जीवनगंध : पूनम राणे
शाळा सुटण्याची वेळ झाली होती. रियाचे आजोबा शाळेच्या दरवाजावर तिची वाट पाहत उभे होते. शाळा सुटण्याची बेल झाली. रिया दरवाजावर आली. रोजच्या प्रमाणे ती आजोबांच्या गळ्यात पडली नाही. आज ती निराश दिसत होती.
आजोबांनी तिला विचारले, “बाळा, आज तू बोलत का नाहीस ? उदास का दिसतेस? बोल बाळा, काय झालंय! शाळेत तुला कोणी बोललं का? बाई रागावल्यात का?”
रिया काहीच बोलत नव्हती. आजोबांनी रिक्षा थांबवली. रिक्षात बसले; परंतु रिया रिक्षातही काही आजोबांशी बोलेना. घरी आल्यावरही रिया शांतच होती. आजोबा आजीला म्हणाले, “आज रियाचं काय झालं कळत नाही.” ती खूपच शांत आहे. निराश आहे. तू तिला विचारून घे.” प्रियाने दप्तर बाजूला ठेवले. हात-पाय धुतले. शांतपणे कोचवर येऊन बसली. आजीने तिला जेवण वाढले; परंतु तिचे जेवणाकडे लक्षच नव्हते. ती जेवायलाही तयार होईना. जेवणाच्या ताटासमोर बसून ती रडायला लागली. आजी म्हणाली, “बेटा, अगं काय झालं! सांगशील का नाही?” तेव्हा रिया म्हणाली,“आजी,अगं, माझी मैत्रीण दिव्या गेले चार दिवस शाळेत येत नाही. मार्च महिना सुरू झाला आहे. तिने सुरुवातीपासून फी भरली नाही. आता परीक्षा चालू होणार. ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे त्यांना परीक्षेला बसू देणार नाही, असे बाईंनी सांगितले आहे. बाई तिला रोज विचारतात; परंतु तिची आई तिला फी देऊ शकत नाही. तिचे वडील देवाघरी गेले आहेत. आई भांडी-कपडे करण्याचे काम करते. दुसऱ्यांचा स्वयंपाक बनवायला जाते. तिचा मोठा भाऊ आजारी आहे. त्यामुळे बराच खर्च त्यांच्या घरी झाला आहे. त्यामुळे ती फी भरू शकत नाही. वर्गामध्ये रोज तिला फी नाही आणली म्हणून उभे राहावे लागते. तिने मला बोलूनही दाखवले; परंतु गेले दोन दिवस ती शाळेत येत नाही. आजी म्हणाली, “अगं पण तू अशी निराश होऊन प्रश्न सुटणार आहे का? तू प्रथम जेवण करून घे. रात्री तुझे आई-बाबा आल्यानंतर आपण सर्वांनी मिळून ठरवू.”
आजीने समजूत काढल्यानंतर रियाने जेवण करून घेतले व थोडा वेळ आराम करून ती क्लासला गेली. संध्याकाळी आई-बाबा कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यानंतर आजीने विषय काढला. म्हणाली,“प्रिया आज शाळेतून आली तीच मुळात निराश होती. तिची मैत्रीण दिव्या फी भरू शकत नसल्याने शाळेत गैरहजर राहत होती. याचे आपल्या रियाला खूप वाईट वाटत आहे.”
रिया क्लासला गेल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ही एक मदतपेटी तयार केली आहे. मला वाटतं,“रिया उद्या ही मदत पेटी घेऊन शाळेत जाईल. आपल्या वर्ग शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना सांगेल. खरं म्हणजे आज अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी दानाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यानिमित्ताने आपणापासूनच सुरुवात करू.” असे म्हणून आजीने स्वतः त्या मदत पेटीमध्ये हजार रुपये ठेवले व त्यानंतर लगेच आई-बाबांनी एक हजार रुपये मदतपेटीमध्ये ठेवले. ते पाहून रियाने ही आपले खाऊचे साठवलेले पाचशे रुपये मदत पेटीत ठेवले. आजीची संकल्पना रियाला फारच आवडली. ती आनंदाने उड्या मारायला लागली. सकाळ केव्हा होते आणि आपण ती मदत पेटी घेऊन केव्हा शाळेत जातो, असे रियाला झाले होते. पहिल्याच तासाला तिने वर्ग शिक्षकांना आपल्या आजीची संकल्पना सांगून ती मदत पेटी दाखवली. रियाच्या बाईंना रियाची संकल्पना फारच आवडली. त्यांनी ती संकल्पना मुख्याध्यापकांना बोलून दाखवली.
मुख्याध्यापक म्हणाले,“दोन दिवसात आपण पालक सभा आयोजित करणार आहोत. तेव्हा आपण हा विषय पालक सभेपर्यंत पुढे मांडू.” ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनंतर पालक सभा आयोजित करण्यात आली. पालक सभेतील मुद्दे झाल्यानंतर शेवटी मदत पेटीची संकल्पना मांडली. ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील त्या वाढदिवसाला त्या विद्यार्थ्यांनी चॉकलेट, गोळ्या न आणता यात मदत पेटीमध्ये काही रक्कम टाकावी. जेणेकरून आपण अशा परिस्थिती नसलेल्या मुलांची फी भरू शकतो. सर्व पालकांनी या कल्पनेला आनंदाने मान्यता दिली. त्याच दिवशी प्रत्येकाने त्या मदत पेटीमध्ये काही रक्कम टाकली. जमा झालेल्या रकमेतून जे विद्यार्थी परिस्थितीअभावी फी भरू शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांची फी भरली.
अशाप्रकारे आजी-आजोबांच्या संकल्पनेतून उपस्थित पालकांना सामाजिक भान झाले. दिव्याची फी भरली गेल्याने दिव्याच्या ही चेहऱ्यावर आज आनंद ओसंडूत वाहत होता. तिने तिची मैत्रीण रियाला घट्ट मिठी मारली. मी उद्यापासून नियमित शाळेत येईन, असे तिने रियाला वचन दिले आणि ती मनापासून अभ्यास करू लागली.