Wednesday, May 13, 2026

Deputy Chief Minister Eknath Shinde : नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी

Deputy Chief Minister Eknath Shinde : नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी

जमीन संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत १३ आखाड्यांच्या साधू-महंतांशी संवाद साधून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मोठ्या आखाड्याला विकासकामांसाठी ५ कोटी रुपये तरजमिनीच्या संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.याविषयी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या बैठकीत कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजनही करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज असून केवळ चालू वर्षाचा विचार न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कायमस्वरूपी सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्यासाठी एकूण ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून त्यातील ९४ एकर जमीन नाशिक महापालिकेने संपादित केली आहे. उर्वरित २८३ एकर जमिनीच्या संपादनासाठी सरकारने २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, आखाड्यांच्या जमिनी घेताना त्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला. प्रत्येक मोठ्या आखाड्याला विकासकामांसाठी ५ कोटी रुपये, तर लहान संस्थांना १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. आखाड्यांचे वीज बिल स्वतः कुंभमेळा प्राधिकरण भरणार असून पावसाळ्यापासून संरक्षणासाठी तिथे 'रैन बसेरा' उभारला जाईल.१४५० एकरवर भव्य साधुग्रामची निर्मिती केली जाणार असून १५ हजार स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवला जाईल. गोदावरीचे पात्र स्वच्छ आणि निर्मळ राहील यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याशिवाय रस्ते, पार्किंग, पिण्याचे पाणी, सुसज्ज रुग्णालये, आपत्ती व्यवस्थापन आणि महिलांच्या सुरक्षेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या निधीत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment