अविस्मरणीय उन्हाळी सुट्टी…

स्मृतीगंध : लता गुठे


एप्रिल महिना सुरू झाला की कधी एकदाची सुट्टी लागते याचे वेध लागायचे आणि परीक्षा संपली की कधी आजोबा घ्यायला येतात असं व्हायचं. आजोळी जायचं म्हटलं की, अंगात उत्साह संचारायचा. मामा किंवा आजोबा बैलगाडी घेऊन घ्यायला यायचे आणि आम्हा सर्व नातवंडांना घेऊन आजोळी जायचे. माझं अजोळ अतिशय निसर्गरम्य ठिकाणी होतं. चहुबाजूंनी डोंगर आणि मध्ये नदीच्या काठावर वसलेलं ते छोटसं गाव आणि त्या गावांमध्ये माझ्या मामाचा चौकाचा वाडा. मामाचं घर म्हणजे चिरेबंदी वाडा-भक्कम दगडी बांधकाम, लाकडी कोरीव दरवाजा आणि मोठं अंगण. त्या वाड्याची एक वेगळीच शान होती. बाहेर चिऱ्यांनी बांधलेले ओटे होते. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर, बायकांची मैफल जमायची आणि आमचा झिम्मा फुगडीचा खेळ रंगायचा.


वाड्याला लागूनच खाली दुकान आणि वरती माडी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला जागाच जागा. आजूबाजूची सर्व मुलं जमायची आणि लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा. दुपारच्या वेळेतसुद्धा वाड्यात जराही गरम व्हायचं नाही. संध्याकाळी उन्ह खाली उतरली की, गावात फेरफटका मारायचा. सर्व आजोळची माणसं भेटायची, आपुलकीने चौकशी करायची. आजोबांना गावात सर्वजण मास्तर म्हणायचे. मास्तरची नातवंड आली की इतरांनाही आनंद होईल. गावातली सर्व मानलेली नाती मामा-मामी, आजोबा-आजी याच नावाने आम्ही सर्वांना बोलायचो. मावशीची, मामांची मुलं आणि आम्ही सर्व मिळून सात मुलं असायचो. घराबाहेर पडलो की, आधी मंदिरात जाऊन तेथील वडाच्या पाराखाली पारंब्याला झोके खेळायचे. कंटाळा आला की, गावाबाहेर असलेल्या टेकडीवर जाऊन बसायचो. तिथून संध्याकाळी सूर्यास्त पाहायला मौज यायची. संध्याकाळी छान गार वारा सुटायचा. रेडिओवरची गाणी ऐकण्यात तेव्हा जो आनंद मिळायचा तो आता कशानेच मिळत नाही. आजोबांच्या सूचनेप्रमाणे संध्याकाळी अंधार पडायच्या आत घरी जावे लागायचे. वाटेत गुरं घेऊन घरी जाणारे गुराखी भेटायचे. एखाद्या गुराख्याचे दूरवरून बासरीचे सुमधुर स्वर कानावर पडायचे. असं हे सर्व नयन मनोहर दृश्य मनात साठवून रमत गमत घरी पोहोचायचो, तोवर आजी आम्हाला आवडणारे वेगवेगळे पदार्थ बनवायची. आमची अंगत पंगत बसली की, सगळे जिन्नस फस्त करायचो आणि आपापले अंथराचे पांघरायचे कपडे घेऊन माळवदावर झोपायला जायचो. वरती चांदण्यांनी बहरलेलं आकाश आणि आजीच्या, मामीच्या छान छान गोष्टी ऐकत कधी निद्रा देवीच्या स्वाधीन व्हायचो ते कळायचंही नाही.


दुसऱ्या दिवशी सकाळी जाग यायची. आंब्याच्या आमराईत जाण्याची घाई व्हायची. कारण सकाळी आंब्याखाली पाड पडलेले असायचे. ते गोळा करायचे आणि घरी येऊन एका मोठ्या पातेल्यात पाण्यात भिजवायचे. ते व्यवस्थित कापून एक ताट भरून मामी समोर आणून मांडायची. गावरान आंब्याचे आंबट-गोड पाड खाताना स्वर्गीय आनंद मिळायचा. छोटी मामी आमच्या एवढी लहान होऊन आमच्यातच खेळायची. दुपारच्या वेळी आजोबांचा पत्त्याचा डाव माडीवर रंगायचा. गावातले बरीच रिकामटेकडी माणसं पत्ते खेळायला यायची. पत्त्याबरोबर त्यांच्या गावातल्या गप्पाही रंगायच्या. डोंगरात गाव असल्यामुळे रानमेवा भरपूर असायचा. उन्हाळ्यामध्ये शिंदोळ्या, करवंद, जांभळं दुपारच्या वेळी गावातल्या बायका डोंगरात जाऊन वेचून आणायच्या आणि वाड्यात येऊन “बाई, वाईस घ्या नातवंडांना. लय गोड हायीत.” त्या लाल भडक शिंदोळ्या, पिकलेली करवंद आणि जांभळं पाहून तोंडाला पाणी सुटायचे. आजी त्यांना धान्य देऊन ते सर्व विकत घ्यायची. हा रानमेवा दुपारच्या वेळी यायला उपयोगी यायचा. त्यावेळी नद्यांना बारमाही पाणी असायचे. मामी कपडे घेऊन धुवायला चालली की तिच्या पाठोपाठ जायचो. नदीत मनसोक्त डुंबून पाण्यात खेळण्याचा आनंद लुटायचो. मामा बीडवरून येताना खाऊ, फळं, खेळणी, कपडे घेऊन यायचे. त्याकाळी सुट्टीत साधेपणा होता, पण समाधान खूप होतं. खेळण्यात महागड्या वस्तू नव्हत्या, पण आनंद भरपूर होता. चिरेबंदी वाड्याच्या त्या भिंतींनी आमच्या हसण्याचे, खेळण्याचे, आणि निरागसतेचे असंख्य क्षण जपले होते. आज काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण त्या आठवणी मात्र अजूनही मनात ताज्या आहेत. १९८० च्या त्या उन्हाळी सुट्ट्या म्हणजे केवळ सुट्टी नव्हती-तो होता बालपणाच्या आठवणींचा अविस्मरणीय खजिना. अशा प्रकारे उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची कळायचे नाही. शाळा सुरू झाल्या की आजोबा पुन्हा गावी नेऊन सोडायचे.


सुरुवातीचे काही दिवस सुट्टीतले दिवसच आठवायचे. शाळेत मन रमायचंच नाही. मग पुन्हा दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायचे... आज हे सगळं हरवलं आहे. मुलांचे बालपण बालपण राहिलंच नाही. पुस्तकांच्या ओझ्याने व शाळेतल्या अभ्यासाने मुलं दबली आहेत. ना खेळायला अंगण नाही, ना मित्र-मैत्रिणी. ती मुलं एकलकोंडे होतात. चिडचिडे होतात. आई-वडील मुलांना सुट्टीत वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये बिझी करतात. चित्रकलेचा क्लास संपला की डान्सच्या क्लासला जायचं अशा प्रकारे त्यांचं बालपण कधी संपतं ते त्यांनाही कळत नाही.

Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी