‘इस शहर मे हर शख्स परेशानसा क्यों हैं?’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


आपल्या पहिल्याच चित्रपटाला ‘लक्षणीय चित्रपट दिग्दर्शना’साठी राष्ट्रीय पारितोषिक मिळवणाऱ्या मुज्जफर अलींनी विश्वनाथ उर्फ नाना पाटेकरला पहिली संधी दिली १९७८ला! गंमत म्हणजे ज्या सिनेमाने विश्वनाथ पाटेकरचे सिनेसृष्टीत ‘आगमन’ झाले त्याचे नाम मात्र होते ‘गमन’!


मुज्जफर अलींनी त्यानंतर ५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळवून देणारा रेखाकेंद्रित, ‘उमराव जान’(१९८१), लगेच आलेला १९८२चा ‘आगमन’, ‘अंजुमन (१९८६), ‘जानिसार’(२०१५), आणि १९८०ला डिम्पल कपाडीयाला घेऊन सुरू केलेला परंतु अर्धवट राहिलेला ‘झुनी’. भारत सरकारने त्यांना २००५ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविले.


उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या मुज्जफर अलींना मुंबईतील स्थलांतरितांचे एकटेपण, अगतिकता आणि विमनस्कता तीव्रपणे जाणवली. ‘गमन’ हा त्याचा परिणाम होता. ‘गमन’मध्ये त्यांनी फारुख शेख (गुलाम हसन) आणि स्मिता पाटील (खैरून) या जोडीबरोबर गीता सिद्धार्थ (यशोधरा), जलाल आगा (लल्लुलाल तिवारी), नाना पाटेकर (वासू), सुलभा देशपांडे (वासूची आई), सतीश शहा, प्रतिमा बेदी, अरविंद देशपांडे असे अनेक गुणी कलाकार घेतले.


समीक्षकांनी ‘गम’नची चांगली नोंद घेतली. त्यासाठी लक्षणीय सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार अलींना तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार छाया गांगुलीना (‘आपकी याद आती रही रातभर’साठी) आणि सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार जयदेव यांना मिळाला.


उत्तर प्रदेशातील खेरी गावाचा ८ वीपर्यंत शिकलेला गरीब तरुण गुलाम हसनला (फारुख शेख) त्याचा मुंबईतला मित्र जलाल आगा (लल्लुलाल तिवारी) मुंबईत गाड्या पुसायचे काम मिळवून देतो. आपली प्रेमळ पत्नी खैरून (स्मिता पाटील) आणि आजारी आईला सोडून तो मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेला असतो. तो हळूहळू टॅक्सी चालवायला शिकतो. कितीही कष्ट केले तरी त्याला आजारी आईला भेटायला जाणेही शक्य होत नाही.


लल्लू प्रेयसी यशोधराशी (गीता सिद्धार्थ) लग्न करण्याकरता चांगले घरही भाड्याने घेऊ शकत नाही. यशोधराच्या घरच्यांना तिचे लाल्लूशी असलेले प्रेम मान्य नसते. उलट यशोधराच्या कामचुकार भावाला (नाना पाटेकर) तिच्या पैशावर जगायचे असते. भावाच्या ओळखीने ‘दलाला’मार्फत दुबईत गेल्यावर आपले काय होणार हे माहीत असल्याने ती जायला तयार नसते. गुलाम मुंबईच्या झोपडपट्टीतले असे एकेक अनुभव घेऊन अस्वस्थ असतो. मुंबईकरांना जे कधीच जाणवू शकत नाही ते मुंबईचे अमानुषपण त्याला रोज दिसत असते. एकदा तो ज्या लोकलमध्ये जात असतो ती रुळावर कुणीतरी पडल्यामुळे अडकते. त्यावेळी लोकांचे आपसातले संवाद दिग्दर्शकाने प्रेक्षकांना ऐकवले आहेत.


“कोई गिर गया हैं गाडीके नीचे.”
“अब पुलिस आयेगी, पंचनामा होगा... बहुत टाईम जायेगा यार!”


“ऐसे टाईम डेड बॉडी हटाकर अपनी गाडी स्टार्ट करना चाहिये! बेवजह टाईमकी खोटी क्यो?” असल्या माणुसकीशून्य संवादांची अजिबात सवय नसलेला गुलाम आजूबाजूची गरिबी, वासूचे चक्क बहिणीला धंद्याला लावून ऐश करण्याचे स्वप्न, शहरात सहज दिसणारा असा घृणास्पद स्वार्थ, मानवी संबंधातली क्रूरता या सर्वांमुळे प्रचंड अस्वस्थ होतो. झोपडपट्टीत राहणारे गरीब आपले माणूसपण कसे गमावून बसतात हे त्याला रोज दिसत असते. जे नशीब काढायला तो मुंबईत आला त्याचा तर मागमूसही दूरदूरपर्यंत दिसत नाही!


शेवटी जेव्हा यशोधराच्या घरचे लोक तिला दुबईत पाठवण्याच्या कामातला अडथळा बनलेल्या, गुलामचा एकमेव आधार असलेल्या लल्लूचा खून करतात तेव्हा त्याचा जगण्यावरचा विश्वासच उडतो आणि तो गावाकडे परत जायला निघतो. मात्र व्ही.टी. स्टेशनवर उभा असताना आपल्याकडे आस लावून बसलेल्या पत्नीचा, खंगलेल्या आजारी आईचा चेहरा आठवल्यावर त्याला जाणे रद्द करावे लागते. अशी ही स्थलांतरित गरिबांच्या जगण्याचे अत्यंत वास्तव चित्रण असलेली अस्वस्थ करणारी कथा! गमन हा अलींनी दिग्दर्शित केलेला एक अतिशय अभिजात चित्रपट! त्यातली गाणी पै. मकदूम मोइनुद्दिन आणि शहरयार यांनी लिहिली होती. सुरेश वाडकरांनी गायलेली शहरयार यांची एक गझल शहरी जीवनातील विदारक वास्तवाचे प्रांजळ आणि कल्पक चित्रीकरण दाखवून आपल्याला अंतर्मुख करते. लाखो स्थलांतरित मुंबईकरांचे दु:ख उघड करणारे तिचे शब्द होते -


“सीनेमें जलन, आँखोंमें तूफ़ान सा क्यों है?
इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यों है?”


महानगरांचा वरवरचा झगमगाट सोडला तर त्यामागे दडलेले लाखो लोकांसाठीचे सत्य हेच असते. मनात तडफड आणि नजरेत टोकाची अस्वस्थता घेऊनच बहुसंख्य लोक कसेबसे जगत असतात. उराशी अनेक स्वप्नं घेऊन देशभरातल्या खेड्यापाड्यातून आलेले बेघर लोक सतत बैचेन असतात. पण बाहेरून त्यांना काहीच जाणवत नाही असे पाहणाऱ्याला वाटत राहते. कवीला विचारतो, ‘यांनाही हृदय आहे ना, मग ते धडधड का करत नाही? सगळ्यांची मने दगडासारखी इतकी संवेदनाहीन का झालीत?’


“दिल है तो धड़कनेका बहाना कोई ढूँढे,
पत्थरकी तरह बे-हिस ओ बे-जानसा क्यों है?”


प्रचंड गर्दीतही महानगरातला माणूस आतून एकाकी असतो. श्रीमंत असो की गरीब, कमालीच्या एकटेपणाने त्याला घेरलेले असते. माणसाचे माणसापासूनचे तुटलेपण हे शहरी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कवीला प्रश्न पडतो की अजून हे भयाण वास्तव किती वाढणार? जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ही वस्ती नुसते कोरडेठाक वाळवंट का वाटू लागली आहे?


“तन्हाईकी ये कौनसी मंज़िल है रफ़ीक़ो
ता-हद्द-ए-नज़र एक बयाबानसा क्यों है?”


कवी म्हणतो, ‘मी कोणत्याच दु:खाचा उल्लेखसुद्धा केला नाही मग इथला प्रत्येकजण असा पश्चातापाने इतका हैराण का वाटतोय?


“हमने तो कोई बात निकाली नहीं ग़मकी
वो ज़ूद-पशेमान पशेमानसा क्यों है?”


मानवी जाणिवाच हरवून बसलेले शहर माणसाला संवेदनशून्य करून टाकते! जेव्हा तो अंतर्मुख होऊन भूतकाळातले आपलेच रूप आठवतो तेव्हा त्याला वाटते आता आपण इतके बदललो आहोत की कदाचित आरसासुद्धा आपल्याला ओळखणार नाही!


“क्या कोई नई बात नज़र आती है हममें?
आईना हमें देखके हैरानसा क्यों है?”


एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी समाजाच्या सुखदु:खाबाबत किती संवेदनशील होती ते दाखवणारे असे काही पुरावे अजूनही सापडतात. अर्थात बेगडी वैभव, नितीमत्ताशून्य चंगळ आणि सवंग मनोरंजन यांचा मोह सोडून शोध घेतला तर!

Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी