राजरंग : राज चिंचणकर
नाट्यसृष्टीत विविध उप्रक्रमांची पायाभरणी केली जाते आणि यातले काही उपक्रम सातत्याने सुरु राहतात; तर काही उपक्रमांवर पडदा टाकण्याची वेळ येते. मात्र अलीकडेच प्रारंभ झालेल्या ‘नाट्य निरंतर’ या नाट्यविषयक उपक्रमाने पहिल्याच प्रयत्नात चैतन्यमयी गुढी उभारली असून, यापुढे हा उपक्रम निरंतर सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मराठी नाटक समूह’ या ग्रुपच्या माध्यमातून आकाराला आलेल्या रंगकर्मींच्या या नाट्यकट्ट्याने आश्वासक मुहूर्तमेढ रोवत नाट्यसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘संकल्पना ते सादरीकरण : एक निरंतर प्रक्रिया’अशी या उपक्रमाची संकल्पना असून, ‘मराठी नाटक समूह’ आणि ‘अभिषेक थिएटर्स’ यांनी मिळून या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या रंगकर्मी मंडळींच्या मागे ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ यासारखी संस्था उभी असल्याने या उपक्रमाला सातत्य राखण्यात यश येईल, अशी सकारात्मक चर्चा नाट्यसृष्टीत आहे. अलीकडच्या काळात, रंगकर्मींनी एकत्र येण्याचे आणि भेटण्याचे नाट्यविषयक चर्चांचे कट्टे किंवा नाटकवाल्यांच्याच शब्दांत सांगायचे तर नाट्यविषयक चर्चांचे अड्डे अस्तंगत होत असताना, ‘नाट्य निरंतर’ या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांना उर्जितावस्था मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. नव्या-जुन्या नाटकांची ओळख, स्वगते, कथा, कविता, नाट्य अभिवाचन, एकल प्रयोग, प्रहसन, गप्पा, चर्चा, मुलाखती, मार्गदर्शन अशा प्रकारच्या नाटकाशी व साहित्याशी संबंधित गोष्टींचा समावेश या उपक्रमात करण्यात आला असल्याने, हे व्यासपीठ कलात्मक परिपूर्णतेची मेजवानी देत राहणार हे स्पष्ट आहे.
गेल्या महिन्यात प्रारंभ झालेल्या या उपक्रमाची फारशी प्रसिद्धी झाली नसतानाही, त्याला मिळालेला प्रतिसाद संबंधित रंगकर्मींना सुखावणारा ठरला आहे. रोहिणी हट्टंगडी, कौशल इनामदार, अभिराम भडकमकर, सुशील इनामदार, चंद्रकांत कुलकर्णी, जयश्री जगताप, मानसी मराठे, सुयश झुंजुरके अशा कलाक्षेत्रातल्या मंडळींचा सहभाग शुभारंभाच्या प्रयोगात होता. आता दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कट्टा बहरणार असून, येत्या २७ मार्च रोजी असलेल्या जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या महिन्याचा उपक्रम पार पडणार आहे. केवळ दृश्य स्वरूपात दिसणारे नाटकच नव्हे; तर त्या मागच्या विविध गोष्टींवर या उपक्रमाद्वारे प्रकाश टाकला जाणार असून, पडद्यामागच्या हालचाली टिपण्याचे कार्य हा उपक्रम बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘नाट्य निरंतर’च्या या उद्दिष्टाला अनुसरून, या उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणतात, “साधारण बाहेरून बघताना आपल्याला फक्त नाटक दिसते; परंतु नाटकाची सुरुवात लेखकापासून होते आणि त्यानंतर नाटक पुढे सरकताना; निर्माता, बस ड्रायव्हर, बॅकस्टेज असे त्याचे प्लॅनिंग म्हणजे सर्वकाही शिकण्याचा रोजचा भाग आहे. नाटकवाल्यांचे रोजचे मतदान असते. ज्यांचे रोज प्रयोग असतात; त्यांचे रोजच्या रोज मतदान असते. त्यामुळे अतिशय सतर्कपणे नाटकातल्या लोकांना काम करावे लागते. अजून एक म्हणजे, जे मी सुद्धा स्वतः मान्य करतो की लेखकापासून ते ड्रायव्हरपर्यंत कुणीही १०० टक्के परफेक्ट असू शकत नाही. आता एक साधी गोष्ट आहे की सेट डिझाईन करताना, आपल्याला सेट संपूर्ण महाराष्ट्रभर न्यायचा आहे; हे डोक्यात ठेवून जर सेट डिझाईन झाला, तर ते निर्मात्याला परवडते. पहिल्या २५ प्रयोगांनंतर खऱ्या अर्थाने नाटकाचा रिझल्ट लागतो. त्यामुळे नाटकाच्या आधीचे नियोजन करणे माझ्या मते फार महत्त्वाचे आहे.
केवळ कलाकारच नव्हे; तर प्रेक्षकांनाही नाटकाच्या पडद्यामागची गोष्ट कळायला हवी. मुंबईतून बाहेर गेल्यानंतर, उदाहरणार्थ नागपूरला प्रयोगाला ७०० रुपये तिकीट का लावता; असा प्रश्न आल्यावर प्रेक्षकांनीच त्याला उत्तर द्यायला पाहिजे. केवळ मी एक निर्माता म्हणून नव्हे; तर कलाकारांना सुद्धा हे गणित माहीत असायला हवे. जाहिरातींचे दर, दौऱ्यावर गेल्यावर हॉटेलचे दर, दौऱ्याचे अंतर; हे सर्वांना माहित हवे. मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा आपण जेव्हा दौरा करतो, तेव्हा आपण साधारणतः २६०० किलोमीटर प्रवास करतो. मुद्दा असा आहे की नाटकाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी, नाट्य कलावंत आणि नाट्यरसिक यांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा जो उपक्रम सुरू केला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे. नाटकाशी संबंधित सर्व मंडळी या उपक्रमाला येणे आवश्यक आहे, त्यांनी बोलणे महत्त्वाचे आहे आणि आदानप्रदान होणे गरजेचे आहे. नाट्यविषयक सगळ्या गोष्टी मांडण्याचे हे व्यासपीठ आहे.”