Tuesday, April 14, 2026

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

विदर्भात एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतेचा तडाखा (Vidarbha Heat Wave) तीव्र होऊ लागला असून नागरिकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने १३ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत अकोला सहित विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. या काळात सूर्यप्रकाश तीव्र असल्यामुळे उष्माघाताचा धोका अधिक असतो. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे आणि बाहेर पडताना डोक्यावर टोपी, अंगावर हलके कपडे तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तापमान वाढल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत आणि उन्हात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राणी यांच्यासाठी विशेष (Vidarbha Heat Wave) दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, कारण त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच नागरिकांनी तहान लागली नसली तरी नियमितपणे पाणी पिण्यावर भर द्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा जास्त घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दरम्यान, पशुधन व पाळीव प्राण्यांनाही उष्णतेपासून (Vidarbha Heat Wave) संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना सावलीत ठेवून स्वच्छ आणि थंड पाण्याची उपलब्धता करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा