स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर
वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई यांच्यावर बोलण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने मनाला स्फुरण देणाऱ्या या लोकमातेच्या चरित्राचे, संदर्भपुस्तकांचे मी पुन्हा एकदा वाचन केले. प्रत्येक भेटीत माणूस आपल्याला नव्याने उलगडत जातो, त्याप्रमाणेच आपण थोरामोठ्यांच्या चरित्राचे वाचन जितक्या वेळा करू तितक्या वेळा नवनवीन पैलू उलगडत जातात. प्रजेला आपलं अपत्य मानणाऱ्या अहिल्याबाई, ही या राज्यकर्तीची महत्त्वपूर्ण ओळख. आपली प्रजा, हेच आपलं अपत्य, हा केवढा मोठा विचार त्यांनी जगाला दिला. प्रजेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी एका आईची असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या राज्य चालविण्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच दिसून येतो.
अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांसोबतच आपल्या प्रजेचं भावनिक, सामाजिक व आर्थिक सबलीकरण इथपर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार आहे. विविध ठिकाणच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन मंदिरांची निर्मिती, विविध घाट नि विहिरींचे बांधकाम, धर्मशाळा व अन्नछत्रांची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली. या कामाचा विस्तार केवळ इंदोर व मावळ यापुरता मर्यादित नाही, तर भारतभर त्यांनी हे कार्य केले. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर,जेजुरी, कोल्हापूर, सातारा अशा विविध ठिकाणी तर तिकडे दक्षिणेत श्री शैल, कर्नाटक उत्तरेला अयोध्या, काशी, हरिद्वार, गंगोत्री, राजस्थानातील पुष्कर, नाथद्वारा तसेच उज्जैनी, महेश्वर, कुरुक्षेत्र अशा भारतातल्या चारही दिशांतील विविध ठिकाणी त्यांनी कार्य केले. १७ व्या शतकाचा काळ जेव्हा दळणवळणाची जलद साधनं देखील उपलब्ध नव्हती, अशा काळात अहिल्याबाई यांच्या कार्याचा सर्वक्षेत्रीय विस्तार अचंबित करणारा आहे. या कामामागची प्रेरणा धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन मानवकल्याणाची अधिक होती. जातीपातीचा कोणताही भेदभाव न करता आपल्या प्रजेच्या पाणी, अन्न, निवारा या मूलभूत गरजांचा विचार नि भक्तिभावातून सदाचारी प्रजा घडवणे ही स्पष्ट उद्दिष्टे त्यांच्या कार्यामागे होती. लोकमाता अहिल्याबाई यांची महादेवावर प्रचंड श्रद्धा होती. महादेवाच्या भक्तीतून मिळालेली शक्ती हे त्यांच्या कार्यामागचे अलौकिक अधिष्ठान होते. त्यांच्या मनातील परमेश्वरावरील श्रद्धा जनमानसात अवतरली ती ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या प्रगल्भ विचारातून.
अहिल्याबाई यांनी प्रजेसमोर आपल्या कृतीतून समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला. मनात आईचे ममत्व असणाऱ्या अहिल्याबाई होळकर या आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ व हितार्थ तितक्याच बाणेदार नि कठोरही होत्या.राज्यकारभारात त्यांनी राखलेली आर्थिक शिस्त कमालीची होती. खासगी तिजोरी आणि सरकारी तिजोरी ही शिस्त त्यांनी स्वतः पाळलीच पण आपल्या निकटवर्तीयांनाही कोणतीही दयामाया न दाखवता सक्तीने पाळायला लावली. या गोष्टीला त्यांचे पती खंडेराव हेदेखील अपवाद ठरले नाहीत. मोहिमेहून परतल्यावर राजवाड्यात आणलेली लूट पाहून त्या आपल्या पतीवर संतापतात आणि स्वतः ताबडतोब रात्रीच्या रात्री ती सगळी संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करतात. असे अनेक प्रसंग आपल्याला त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात. विशेष म्हणजे या महाराणीने जो दानधर्म केला, मंदिर, घाट,अन्नछत्र बांधली त्याचा भार सरकारी तिजोरीवर न टाकता खासगी संपत्तीतून तो खर्च केला. वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई होऊन मालवत आल्या. अहिल्याबाई यांची युद्धकौशल्यापासून ते विचारांची जडणघडण झाली ती मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली. मल्हारराव होळकर यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला म्हणजेच अहिल्याबाई यांना सती जाण्यापासून रोखले आणि त्यांच्या हाती राज्यकारभार दिला. सुभेदार मल्हारराव यांचा विश्वास अहिल्याबाई यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सार्थ ठरवला. पतीच्या निधनानंतर काही काळाने त्यांचे सासरे मल्हारराव निधन पावले. त्यांनतर पुत्र मालेराव याचेही काही काळाने निधन झाले. अहिल्याबाई पुत्रवियोगाच्या दुःखात असताना होळकरांच्या धनदौलतीवर, राज्यावर कब्जा करण्याचे कटकारस्थान बंधुस्थानी असणाऱ्या गंगोबातात्या चंद्रचूड यांनी राघोबादादांना हाताशी धरून रचले होते. या कटकारस्थानाचा सुगावा लागताच पुत्रवियोगाचे दुःख बाजूला सारून ही रणरागिणी युद्धास सज्ज झाली. अहिल्याबाई यांच्यात संचारलेली वीरश्री पाहून राघोबातात्या यांना घाम फुटला आणि खजील होऊन ‘आम्ही तर तुमच्या सांत्वनासाठी आलो होतो.” असा खोटा आविर्भाव त्यांना घ्यावा लागला होता. आपल्या पोटच्या मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून पुत्रवत प्रजेच्या रक्षणासाठी हातात समशेर घेणारी ही महाराणी खऱ्या अर्थाने लोकमाता होती.
महेश्वर हे ठिकाण अहिल्याबाई यांच्या राज्याची राजधानी होती. अहिल्याबाई यांच्या दूरदृष्टीमुळे हे ठिकाण केवळ सत्तेचे राजकीय केंद्र न बनता कला, संस्कृती व उद्योगशीलतेचे माहेरघर बनले. विणकरांच्या कला कौशल्यांना प्रोत्साहन देत त्यांनी कला व उद्योगाची सांगड घालत ‘महेश्वरी’ साडीच्या निर्मितीला पाठबळ दिले. ती महेश्वरी साडी आजही लोकप्रिय आहे. लोकमाता अहिल्याबाई यांनी प्रजेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कुक्कुटपालन उद्योगाची पायाभरणी केली होती. या महाराणीने स्त्रियांची फौज देखील उभारली होती असा संदर्भ आपल्याला त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतो. प्रजेच्या सर्वंकष कल्याणासाठी दूरदृष्टीने ध्येयधोरण आखणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे विचार येणाऱ्या काळाची पावले अचूकपणे ओळखणारे होते, ज्यामुळे त्यांचे चरित्र केवळ इतिहासाचा एक अध्याय न ठरता येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी पथदर्शी ठरणारे आहे.