Wednesday, May 13, 2026

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ५६ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयागराज, भदोही, प्रतापगड, फतेहपूर, उन्नाव, कानपूर देहात, चंदौली, सोनभद्र आणि बदायूं या जिल्ह्यांमध्ये वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

जिल्हानिहाय मृत्यूचे तांडव

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, मृतांचा आकडा अत्यंत मोठा आहे. प्रयागराज आणि भदोही जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी १६ मृत्यूची नोंद झाली आहे. त्याखालोखाल फतेहपूरमध्ये ९, बदायूंमध्ये ५, उन्नावमध्ये ४, कानपूर देहातमध्ये ३, चंदौलीत २ आणि सोनभद्रमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने अद्याप एकत्रित अधिकृत आकडेवारी जाहीर केली नसली तरी, जिल्हा प्रशासनाकडून मृतांच्या आकड्याची पुष्टी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तातडीचे आदेश

राज्यातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बाधित क्षेत्रांचा दौरा करून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पुढील २४ तासांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

भदोही आणि फतेहपूरमध्ये मोठे नुकसान

भदोहीमध्ये धुळीच्या वादळामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातात १६ जणांना जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. फतेहपूरमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, ज्यात पाच महिलांचा समावेश आहे. भिंत कोसळल्याने आणि झाडे अंगावर पडल्याने या ठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश त्रिपाठी यांनी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली.

कोणाची भिंत कोसळून तर कोणाचा झाडाखाली दबून मृत्यू

प्रयागराजमध्ये ३५ वर्षीय सविता आणि तिचा ६ वर्षांचा मुलगा भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबले गेले, ज्यात दोघांचाही मृत्यू झाला. हांडियामध्ये १४ वर्षांची मुलगी टिन शेडखाली अडकून दगावली. तसेच, अनेक ठिकाणी आंबा आणि इतर मोठी झाडे उन्मळून पडल्याने प्रवाशांचा आणि गुरांचा मृत्यू झाला आहे. अनेक लहान मुले बागेत खेळत असताना फांद्या तुटून पडल्याने दगावली आहेत.

वीज कोसळल्याने आणि घरांच्या पडझडीने मृत्यूचे सत्र

प्रतापगड आणि कानपूर देहातमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. कानपूर देहातमध्ये एका लग्नसमारंभादरम्यान कच्ची भिंत कोसळून १० वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. प्रतापगडमध्ये वीज पडून आणि टिन शेड अंगावर पडल्याने तीन जणांना प्राण गमवावे लागले. बदायूं आणि सोनभद्रमध्येही झाडे कोसळल्याने आणि धुळीच्या वादळामुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

संपर्क यंत्रणा कोलमडली; मदतकार्यात अडथळे

अतिरिक्त जिल्हाधिकारी कुंवर वीरेंद्र कुमार मौर्य यांनी सांगितले की, वादळामुळे वीज खांब आणि झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत. मोबाइल नेटवर्क विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातून माहिती मिळवण्यात आणि मदतकार्य पोहोचवण्यात सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, सध्या महसूल विभाग, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांना तातडीने पिकांच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment