Monday, April 20, 2026

IRAN : इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला इराणचा ताबा

IRAN : इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला इराणचा ताबा

तेहरान : इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष मिटवण्यासाठी पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीचे भवितव्य अधांतरीच आहे. इराणने यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत आक्रमक पवित्रा धारण केलेला असतानाच आता इराणमधून जगाला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.

इराणची सत्ता आता कट्टरंपती इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीच्या हाती आल्याचा दावा केला जात आहे. आता इराणमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय आयआरजीसीकडून घेतले जात आहेत, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाअंतर्गत आयआरजीसीचे कमांडर अहमद वाहिदी आणि त्यांचे जवळचे सहकारीच आता देशाचे प्रमुख नेतृत्त्व म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. अमेरिकेने होर्मुझमध्ये इराणच्या जहाजावर हल्ला करून पुन्हा युद्धाला तोंड फोडले आहे. अमेरिकेचा अशाप्रकारे चीनहून इराणला येत असलेल्या जहाजावर ताबा मिळविणे इराणला पटलेले नाही. अमेरिकन थिंक टँक ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या मते, जनरल वाहिदी यांनी इराणच्या लष्करी तंत्रासह राजनैतिक वाटाघाटींची सूत्रेही आपल्या हाती घेतली आहेत. याला सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची मूक संमती असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे हॉर्मुझचा समुद्री मार्ग उघडण्यास अनुकूल होते. मात्र, आयआरजीसीने हा निर्णय धुडकावून लावत उलट आपल्या 'फास्ट अटॅक शिप्स'च्या माध्यमातून हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला आहे.

परराष्ट्रमंत्र्यांना केले बाजूला?

वॉशिंग्टन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ द स्टडी ऑफर वॉर’च्या मतानुसार आयआरजीसीने इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना बाजूला केले आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर घेतले जाणारे सर्व निर्णय आता आयआरजीसीकडून घेतले जात आहेत. अमेरिकेसोबतच्या पहिल्या बैठकीनंतर अराघची यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खोलण्याची घोषणा केली होती. परंतु हा निर्णय बदलून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ बंदच असणे गरजेचे आहे, अशी भूमिका आयआरजीसीकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शेवटच्या क्षणी इराणचा अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इरान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात इराणने पाकिस्तान आणि अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. सध्या या चर्चेत सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले की, ‘इराण अद्याप अमेरिकेसोबतच्या या चर्चेसाठी कोणताही विचार केलेला नाही’. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम संपण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना हा मोठा पेच निर्माण झाला आहे. इराणनने चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. नव्या फेरीसाठी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे संकेत इराणने दिले आहेत. मात्र, असे असले तरी आपला मित्र देश असलेल्या पाकिस्तानला इराणने १० कलमी प्रस्ताव पाठवला आहे. पाकिस्तान निष्पक्ष राहण्याऐवजी अमेरिका आणि सौदी अरेबियाकडे झुकत असल्याची भीती इराणला आहे. यातच भर म्हणून, अमेरिकन नौदलाने इराणी मालवाहू जहाजे जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा