वळवला आहे. कालच अनधिकृत बांधकामे पाडण्याची मुख्य कारवाई पूर्ण झाली असून, आता केवळ जमीनदोस्त केलेल्या इमारतींचे ढिगारे आणि कचरा साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने सफाईला वेग

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

पश्चिम रेल्वेने (Western Railway) जारी केलेल्या व्हिडिओ आणि घटनास्थळावरून समोर आलेल्या दृश्यांनुसार, संपूर्ण गरीब नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर विटा, पत्रे आणि मातीचा खच पडलेला दिसत आहे. हा अवाढव्य राडारोडा उचलण्यासाठी अनेक जेसीबी मशिन्स आणि अवजड ट्रक (डंपर) तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कारवाईच्या सुरुवातीला या ठिकाणी असणारे स्थानिक रहिवासी आता तिथे उपस्थित नाहीत, त्यामुळे सफाईच्या कामात कोणताही अडथळा येत नाहीये. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेच्या चौथ्या दिवशीच पाडकाम पूर्ण झाले होते. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ५० टक्के राडारोडा उचलण्याचे काम मार्गी लागले होते, तर उर्वरित सर्व कचरा आज साफ करून ही मोहीम अधिकृतरीत्या संपुष्टात येईल.

१०० टक्के कारवाई पूर्ण, पण...

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विनीत अभिषेक यांनी 'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ज्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई निश्चित करण्यात आली होती, ती १०० टक्के जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मात्र, या कारवाईत न्यायालयाच्या निर्देशांचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे १०० बांधकामांना अंशतः दिलासा मिळाला असून, त्यांचे केवळ तळमजले (Ground floors) सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, तर त्यावरील मजले पाडण्यात आले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी असा स्पष्ट इशारा दिला आहे की, गरीब नगरमधील ही कारवाई केवळ एक सुरुवात असून भविष्यात अशा अनेक अतिक्रमणविरोधी मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

विरोध, निदर्शने आणि दगडफेक करणाऱ्या १९ जणांना बेड्या

गेल्या काही दिवसांपासून गरीब नगरमधील ही कारवाई केवळ अतिक्रमणामुळेच नाही, तर तिथे झालेल्या हिंसक घटनांमुळेही चर्चेत होती. कारवाईला सुरुवात झाल्यापासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला होता. या तणावाच्या वातावरणात काही समाजकंटकांनी पोलिसांवर आणि प्रशासनाच्या पथकावर दगडफेक केली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, दगडफेक केल्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल १९ जणांना अटक करण्यात आली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात आता या मोहिमेची सांगता होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >