विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटील
सहलीला गेले असताना शिवम त्याच्या मित्रांना माहिती सांगत होता. “आपल्या लाडक्या पृथ्वीचे खास वैशिष्ट्य काय आहे?” मंगलने मुद्दामहून प्रश्न केला.“ते तर सर्वांनाच माहीत आहे.” शिवम साऱ्यांकडे बघत म्हणाला. “पृथ्वीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिच्याभोवती वातावरण असल्याने तीवर सजीव प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती आहेत. इतर ग्रहांवर मात्र नाहीत. तसेच पृथ्वीवर पाणी खूप जास्त प्रमाणात आहे.”
“पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे व त्याभोवती पृथ्वी किती वेळात फिरते?” कौशलने विचारले. “आपल्या पृथ्वीपासून सूर्य १४ कोटी ९६ लक्ष कि.मी. दूर आहे. तिच्या स्वत:भोवतीच्या परिवलनामुळेच दिवस-रात्र होतात. पृथ्वीचा स्वत:भोवतीचा परिवलन काळ २४ तास म्हणजे एका दिवसाचा आहे, तर सूर्याभोवतीचा परिभ्रमणकाळ ३६५ दिवसांचा म्हणजे एक वर्षाचा आहे. तिचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग ताशी १०४० मैल आहे.” शिवमने सांगितले.
“काय नवल आहे बघा!” आता ही वैज्ञानिक माहिती ऐकता ऐकता विशाललाही त्यात रस निर्माण झाल्याने तोही मध्येच बोलला, “आपल्याला पृथ्वी स्थिर वाटते आणि सूर्य चालताना दिसतो.” त्याचे कारण असे आहे की, आपण पृथ्वीवर राहत आहोत म्हणून आपल्याला पृथ्वी ही स्थिर आणि सूर्य चालताना भासतो. वास्तविक पृथ्वीच सतत स्वत:भोवती व त्याचवेळी सूर्याभोवतीही फिरत असते.” शिवम म्हणाला. “बरे, मी पृथ्वीच्या अपसूर्य व उपसूर्य स्थितीबद्दल मागे एकदा वाचले होते पण आता काही आठवत नाही. त्या स्थिती म्हणजे काय असतात गड्या?” कुणाललाही आता आवड निर्माण झाली व त्यानेही मध्येच आपल्या शंकेची पाचर मारली.
“पृथ्वी आकाराने पूर्णत: वर्तुळाकार म्हणजे चेंडूसारखी गोल नसून संत्र्यासारखी गोल नि वर व खाली धुवांजवळ किंचितशी चपटी आहे आणि मध्यबाह्य भागात किंचितशी फुगीर आहे. पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा ही तंतोतंत वर्तुळाकार नसून थोडीशी लंबगोलाकार आहे. त्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना कधी ती सूर्यापासून जास्त अंतरावर असते, तर कधी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ती सूर्यापासून जास्त दूर असते तेव्हा त्या स्थितीस अपसूर्य स्थिती असे म्हणतात, तर ती सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीस उपसूर्य असे म्हणतात.” शिवमने सांगितले.
“पण आपणास तर पृथ्वी ही सपाट दिसते.” आतापर्यंत त्यांच्या गप्पा ऐकत तेथेच बाजूला बसलेल्या एका यात्रेकरूनी विचारले व तोही त्यांच्याजवळ येऊन बसला. “काका” शिवम म्हणाला, “आपली पृथ्वी आपणास सपाट दिसते कारण आपण तीवरच राहतो. तसेच आपल्या नजरेच्या टप्प्याच्या मानाने तिचा आकार खूप खूप मोठा असल्याने तिच्या पृष्ठभागाचा वाकसुद्धा अतिशय मोठा आहे. म्हणून आपल्या नजरेच्या टप्प्यात ती आपणास सपाटच दिसते. पण तीही सपाट नसून गोलाकारच आहे. असो. ”
“आता आपण आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे पृथ्वीवर खडक-दगड कसे निर्माण झालेत ह्याकडे वळू.” शिवम पुढे सांगू लागला, “पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती-रेती साचून घट्ट बनलेल्या गोळ्यास खडक म्हणतात. माती-रेतीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार खडकही विविध प्रकारचे असतात. सुरुवातीला आपली पृथ्वीसुद्धा अत्यंत उष्ण असा वायूंचा गोळाच होती. खूप कालांतराने ती हळूहळू थंड होत गेली. बऱ्याच कालावधीनंतर तिच्याभोवती वातावरण तयार होत गेले. काही काळानंतर तीवर पडलेल्या पावसाने ती गोठत गेली व घन होत गेली नि कडक बनत गेली. थंडावतांना त्यावर पापुद्रा निर्माण झाला. तो हळूहळू कठीण, कडक होत गेला. पृथ्वीच्या कडक अशा बाह्य थरांनी बनलेल्या गोलाकार भागाला भूकवच म्हणतात. त्याचेच कुठे कठीण खडक बनले, कुठे नरम खडक तयार झालेत, तर कुठे प्रचंड कडक दगड, विशाल काळेशार पाषाण बनलेत.”






