अक्षय्य तृतीयेची शुभघडी...

प्रासंगिक : शैला हळबे


साजिऱ्या गोजिऱ्या चैत्र-पालवीचं स्वागत करता करता मोहून जायला होतं. नुकती हळद लागलेलं ऊन गोरंपान सतेज! आणि पाहता पाहता त्याच्या अंगावर बागडणारी झाडावेलींची इवलाली बाळं! नुकतीच अंकुरलेली! कोंबा कोंबातून उमललेली! भुईतून वर येतात आणि दिसागणिक समजूतदार होतात. शिरीषाची नाजूक कोमलता फुलांच्या पाकळ्या पाकळ्यांतून पापण्यांवर थरारू लागते. इबर्नमचे पिवळे जर्द सडे अनवाणी पावलांनी रस्त्यावरून चालण्याचा आग्रह धरू लागतात. ‘मोगरा फुलला... मोगरा फुलला’चा घोष पावलागणिक मोह घालतो. पावलं थबकतात. गंधभरे गेरे रमणींच्या केशकलापात विराजमान होतात. देव्हाऱ्यातले देवही रंगा-गंधात न्हाऊन निघतात. घरासमोरची जागा चैत्रगौरीनं रेखली जाते. चैत्रगौरीची चंद्रगौर पावलं अंगणात पडायची असतात. कल्याणाची सत्ता आणि मांगल्याचे अस्तित्व सूचित करणारे स्वस्तिक चैत्रगौरीच्या स्वागतासाठी रेखले जाते. घराघरातून चैत्रगौरीची आरास मांडली जाते. पायऱ्या पायऱ्यांच्या मंचावर सारी सजावट! फळाफुलांनी, प्रसन्न सुशोभित मंचासमोर आमंत्रित सुवासिनींचा गराडा. हळद-कुंकू, अषर, फुलं यांची देवघेव. गुलाबपाण्याचा अलगद शिडकावा. आंबट-तिखट, चमचमीत आंबेडाळ आणि केशर-वेलचीयुक्त थंडगार पन्हे... याचा आस्वाद! बांगड्यांचे किणकिणाट, हास्याचे खळखळाट! सारं वातावरणच मुळी नादभरं... गंधभरं...! रंगाचं, गंधाचं वेडं वारं अंगात शिरलेला चैत्र धावत्या पावलांनी केव्हा सरतो समजतसुद्धा नाही. वैशाखाची काहिली सहन करण्याचा पुरेपूर जोष तो अंगांगात भरून जातो. तृप्त मनाने आपण वैशाखाचं तप्त आव्हान स्वीकारायला तयार होतो!


आयुष्याचंसुद्धा असंच आहे. सहज फुलवता येईल तसं ते फुलवायचं. आनंदाचे क्षण, सुखाचे बहर, हळुवार झेलायचे. त्याची तृप्ती आत आत अंतर्मनाच्या तळाशी साठवून ठेवायची. तळाशी साठवलेला हा गारवा कोणत्या क्षणी उपयोगाला येईल सांगता येत नाही. कधी बहर, कधी शिशिर हा निसर्गनियम आपल्यालाही तंतोतंत लागू पडणारा आहे. केवळ वयोमानाच्या संदर्भात नाही, तर आयुष्यात झेलाव्या लागणाऱ्या सुख-दु:खाच्या उन्हाळ्या-पावसाळ्यासाठी तो अधिक महत्त्वाचा आहे. आपण नेहमी तयारीत असलो पाहिजे. म्हणूनच ऐन सुखाच्या क्षणीसुद्धा ते सुख नासवणारी माणसं पाहिली की हळहळ वाटते. वाटतं, यांना कसं समजवावं? छोट्या छोट्या कुरबुरींनी हे सुंदर क्षण हातचे निसटू देऊ नका. याच क्षणांची सुगंधी फुलं होतील... बकुळीची! कोमेजली तरी ऐन रखरखीत क्षणांनासुद्धा सुगंधित करून सोडतील. प्रश्न आहे ती फुलं झाडावरून टपटपतील तेव्हा वेचण्याचा! हळुवार हातांनी ती एखाद्या कुपीमध्ये भरून ठेवण्याचा... पाहिजे तेव्हा आपल्या अवतीभवती सुगंध पसरवण्याचं त्याचं गंधभारलेपण आपण हेरलं पाहिजे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केशरिया रंगाचे झेंडू आंब्याच्या हिरव्यागार पानांशी सलगी करत घराचं प्रवेशद्वार सजवतात. अक्षय्य तृतीया हादेखील साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुभकार्याचे बेत आखले जातात. साखरपुडा, विवाह, भूमिपूजन, गृहप्रवेश... कोणत्याही शुभकार्याप्रसंगी अक्षय्य तृतीयेची शुभघडी केव्हाही पवित्र!


एक आठवण या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाशी जोडलेली आहे. जवळच राहणारे आबा आणि माई. चार खोल्यांचं सुबक देखणं घर आहे त्यांचं. घराच्या अंगणात तुळशीचं वृंदावन आहे. घराच्या बागेत झुलणारा झोपाळा आहे. झोपाळ्याच्या वरच्या बाजूला मांडवावर मोगऱ्याचा वेल चढवला आहे. या दिवसात तो असा फुलतो, असा फुलतो की अगदी ‘फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ अशी स्थिती होते. आबांच्या घरावरून गेलं तरी मोगऱ्याचा घमघमता गंध मन प्रसन्न करतो. बागेत आजूबाजूला नारळीची पाच-सहा झाडं आहेत. भरभरून फुलणारा अनंत आहे. आबा आणि माई अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हमखास झोपाळ्यावर बसलेले दिसतात. पाच-साडेपाचला उन्हं कलली की, माई जरीकाठी नऊवारी साडी नेसून झोपाळ्यापाशी येतात. छायानं झोका देत झोपाळ्यावर बसतात. आबा मधूनच फाटकापाशी येऊन-जाणाऱ्या येणाऱ्या आमच्यासारख्या परिचितांना साद घालून बोलावतात. जवळच मोगरीच्या गेऱ्यांनी ओथंबलेलं तबक असतं. माई प्रत्येकीला गेरा देतात. नारळ देतात. आलेल्यांना स्वत:जवळ बसवून घेतात. आबादेखील खुशीत असतात तेव्हा. गेल्या वर्षीची अक्षय्य तृतीया! आम्ही नवीनच होतो त्या परिसरात! आबांनी हाक मारली म्हणून शिरले त्यांच्या फाटकात! माई हसऱ्या मुद्रेने पुढे आल्या. फुलं दिली. नारळ दिला. ऐसपैस गप्पा सुरू झाल्या. सहजच मी बोलून गेले, ‘किती छान मोकळी जागा आहे’! मुलांना खेळायला अगदी मस्त आहे माई, तुमच्या नातवंडांची मजा आहे.


शब्द ऐकताच माईंच्या डोळ्यांतून टपटप अश्रू झरू लागले. काय झालं समजेचना. आबा एकदम पुढे झाले. म्हणाले, ‘अगं, उद्यापासून तुझ्या मुलांना पाठवून दे खेळायला! तीसुद्धा आमची नातवंडच की! आणि हे बघ, आंब्याला कैऱ्या लागल्यात. कैऱ्या असतील तर पाठवून देतो. माई पटकन सावरून म्हणाल्या, ‘कैरीचं लोणचं घातलंस तर मात्र पाठव गं!’ माईंच्या बदलत्या भावमुद्रेकडे पाहातच राहिले. नंतर हकीगत कळली ती अशी - माई आणि आबा एवढ्या मोठ्या घरात दोघेच राहतात. त्यांना दोन मुलगे आहेत. पण दोघेही परदेशी आहेत. त्यामुळे नातवंडांचे पाय या घराला कधीही लागत नाहीत. माईंच्या घरा-अंगणातली लगबग त्यामुळे तशी थबकलीच आहे. माई-आबा एरव्ही फारसे दिसत नाहीत, पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मात्र माईंचा नियम चुकत नाही. आबांनी या घराचं भूमिपूजन केलं ते याच शुभदिवशी. अवतीभोवती नारळीची झाडं लावली ती याच दिवशी. मोगरीचा वेल सजवला तोही याच दिवशी. झाडं फुलली, फळली. वेळू गगनावरी गेला. बहरला. त्यापूर्वीच लावलेला घरातला पिढ्यानपिढ्यांचा वेल मात्र खरोखरच गगनावरी सात समंदर पार करून त्या पल्ल्याड गेला. तरीही जवळ कोणीही नसण्याच्या एकलकोंड्या वास्तवातून माई-आबा त्या दिवशी बाहेर येतात. २५ वर्षांपूर्वीची ती अक्षय्य तृतीया पुन्हा जगतात. तेव्हाचा तो आनंद पुन्हा फुलवू पाहतात. कारण त्यांनीसुद्धा बकुळीच्या फुलांची कुपी जपून ठेवलीय. ऐन शिशिरात मन सुगंधित करणारी! माई-आबांची ही आठवणींची सुगंधी कुपी जपून ठेवण्याची वृत्ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.


निसर्ग कधी कधी आपल्याला विरोधाभासातील सौंदर्य ठायी ठायी उकलून दाखवतो. तसाच विरोधातील समन्वयाचं जाणतं सौंदर्य अनेकदा महापुरुषांच्या तत्त्वातूनही प्रतीत होतं. वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. ज्ञान आणि भाव यांचा समन्वय साधलेला महापुरुष म्हणजे आद्य शंकराचार्य! ज्ञानाचा हिमालय आणि भावनेचा सागर! अद्वैताची गर्जना करणाऱ्या या महापुरुषाने भावमधुर स्तोत्रे रचली. 'अहं ब्रह्मास्मि' म्हणणारे शंकराचार्यच 'मम भवतु कृष्णोक्षिविषय:' असेही म्हणतात. जीवा-शिवाचे अद्वैत तर साधले पाहिजेच. पण हेच अद्वैत मी आणि समाज यात साधता आले तर? तर मग सामाजिक स्तरावरही सुंदर अद्वैत निर्माण होईल. शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सुंदर विचारधारेतील काही थेंब आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा. सण येतात आणि जातात. जयंत्या येतात आणि जातात. ऋतू येतात आणि जातात. त्यातून काय टिपायचं ते आपलं आपणच ठरवायचं. आपापल्या अंतर्मनात कायम सुगंध देणारी बकुळ फुलं जपून ठेवायची. ऐन वैशाखाच्या काहिलीत सुखद गारवा आणि ताजवा देण्यासाठी!

Comments
Add Comment

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती: भालचंद्र ठोंबरे अधर्मी कृत्ये करणारे, पापी, दरोडेखोर यांना ऋषीमुनींनी केलेल्या

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रपट ठरु शकतो

स्मृतीपटल : अनिल तोरणे  अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या

पहिला पाऊस

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे येरे येरे पावसा... खूप सुंदर कविता. तुमच्या आमच्या बालपणातील. उन्हाच्या झळांनी लाहीलाही