कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रट ठरु शकतो


स्मृतीपटल : अनिल तोरणे 


अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या कलावंतांमध्ये अत्यंत शालीन आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या अभिनेत्री वहिदा रहमान यांचेही नाव घेतले जाते. एखाद्या गोष्टीवरून भडकून संताप दर्शविण्याऐवजी साधेपणा, नम्रता आणि शालीनतेने वागणाऱ्या वहिदा रहमान यांना त्यांचे परिचित ‘गरीब गाय’ म्हणत असत; परंतु ‘सोलवां साल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सेटवर वेषभूषेवरून वादावादी झाली तेव्हा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राज खोसला यांनी चित्रीकरण मधेच थांबविले. चित्रीकरण आटोपले आहे असेजाहीर करताना वहिदा रहमान यांना खोसला म्हणाले, की कदाचित हा तुमचा अखेरचा चित्रपट ठरू शकतो!


वहिदा रहमान आपले काम अत्यंत गांभीर्याने करीत असत. ‘सीआयडी’ चित्रपटातील रंगेल स्त्रीच्या (व्हॅम्प) भूमिकेसाठी त्यांना जेव्हा करारबद्ध करण्यात आले तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती की ज्या देव आनंद यांच्यासाठी प्रेक्षक वेडे होतात त्यांच्याचबरोबर आपल्याला पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. वहिदा रहमान सेटवर पोहोचल्या तेव्हा उपस्थित असलेले त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राज खोसला यांनी वहिदा यांचा देव आनंद यांच्याशी परिचय करून दिला. देव आनंद यांच्या निस्सीम चाहत्या असणाऱ्या वहिदा रहमान यांना देव आनंद आपल्या पुढ्यात उभे आहेत यावर प्रथम विश्वासच बसला नाही. देव आनंद यांच्याकडे त्या टक लावून पाहातच राहिल्या. हा चमत्कार कसा घडला हेच त्यांच्या लक्षात येईना. आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि बडे कलावंत असणाऱ्या देव आनंद यांना नवोदित वहिदा रहमान यांनी देव साहब असे म्हटले तेव्हा देव आनंद त्यांना म्हणाले, तुम्ही मला केवळ देव असेच म्हणत जा. त्यावर वहिदा रहमान त्यांना म्हणाल्या, मी इतकी असभ्य नाही. आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात आणि फार मोठे कलावंत आहात. मी तर कोणीच नाही. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. ते ऐकून देव आनंद त्यांना म्हणाले, ते काही मला ठाऊक नाही. कारण जेव्हा कोणी मला ‘साहब’ किंवा ‘मिस्टर आनंद’ असे म्हणतात तेव्हा त्या व्यक्तीबरोबर मी काम नाही करू शकत आणि काहीसा दुरावा वाटू लागतो. तुम्ही मला ‘देव’ म्हणालात तर मला वाटेल की मी तुमचा स्नेही आहे.

त्यानंतर संपूर्ण कारकिर्दीत देव आनंद यांना ‘देव’ असे म्हणणाऱ्या वहिदा रहमान यांना ‘सीआयडी’ या चित्रपटानंतर १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोलवां साल’ या चित्रपटात देव आनंद यांच्या नायिकेची भूमिका मिळाली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या चित्रपटातील एका प्रसंगानुसार (सीन) एका तरुणाच्या प्रेमात गुरफटलेली लाजवंती (वहिदा रहमान) नामक तरुणी आत्महत्या करायला जात असते. तिला देव आनंद वाचवितात. नदीत उडी मारल्यामुळे लाजवंतीचे कपडे ओले होतात. जवळच असलेल्या धोबीघाटावर जाऊन ते कपडे सुकेपर्यंत त्यांना दुसरे कपडे घालून देव आनंद यांच्याकडे यायचे असते. या प्रसंगासाठी वहिदा रहमान यांना जे कपडे दिले गेले ते त्यांना परिधान करावयाचे नव्हते. ते पाहून राज खोसला त्यांना म्हणाले, की आपणांस या कपड्यांमध्ये अवघडल्यासारखे वाटत असेल तर ते परिधान करू नका; पण सेटवर येताना हसतमुखाने येत जा. राज खोसला यांनी असे सांगितल्यावर वहिदा रहमान यांना जी वेशभूषा सोईची वाटली ती करून त्या गेल्या. वहिदा यांनी घातलेले कपडे राज खोसला यांना अजिबात न आवडल्याने ते त्यांना म्हणाले, वहिदाजी हा आपला तिसराच चित्रपट आहे आणि हाच आपला शेवटचा चित्रपटही ठरू शकतो. कारण आपण आतापासूनच स्वत:च्या मनाप्रमाणे वागू लागला आहात आणि अटही घालत आहात. राज खोसला यांनी रागाच्या भरात देव आनंद यांच्या उपस्थितीतच तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना चित्रीकरण आटोपण्याचा (पॅक अप) आदेश दिला.


चित्रीकरण आटोपण्याचा आदेश ऐकल्यावर वहिदा रहमान घरी जाण्याच्या बेतात असताना त्यांच्या मातोश्रींनी चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत सी. देसाई यांना विचारले, की दिग्दर्शक खोसला यांनी चिडून वेळेआधी चित्रीकरण थांबविले असल्याने उद्या आम्ही यायचे की नाही? वहिदा यांच्या मातोश्रींचा प्रश्न ऐकून निर्माते देसाई त्यांना म्हणाले, की मी फोन करून तुम्हाला कळवेन. दुसऱ्या दिवशी देसाई यांनी वहिदा रहमान यांच्याशी संपर्क साधून त्यांना सेटवर यावयास सांगितले. वहिदा सेटवर पोहोचल्यावर देव आनंद यांनी वहिदा यांची बाजू घेत राज खोसला यांना म्हटले, की वहिदा तर्कशुद्धपणे जे काही सांगत होत्या ते अगदी खरे होते. या चित्रपटातील लाजवंती ही व्यक्तिरेखा लाजाळू तरुणीची आहे आणि अशी लाजाळू तरुणी शरीरप्रदर्शन करणारे कपडे परिधान करून परक्या पुरुषाच्या शेजारी कशी बसेल? हे चुकीचेच आहे. वहिदा जे सांगत होत्या ते योग्यच होते आणि आपण विनाकारणच चिडलात! चित्रपट क्षेत्रात त्या नवख्या असतील; पण बोलत होत्या समंजसपणेच! देव आनंद यांनी अत्यंत समजूतदारपणे आणि शांतपणे आपली बाजू दिग्दर्शक राज खोसला यांना पटवून दिली हे पाहून वहिदा रहमान यांना अतिशय समाधान वाटले.
Comments
Add Comment

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

पहिला पाऊस

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे येरे येरे पावसा... खूप सुंदर कविता. तुमच्या आमच्या बालपणातील. उन्हाच्या झळांनी लाहीलाही

‌‘समते‌’त ‌‘समता‌’ शोधण्याचा प्रयत्न

  वेध: आरिफ शेख भारतीय समाजात आरक्षण हा विषय जितका राजकीय आहे, तितकाच तो भावनिक आणि ऐतिहासिकही आहे. आरक्षणाच्या

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर