सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवेळी राजकीय पक्षांमध्ये संघर्ष झाला. अखेर निवडणूक भाजपने जिंकली. पण संघर्ष सुरू असताना पोलिसांनी जे काही केले त्यावरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीचे परिणाम दिसू लागले आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राजकीय संघर्ष हाताळताना पोलिसांनी केलेल्या कृतीची चौकशी सुरू आहे. ही चौकशी निःपक्षपाती वातावरणात व्हावी या उद्देशाने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे बहुमत नव्हते. पण ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि एका अपक्ष सदस्याला आपल्या गोटात वळवून घेतले. यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने जिंकली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात राजकीय पक्षांमध्ये संघर्ष झाला. ही परिस्थिती पोलिसांनी थोड्याच वेळात नियंत्रणात आणली. पण परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा आणि बळाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या विषयावरून चर्चा झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चौकशी सुरू आहे. चौकशी निःपक्षपाती वातावरणात व्हावी या उद्देशाने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.