Friday, May 22, 2026

CANNES फेस्टिव्हलमध्ये भयंकर घडलं, मॉडेलला बेदम मारहाण

CANNES फेस्टिव्हलमध्ये भयंकर घडलं, मॉडेलला बेदम मारहाण

Cannes Film Festival : सध्या सोशल मीडियावर बहुप्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. कान्स फेस्टिव्हल हा केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नसून तो जागतिक फॅशनचा एक मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. या महोत्सवाचे ६० मीटर लांब रेड कार्पेट आणि तिथल्या २४ पायऱ्या जगभरात प्रसिद्ध आहेत. हॉलीवूडपासून ते बॉलीवूड आणि प्रादेशिक सिनेमांमधील कलाकार येथे त्यांच्या नवनवीन, ग्लॅमरस आणि अनोख्या फॅशन स्टाईलचे प्रदर्शन करतात. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

दरम्यान याच बहुचर्चित ग्लॅमरस इव्हेंटमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्टने चक्क 'मिस व्हेनेझुएला २०२५' चा किताब जिंकलेल्या २९ वर्षीय सुंदरीवर जीवघेणा हल्ला केला आहे. रक्ताने माखलेल्या चेहऱ्यासह तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून आहे. तिचा रक्ताने माखलेला चेहरा आणि आजूबाजूला रक्ताचा सडा पाहून संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे.

'द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'मिस व्हेनेझुएला २०२५' अँड्रिया डेल वालसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे आणि ती प्रचंड घाबरलेली आहे. व्हिडिओमध्ये ती रडत-रडत स्पॅनिश भाषेत म्हणतेय, "बघा, हा प्रताप जिओव्हानी लागुना याने केला आहे. अभिनंदन जिओव्हानी! मला हेच हवं होतं की तुझा खरा चेहरा जगासमोर यावा."

धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ ज्या हॉटेलच्या खोलीतील आहे, त्याठिकाणची अवस्था भयानक आहे. खोलीतील सगळं सामान आणि फर्निचर अस्ताव्यस्त पडलेलं व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे, हल्ला करणारा ३३ वर्षीय व्हेनेझुएलाचा प्रसिद्ध स्टायलिस्ट जिओव्हानी लागुना हा त्याच खोलीच्या कोपऱ्यात एका खुर्चीवर शांतपणे बसलेला व्हिडिओत दिसत आहे.

हॉटेलच्या खोलीतून येणारे किंचाळण्याचे आणि मारामारीचे आवाज ऐकून शेजारच्या खोलीतील लोकांनी तात्काळ फ्रान्स पोलिसांना बोलावले. स्पॅनिश पत्रकार जॉर्डी मार्टिन यांनी शेअर केलेल्या एका फुटेजमध्ये, फ्रेंच पोलीस आरोपी जिओव्हानी लागुना याला बेड्या ठोकून हॉटेलबाहेर घेऊन जाताना दिसत आहेत. जिओव्हानी हा लॅटिन अमेरिकन सिनेसृष्टीत आणि ब्युटी पेजेंट क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. २०२३ पासून तो 'मिस युनिव्हर्स कोलंबिया'चा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

या भयंकर हल्ल्यानंतर अँड्रिया डेल वाल हिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सध्या ती धोक्याबाहेर आहे. या दोघांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >