Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात होत असलेली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास आता निश्चित झाले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
मविआचं सूत्र जुळलं , काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा
उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू केली होती. पण ठाकरेंच्या शिष्टमंडळाने काँग्रेस नेत्यांची भेट घेत समजूत काढली. अखेर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेसेनेचे अनिल देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
महत्त्वाचे कारण समोर
विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालं आहे. कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील. भाजपकडून 6, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मविआकडून 1 उमेदवारांचा अर्ज दाखल झाला आहे.
भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी
प्रमोद जठार सुनील कर्जतकर माधवी नाईक संजय भेंडे विवेक कोल्हे प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी
महाविकास आघाडी- अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी
बच्चू कडू नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी
झिशान सिद्दीकी
विधान परिषदेतील या 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा) नीलम गोऱ्हे (शिवसेना) अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट) गोपीचंद पडळकर (भाजप) रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप) राजेश राठोड (काँग्रेस) रमेश कराड (भाजप) प्रवीण दटके (भाजप)






