Saturday, May 16, 2026

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानक परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्तव्य बजावत असलेल्या जवानावरच हल्ला झाल्याने रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला काही जण मारहाण करत असल्याची माहिती आरपीएफचे जवान नरेंद्र यादव यांना मिळाली होती. माहिती मिळताच नरेंद्र यादव यांनी तातडीने संबंधित डब्याकडे धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मारहाण करणाऱ्या तिघांना चौकशीसाठी खाली उतरून प्लॅटफॉर्मवर येण्यास सांगितले.

यानंतर रेल्वे कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उतरल्यावर अचानक या तिघांनी आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांच्यावरच हल्ला चढवला. आरोपींनी मिळून जवानाला बेदम मारहाण केली. हा प्रकार अचानक घडल्याने प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ स्थानकात एकच गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपी पोलिसांकडून सुरू असून हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षारक्षकांवरच हल्ले होण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्तव्य बजावत असलेल्या आरपीएफ जवानावर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >