दखल

जीवनगंध; पूनम राणे


सोहम..., सोहम...”
“अरे, मधे मधे सारखा घोटाळू नकोस. जरा बाजूला हॉलमध्ये जाऊन खेळ बरं... ”
“मी नाही जाणार!” मी इथेच बसणार!
“तुमच्या दोघींसोबत!”
“अरे, तुला कळत कसं नाही आम्ही दोघी महत्त्वाच्या विषयांवर बोलतो आहोत ना”
“पण, पण मला इथेच बसायचे आहे, असं म्हणत कपाटातून मिळालेले बक्षीस बाहेर काढून आजीला दाखवत सोहम म्हणाला, “आजी, आजी, हे बघ, मला चित्रकलेच्या स्पर्धेत बक्षीस मिळालंय...”
“अरे वा! अभिनंदन! असं म्हणून त्याला जवळ घेऊन त्याच्या गालाची पप्पी घेतली, तसा तो उठला आणि पुन्हा कपाट उघडून ड्रेस बाहेर काढून आजीला दाखवत म्हणाला, “आजी, आजी हे बघ माझ्या पप्पांनी आणलाय मला ड्रेस!”
आता मात्र आई जोरात ओरडली,
“सोहम अरे, तुला किती वेळा सांगायचं, मधे मधे येऊ नकोस!”
“बडबड करू नकोस!” जा खेळायचे असेल तर खेळ.” नाही तर चल टीव्ही लावून देते.”
“ टीव्ही पाहायचा नसेल तर, हा घे मोबाइल!” जा एकदाचा बाहेर खेळत बस!”
“टीव्हीबीव्ही मोबाईलबीबाईल,काहीच नको!”
“मला इथेच बसायचं आहे आजीसोबत !”
असं म्हणून सोहम दप्तर घेऊन समोर बसला. दप्तरातून एकेक वही काढत तो आजीला दाखवत म्हणाला, “आजी हे बघ, चित्र शाळेत काढले होते. माझ्या टीचरने मला स्टार दिले, फोर फोर स्टार !”
आता मात्र सोहमच्या आईची सहनशीलता संपली होती. तशी ती पुन्हा रागावून म्हणाली, तुला समजत नाही सोहम. “आम्ही दोघी महत्त्वाचं बोलत आहोत.”
“जा म्हणते ना, बाहेर हॉलमध्ये !”
“मी नाही जाणार, मला इथेच बसायचं
ना गं आई !”
थांब! तू तसा ऐकणार नाहीस?” असं म्हणून त्याच्या पाठीत जोराचा फटका आईने दिला आणि सोहम रडत रडत तेथेच बसला.
सोहमच्या मामाचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे आजी गावावरून लेकीकडे राहायला आली होती. लग्नाकरिता होणाऱ्या खर्चाबाबत, कपडे खरेदीबाबत, दागिने कोणते बनवावेत. याची चर्चा ऐन रंगात आली असतानाच मध्येच सोहम आल्याने त्या दोघींना रंगलेला विषय पूर्ण करता येत नव्हता आणि सोहमला बऱ्याच दिवसांनी आई आणि आजीचा सहवास लाभल्याने तो खूप खूश होता. कारण त्याची आईसुद्धा आज रजा घेऊन घरी थांबली होती.


आपल्या प्रत्येकाच्या घरात असे प्रसंग नेहमी घडत असतात. आपल्या मनातील दबलेल्या विचारांना वाट मोकळी करण्याकरिता आपलं मनापासून ऐकणारं कुणीतरी हवं असतं. अगदी सोहमसारख्या लहान मुलालाही वाटत असतं की आपल्या अस्तित्वाची दखल कुणीतरी घ्यावी.


एवढंच कशाला, आपल्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती आजारी आहे. एकाच जागेवर पडून आहे. उठता येत नाही. अगदी दोन-चार महिन्यांनंतर आपणही कंटाळतो. मग दुर्लक्ष व्हायला लागतं. अशावेळी ती व्यक्ती जोराने खोकून किंवा किंवा समोर असेल ती वस्तू वाजवून समोरच्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. ट्रेनमधून जाताना भिकारी लोक पायाखालील जमा झालेला कचरा कापडाने पुसत स्वत: जमिनीवरून सरपटत त्याच घाणीत बसून निरागसपणे एक हात पुढे करून बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्याकडे पाहत कुणीतरी दखल घेत हातावर पैसे ठेवावेत या अपेक्षेने त्यांची ही कृती चाललेली असते. नोकरी करणारी स्त्री सकाळी अंथरुणाच्या घड्या घालण्यापासून पुन्हा रात्री अंथरून घालेपर्यंत तिची होणारी फरपट त्या फरपटची दखल घरातील लहानथोर यांनी घ्यावी अशी तिची माफक अपेक्षा असतेच. ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मंडळींनाही वाटत असतं आपल्या कामाची दखल वरिष्ठांनी घ्यावी. मात्र दखल न घेतल्याने जगण्यावरचा विश्वास उडून जातो आणि पदरी येते ती निराशा !


मात्र योग्यवेळी योग्य व्यक्तीने दखल घेतल्यास शंभर हत्तीचं बळ त्या व्यक्तीच्या अंगी निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जेमुळे प्रचंड कार्य एखाद्याच्या हातून घडू शकतं.


इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये नवीन अॅडमिशन घेतलेला एक विद्यार्थी तास चालू झाला की मध्येच शिट्टीचा आवाज काढत असे. त्यामुळे बरेच शिक्षक त्याच्यावर चिडत असत. एकदा मराठीच्या नवीन टीचर त्याच्या वर्गावर आल्या. पुन्हा शिट्टीचा आवाज! आता मॅडम रागवल्या नाहीत. त्यांनी समीरला समोर बोलावले व म्हणाल्या, “अरे वा किती छान!” अरे तुझ्या शिट्टी वाजविण्यात मला एक वेगळीच जादू दिसतेय. इकडे सर्वांच्यासमोर ये. शिट्टी वाजवून दाखव.”
समीरला फार आनंद झाला. तो धावतच चपळाईने टेबलाजवळ गेला. कुकरची दबलेली वाफ बाहेर पडावी इतक्या सहजतेने त्याने शिट्टीच्या तालावर एक गाणं म्हणून दाखवले.वर्गातील मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. समीर तू पुढे मोठा गायक होशील! “मॅडम म्हणाल्या. आज समीर कोणतंही गाणं शिट्टीतून गाऊ शकतो.


योग्यवेळी योग्य व्यक्तीने घेतलेली दखल त्या व्यक्तीला त्याच्या बलस्थानांची आठवण करून देत असते. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. थॉमस अल्वा एडिसन याच्या शिक्षिकेने आईला चिठ्ठी लिहून पाठविली होती. हा मुलगा शिकण्याच्या लायकीचा नाही. मात्र त्याच्या आईने निर्णयाच्या या नाजूक क्षणी योग्य ती दखल घेतल्याने आज विजेच्या रूपात, प्रकाश देणारा एडिसन, सर्वांच्या मनात घराघरात प्रकाश रूपी तेवत आहे. मात्र गरज आहे
दिव्यात तेल ओतण्याची अन् जोराच्या वादळ विजांत जपण्याची!

Comments
Add Comment

आएगा आनेवाला...…

स्मृतीपटल; अनिल तोरणे आजकालच्या तांत्रिक युगात सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत; पण एक काळ असा होता की लहानातील

नातं माय-लेकीचं

मातृदिन; प्रसाद कुळकर्णी लेकीच्या लहानपणापासून ते अगदी शिकून सवरून तिला नोकरी लागल्यावरही, तिची काळजी, तिच्या

ताजे निकाल आणि उद्याचे राजकारण

वर्तमान; शंतनू चिंचाळकर - केरळ आणि पश्चिम बंगालमधील संभाव्य सत्तापालट केवळ राज्यांपुरता मर्यादित नसून भारतीय

‘अगर मुझसे मुहब्बत है...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे प्रियकर-प्रेयसी’ किंवा जुन्या साध्या सरळ भाषेत बोलायचे तर भावी ‘पती-पत्नी’च्या

व्यक्तिमत्त्व विकास

मनस्विनी; पूर्णिमा शिंदे व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आपल्यातील अंतरिक, बाह्यशक्ती, गुण समाविष्ट होतात. आपलं

कोकणातील समा उत्सव!

प्रासंगिक :  प्रशांत डिंगणकर कोकणातील शिमग्याला सुरुवात झाली की, एक उत्कंठावर्धक आणि प्रचंड उत्साह वाढवणारा