आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू
चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन येतात तेव्हा त्यांची मने धास्तावलेली असतात. आपण नेमके कुठे कमी पडतोय या विचारांनी ते अपराधी भावना घेऊन जगतात. पालकांनो, हे समजून घ्या की किशोरवयात मुलं-मुली पटकन मित्रांच्या प्रभावाखाली जातात. इन्फ्लुएन्स होतात.
ओरडून किंवा सतत बंदी घालून प्रश्न सुटत नाही; उलट अशाने ते गोष्टी अधिक लपवू लागतात. अशावेळी परिस्थिती शांतपणे, विश्वासाने आणि सातत्याने हाताळणे जास्त उपयोगी पडते.
मुलांना चुकीच्या संगतीपासून वाचवायचं असेल, बाहेर काढायचं असेल तर हे उपाय करता येतील.
१)“तू चुकीचा/चुकीची आहेस” असे लगेच म्हणू नका
२) आधी त्यांचं ऐका. “तुला यात काय आवडतं?” असा प्रश्न विचारा. ऐकलं गेलं की मुलं जास्त मोकळेपणाने बोलतात.
३) घरात “नो जजमेंट टाइम” ठेवा. रोज १५ मिनिटे मोबाईलशिवाय गप्पा होऊ द्या. त्या वेळेत आरडाओरड नाही, ब्लेमेगम नाही, फक्त संवाद हवा.
४) वाईट संगतीवर थेट बंदी नको. “त्या मित्रांना भेटू नको” म्हणण्याऐवजी त्यांना चांगले पर्याय द्या. उदा. खेळ, संगीत, जिम, ट्रेक, क्लासेस इत्यादी.
५) अपमानास्पद भाषेला शांतपणे उत्तर द्या. “आपल्या घरात आदराने बोलायचं” हा नियम ठेवा. तुम्हीही तसंच बोला. मुलं शब्दांपेक्षा वागणूक कॉपी करतात.
६) कपड्यांवरून अपमान करू नका. “हे कपडे वाईट आहेत” म्हणण्याऐवजी “वेगवेगळ्या जागेनुसार कपडे निवडले तर छान दिसतं” असं सांगा.
७) फोटो शेअरिंगचे धोके उदाहरणांनी समजवा. घाबरवू नका, शांतपणे सांगा की एकदा एक फोटो टाकला, तर तो कायम इंटरनेटवर राहू शकतो.
८) मोबाईल हिसकावू नका, नियम तयार करा. रात्री ठरावीक वेळेनंतर फोन बाहेर ठेवणे, अभ्यास करताना/जेवताना फोन नाही - नियम सगळ्यांसाठी समान ठेवा.
९) त्यांच्या मित्रांशी ओळख करून घ्या. मित्रांना घरी बोलवा. घरचं वातावरण चांगलं असेल तर मुलंही
जपून वागतात.
१०) “नाही” म्हणायची प्रॅक्टिस करायला लावा. चुकीच्या गोष्टींना नाही का म्हणायचं ते शिकवा. “जर मित्रमैत्रिणी जबरदस्ती करत असतील, तर मला हे कम्फर्टेबल नाही” असं आत्मविश्वासाने बोलायला शिकवा.
११) चुका झाल्या तरी साथ सोडू नका. शिक्षा करण्यापेक्षा परिणाम समजवा. “तुझ्यावर माझा विश्वास आहे” हे ऐकण्याची त्यांना खूप गरज असते.
१२)आई-वडील म्हणून तुम्ही स्वतः उदाहरण बना. घरात आदराने बोलणं, स्क्रीन टाइम नियंत्रण, सभ्य वागणूक - हेच सर्वात प्रभावी शिक्षण असतं.
१३)आठवड्यातून एकदा “फॅमिली आउटिंग किंवा एकत्र काम” — स्वयंपाक, क्रिकेट, फिरणं असे होऊ दे. नातं मजबूत झालं की बाहेरचा चुकीचा प्रभाव कमी होतो.
जर वागणूक खूप आक्रमक झाली, सतत खोटं बोलणं, अभ्यास पूर्णपणे बिघडणं किंवा धोकादायक ऑनलाइन वागणूक दिसली तर समुपदेशकाची मदत घेणे उपयोगी
ठरू शकते.या काळात किशोरवय, चुकीची संगत आणि पालकांची खरी परीक्षा असते. अनेक पालकांच्या मनात एकच चिंता दिसते - “आपली मुलं नेमकी कुठे चालली आहेत?”
मोबाईल, सोशल मीडिया, चुकीची मैत्री, शिवीगाळ, उघडे कपडे, सतत चॅटिंग, फोटो शेअर करणे… या गोष्टी पाहिल्या की पालक घाबरतात. राग येतो. कधी लाज वाटते. कधी असंही वाटतं की, आपलं मूल हातातून निसटत
चाललं आहे.पण खरं सांगायचं तर, प्रत्येक किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी वाईट नसते. ते फक्त एका अशा वयातून जात असतात जिथे त्यांना स्वतःची ओळख शोधायची असते. त्यांना “मोठं” वाटायचं असतं. मित्रांच्या गटात स्वीकार मिळवायचा असतो आणि याच शोधात कधी कधी ते चुकीच्या मार्गाकडे वळतात.
पूर्वी मुलं मैदानात जास्त हरवायची, आज ती मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवतात.
पूर्वी चुकीची संगत गल्लीत भेटायची, आता ती सोशल मीडियावर एका
क्लिकमध्ये मिळते.
म्हणूनच आज पालकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. अनेक पालक रागाच्या भरात
मुलांवर ओरडतात -
“हे कपडे घालू नकोस!”
“त्या मित्रांशी बोलू नकोस!”
“फोन काढून घेईन!”
पण भीती आणि बंदी यामुळे मुलं सुधारत नाहीत; ती फक्त अधिक लपून वागायला शिकतात.
जिथे संवाद संपतो, तिथून अंतर सुरू होतं. मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती समजून घेणाऱ्या माणसाची.
त्यांच्या आयुष्यात जर घरात कोणी शांतपणे ऐकणारं नसेल, तर ते बाहेर आधार शोधतात. कधी चुकीच्या मित्रांमध्ये, कधी इंटरनेटवर.
पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा -
“मी शेवटचं माझ्या मुलाशी मनापासून कधी
बोललो होतो?”
फक्त अभ्यास, मार्क्स, चुका आणि शिस्त यावर बोलणं म्हणजे संवाद नाही. कधी कधी मुलांना फक्त एवढंच हवं असतं की कोणी तरी त्यांचं न बोललेलंही समजून घ्यावं.
आज अनेक मुलं शिवीगाळ करतात, कारण त्यांना ते “कूल” वाटतं. अनेक मुली किंवा मुलं वेगळे कपडे घालतात, कारण त्यांना स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं.
काही जण सतत फोटो शेअर करतात, कारण त्यांना लाइक्समध्ये स्वतःची किंमत दिसते.
हे चूक आहे, पण त्यामागे एक भावनिक रिकामेपणाही असतो. म्हणून उपाय फक्त नियमांमध्ये नाही; उपाय
नात्यात आहे.
घरात असा माहोल हवा जिथे मुलांना भीती नाही तर विश्वास वाटेल.
पालकांनी मुलांना सतत कंट्रोल करण्याऐवजी त्यांच्यासोबत चालायला शिकायला हवं.
दररोज थोडा वेळ मोबाईलशिवाय एकत्र बसणं, एकत्र जेवणं, फिरायला जाणं, छोट्या गोष्टींवर हसणं - या साध्या गोष्टी नातं मजबूत करतात. मुलांच्या आवडी निवडी
समजून घ्या.
त्यांच्या जगात प्रवेश करा.
कारण जेव्हा घरात प्रेमाचं वातावरण असतं, तेव्हा बाहेरची चुकीची आकर्षणं हळूहळू कमी होतात.
मुलांना फक्त “हे करू नको” सांगण्यापेक्षा “का करू नये” हे शांतपणे समजावून सांगणं महत्त्वाचं आहे.
उदाहरणार्थ, फोटो शेअर करण्याचे धोके, ऑनलाइन फसवणूक, चुकीच्या नात्यांचे परिणाम - हे रागाने नाही तर विश्वासाने सांगायला हवं.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी -
किशोरवय म्हणजे वादळासारखं असतं.
या काळात मुलं चुकू शकतात, हट्टी होऊ शकतात, उलट उत्तर देऊ शकतात. पण याचा अर्थ ते कायमचे बिघडले आहेत असा होत नाही.
प्रेम, संयम आणि सातत्य यांची ताकद खूप मोठी असते.
पालकांनी स्वतःचं वागणंही तपासायला हवं.
घरात जर सतत भांडणं, अपमान, ओरड किंवा मोबाईलमध्ये हरवलेले आई-वडील असतील, तर मुलांकडून वेगळी अपेक्षा करणं कठीण होतं.
मुलं शब्दांपेक्षा वागणूक जास्त शिकतात.
आजच्या मुलांना फक्त शिक्षण नाही, तर भावनिक आधाराची गरज आहे.
त्यांना असा कोणी हवा जो म्हणेल -
“चूक झाली तरी मी तुझ्यासोबत आहे.”
हे एक वाक्य मुलाला पुन्हा योग्य मार्गावर आणू शकतं.
समाज बदलतो आहे. काळ बदलतो आहे.
म्हणून फक्त मुलांनी बदलायला हवं असं नाही; पालकांनीही समजून घेण्याची पद्धत बदलायला हवी.
कडक शिस्त आवश्यक आहे, पण त्याहून जास्त आवश्यक आहे मायेचा हात. कारण प्रेमाने जिंकलेली मुलं आयुष्यभर नातं जपतात; भीतीने दबलेली मुलं मात्र एक दिवस दूर जातात.
शेवटी इतकंच -
मुलांना योग्य मार्ग दाखवायचा असेल, तर त्यांच्या पुढे चालू नका आणि मागेही उभे राहू नका…. त्यांच्यासोबत चालायला शिका. कारण प्रत्येक हट्टी मुलाच्या मनात एक गोंधळलेलं, पण प्रेम शोधणारं छोटंसं मन दडलेलं असतं.
(पुढील भाग २१ च्या रविवारी)