Tuesday, May 12, 2026

Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या भिंतीचा आसरा घेतला तीच भिंत जीवघेणी ठरली. मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर, कर्नाटक), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा समावेश आहे. उर्वरित तिघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटले. त्यापासून बचावासाठी परिसरातील काही नागरिकांनी मरगुबाई मंदिराकडे धाव घेतली. मंदिराच्या एका भिंतीजवळ आसरा घेतला. त्याच दरम्यान वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मंदिराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून अरुण विष्णू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे आणि कोंडीबा राऊबा गेजगे यांच्यासह सहाजणां मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठजण जखमी झाले आहेत. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >