Friday, April 24, 2026

Yamini Jadhav : महापालिका सभागृहात यामिनी जाधव कडाडल्या, मातोश्री दोन कुठल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात बनले

Yamini Jadhav : महापालिका सभागृहात यामिनी जाधव कडाडल्या, मातोश्री दोन कुठल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात बनले

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणा उबाठा आणि विराेधी पक्षाचा समाचार घेतानाच पावणे चार वर्षाच्या प्रशासकांच्या काळातील कामांची श्वेतपत्रिका काढली गेली पाहिजे, ती जशी आवश्यक आहे, तशीच काेराेना काळातील कामकाजाची श्वेतपत्रिका काढायला हवी, कोरोना काळातील श्वेतपत्रिकाही काढण्याची मागणी केली. एवढेच नाही तर चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव होते हे खरे आहे. पण आज जे आम्हाला खोके... खोके म्हणून बोलतात, त्यांना मी विचारु इच्छिते की मातोश्री दोन कुठल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात बनले. प्रत्येक स्थायी समिती अध्यक्षांचे ठाकरेंच्या उत्कर्षात योगदान आहे. आमच्या पक्षाचे नेते रविंद्र वायकर हे स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन बनले, राहुलजी शेवाळे अध्यक्ष होते तेव्हा असताना शिवालयाचे बांधकाम आणि यशवंत जाधव स्थायी समितीचे चार वर्षे अध्यक्ष असताना मातोश्री दोन बनला हे विसरु नका असे सांगत यामिनी जाधव यांनी खोके... खोके म्हणून डिवचणाऱ्या उबाठाच्या नगरसेवकांचा समाचार घेतला.

महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर बोलतांना स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी महापालिकेतील प्रथा आणि परंपरेनुसार कामकाज केले जात असून ही परंपरा आपल्याकडून आल्याचे विरोधकांना सांगत त्यांचे कान टोचण्याचे काम केले. मात्र, यामिनी जाधव यांच्याकडून टिका होत असताना सभागृहात माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, प्रमोद सावंत आणि विठ्ठल लोकरे हेच त्यांना विरोध करताना दिसत होते. यावेळी जाधव यांनी स्ट्रक्चरल ऑडिटमधील गंभीर अनियमितता स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली चांगल्या व सुरक्षित इमारतींना धोकादायक घोषित करून रहिवाशांना बेघर करण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली. भायखळ्यातील प्रिन्स अली खान हॉस्पिटलसारखी मजबूत, ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक ठरवून रातोरात हजारो डॉक्टर व रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला. दुसरीकडे ताडवाडीतील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाकडे होणारे दुर्लक्ष आणि माहुल गावातील नागरिकांची हालअपेष्टा यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

स्वच्छ मुंबई अभियान व कचरा व्यवस्थापन स्वच्छतेबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित करत, कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले. कचऱ्याच्या डब्यांचा गैरवापर, निविदा प्रक्रियेत होणारे घोळ आणि काळ्या यादीतील कंपन्यांना दुसऱ्या नावाने कंत्राटे मिळण्याच्या प्रकारांवर त्यांनी कठोर टीका केली.

घनकचरा व्यवस्थापनातील गैरप्रकारावर बोलतांना यामिनी जाधव यांनी काही मुकादमांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व आणि त्यातून वाढणारे गैरप्रकार यावर कारवाईची मागणी करत, रिड्युस, रियुज आणि रिसायकल या तत्त्वांचा प्रभावीपणे अवलंब करण्याचे आवाहन केले. दारुखाना परिसरात ‘आपला दवाखाना’ उभारण्यासाठी २ कंटेनर उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. डायलिसिस सेंटरची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत जाधव यांनी नशामुक्ती केंद्रातून बाहेर पडलेल्या व्यक्तींसाठी कौशल्य विकास व पुनर्वसनाच्या सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >