Friday, April 24, 2026

Minister Adv. Shelar : वृद्ध कलावंतांची प्रलंबित आधार पडताळणी तात्काळ करा - मंत्री ॲड.शेलार यांचे निर्देश

Minister Adv. Shelar : वृद्ध कलावंतांची प्रलंबित आधार पडताळणी तात्काळ करा - मंत्री ॲड.शेलार यांचे निर्देश

वृद्ध कलावंताना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई:  राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यात अडथळा ठरणाऱ्या आधार पडताळणी प्रक्रियेची तातडीने पूर्तता करून या वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काल मिळायला पाहिजे. तसेच निष्क्रिय असलेले ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ त्वरीत कार्यान्वित करावीत, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ‘आपले सरकार सेवा केंद्रे’, आधार सेवा आणि वृद्ध कलावंत मानधन यासंदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महाआयटी संचालक भुवनेश्वरी तसेच जिल्हाधिकारी जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, मुंबई उपनगर उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, जालना, लातूर, परभणी, बुलढाणा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंतांचे आधार पडताळणी प्रलंबित असल्यामुळे त्यांना मानधन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यावर संबंधित जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करून पात्र कलावंतांना लवकरात लवकर मानधन द्यावे.

राज्यातील जी ‘आपले सरकार सेवा केंद्र निष्क्रीय म्हणजे ज्या केंद्रांवर कोणतेही व्यवहार होत नाहीत, अशा सर्व निष्क्रिय केंद्रांची तपासणी करून ती तातडीने सुरू करावीत किंवा आवश्यक असल्यास त्यांचे पुनर्स्थापन करावे, असे निर्देशही मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

मुंबई उपनगरात आधार सेवांची वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध जागेअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महापालिका शाळा व महाविद्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा