Saturday, May 23, 2026

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

Mango Juice Caused Poisoned :

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त झळकल्याने खळबळ उडाली होती. अखेर, विषबाधा (Food poisioning) झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून समोर आले आहे . आता, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावला राहणार्‍या जायभाय कुटुंबातील सात जणांना आंब्याचा रस पिल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना गेल्या रविवारी उघडकीस आली . जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटूंबीयांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड' चा वापर केलेला असू शकतो, असे सांगण्यात आले.

यंदाचा उन्हाळा आता संपुष्टात येत असून शेवटच्या काही दिवसांत आंबे खाऊन जेवणातील गोडवा जपण्याचं काम खवय्यांकडून केलं जात आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात विविध जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीत राहणाऱ्या भाऊसाहेब जायभाय यांनीही बाजारातून आंबे खरेदी केले. कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस पिला , त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, परंतु सर्वांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो असे उपचार करणारे डॉ.सचिन पांडुळे यांनी सांगितले. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अजूनही उपचार सुरू आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटुंबियांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड' चा वापर केलेला असू शकतो, असे सांगण्यात आले. कॅल्शियम कार्बाइड ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर 'एसिटिलीन' नावाचा वायू सोडतो, जो माणसासाठी घातक ठरतो. अशा पध्दतीने 'कॅल्शियम कार्बाइड' वापरणे हे बेकायदेशीर आहे. संबंधित कुटुंबाला रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना जी लक्षण दिसत होती, त्यावरून एशियन हॉस्पिटलचे डॉ.सचिन पांडुळेंनी हा अंदाज बांधला आहे.

केमिकलने पिकवलेल्या आंबा विक्रीच्या संशयावरून तपासणी:

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात केमिकलने पिकवलेले आंबे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे . कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यांचा संशय आल्याने विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेले आंबे पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. केमिकलने पिकवलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या तपासणी कारवाईनंतर पाथर्डी शहरातील फळविक्रेत्यांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे .

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >