विदर्भात राष्ट्रपतींचा प्रेरणादायी दौरा

वार्तापत्र : विदर्भ


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर-वर्धा दौऱ्याने विदर्भात विशेष लक्ष वेधले, विविध दीक्षांत समारंभांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशासन, वैद्यक आणि शिक्षण क्षेत्रात नैतिकता व समावेशकतेचा संदेश देत त्यांनी विकसित भारताच्या दिशेने प्रेरणा दिली.


भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या आठवड्यातील नागपूर आणि वर्धा भेट हीच महत्त्वाची बातमी राहिलेली आहे. आपल्या दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या दुसऱ्या दीक्षांत समारोहात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली, तर नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या तुकडीच्या समारोप सोहळ्याला देखील त्या उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर वर्धा येथे जाऊन त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारोहात प्रमुख अतिथी म्हणूनही मार्गदर्शन केले.


नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही भारत सरकारची महसूल खात्यातील सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९४४ मध्ये झाली. त्यावेळी ही अकादमी आय. आर. एस. स्टाफ ट्रेनिंग कॉलेज या नावाने कोलकाता येथे सुरू झाली होती. नंतर १९५६ मध्ये देशात राज्य पुनर्रचना झाली. त्यावेळी नागपूर शहराचे राजधानीपद गेले होते. म्हणून केंद्र सरकारने नागपुरात काही महत्त्वाच्या केंद्रीय संस्था आपल्या मुख्यालयासह स्थापित केल्या. त्यात आजची निरी, ऍगमार्क लॅबोरेटरी आणि आय. आर. एस. स्टाफ कॉलेजचा समावेश होता. १९८० पर्यंत ही संस्था आय. आर. एस. स्टाफ ट्रेनिंग कॉलेज म्हणूनच ओळखली जात होती. मात्र १९८० मध्ये या संस्थेचे रूपांतर नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये करण्यात आले. आज नागपुरात छिंदवाडा रोडवर विशाल अशा परिसरात या अकादमीचे कामकाज चालते आहे.


या अकादमीत झालेल्या ७८ व्या बॅचच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रपतींनी सर्व नव्याने तयार होणाऱ्या सनदी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बॅचमध्ये १३० अधिकारी असून १६ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ते आता प्रशासनात सक्रिय होणार आहेत. यावेळी या नव्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विकसित भारत या संकल्पनेकडे देश वाटचाल करत असताना प्रशासनातील पारदर्शकता कार्यक्षमता आणि समावेशकता अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले. यावेळी त्यांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा उल्लेख करताना नागरिकांवर कराचा अतिरिक्त भार न टाकता न्याय्य आणि संतुलित पद्धतीने काम करा, असा सल्लाही दिला. २०१४ मध्ये नागपूरचे खासदार नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाले. त्याच वर्षी नागपूरकर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या दोघांच्या कालखंडात नागपुरात ज्या काही नव्या संस्था आल्या त्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संशोधन संस्थेचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आज वर्धा मार्गावर मिहानमध्ये या संस्थेचे विस्तीर्ण कॅम्पस कार्यरत आहे आणि तिथे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचीही सुविधा उपलब्ध आहे. या संशोधन संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या संस्थेचा दुसरा दीक्षांत सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णू देव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव असे सर्वच मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते संस्थेतील सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात डॉ. प्रियंका, डॉ. वैदेही लोया, डॉ. वेदवती बंडोपाध्याय, डॉ. श्रीहरी बाबू, डॉ. तोसिफ अहमद प्रभृती गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरीही वैद्यक व्यवसायातील डॉक्टरांची बुद्धिमत्ता नैतिकता प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन हाच रुग्णसेवेत महत्त्वाचा भाग ठरणार आहे. त्यामुळे याच विचारांनी विद्यार्थ्यांनी पुढे जावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. हा केवळ व्यवसाय म्हणून न बघता संवेदनशीलतेने मानव सेवा करण्याचा मार्ग आहे असेही राष्ट्रपतींनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. नागपूर नजीकचा वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीतील अग्रणी विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. आजही पवनार येथे विनोबा भावे यांचा तर सेवाग्राम येथे महात्मा गांधींचा आश्रम कार्यरत आहे. महात्मा गांधी हे हिंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळेच वर्धा येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. आज देशभरातून विद्यार्थी येथे येऊन हिंदीचे अध्ययन आणि संशोधन करीत असतात. या विश्वविद्यालयाच्या सहाव्या दीक्षांत समारोहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विद्याशाखातील आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्रदान करण्यात आली. महात्मा गांधींनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच तत्त्वावर मार्गक्रमण करावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. आपल्या मातृभाषेचा अभ्यास करताना इतर भाषांना विरोध करू नका, तर इतर भाषा तुम्ही अभ्यासा आणि त्याचाही प्रचार करा असाही हितोपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णु देव शर्मा हे देखील उपस्थित होते.


आपल्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. तेथे आश्रमाच्या प्रार्थना सभेत देखील त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच त्यांनी परिसरात वृक्षारोपण देखील केले. बापू कुटीला भेट देऊन त्यांनी तेथे पाहणी केली. सोबतच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले बा निवास आणि बापूंच्या कार्यालयाला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमवासीयांसोबत सूतकताई देखील केली. एकूणच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दोन दिवसांचा नागपूर आणि वर्धा दौरा हा विदर्भात चर्चेचा विषय राहिला आहे.



अविनाश पाठक

Comments
Add Comment

पुलांच्या बांधकामात तंत्रज्ञानाचा समन्वय

मुंबईचा एल्फिन्स्टन पूल हा केवळ लोखंड आणि दगडांचा ढाचा नव्हता, तर शहराच्या प्रगतीचा साक्षीदार होता. नव्या

बारामतीची कमान कोणाकडे?

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र बारामतीमध्ये आता वारसाहक्काच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार

मायेचा जिव्हाळा जपणारी गावाकडची माणसं

धावपळीच्या आयुष्यात हरवलेला माणूस जेव्हा थकून जातो, तेव्हा त्याला आठवण येते ती आपल्या गावच्या मातीची आणि

Amravati Paratwada परतवाड्यात मैत्रीआडून भयंकर अत्याचार

वार्तापत्र : विदर्भ  अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे गेल्या तीन आठवड्यांपासून महिलांवरील कथित लैंगिक

हंगेरीतील सत्तांतराचा अमेरिकेला धक्का

ऑर्बन यांनी विरोधकांना व्यक्ती म्हणून नव्हे, तर व्यवस्था म्हणून उभे केले. ते केवळ युरोपियन महासंघाचे केंद्र

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाकडे

वार्तापत्र : मराठवाडा  अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता