कलाकारांची चैतन्यमय गुढी...

राजरंग : राज चिंचणकर


पली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य आणि आनंदाची उधळण करणारा गुढीपाडवा म्हणजे मूर्तिमंत मांगल्य...! सर्वसामान्यांसह कलाकार मंडळीही या सणाचा आनंद घेत असतात. येत्या आठवड्यात येत असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही कलाकारांशी साधलेला हा विशेष संवाद...



यंदाचा गुढीपाडवा खास - शलाका पवार (अभिनेत्री)


गुढीपाडवा म्हटला की मला आपले पारंपरिक मराठी नूतन वर्ष आठवते; जिथे गुढी उभारली जाते, गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. हे सर्व सेलिब्रेशन आपण आपले नवीन वर्ष म्हणून करत असतो. हे सर्वकाही माझ्या घरी सुद्धा आम्ही करायचो. पण अगदी पूर्वीपासून माझ्या आजी-आजोबांनी कधी गुढी उभारली नव्हती. कारण ते रूढीवादी विचारांचे नव्हते. मात्र माझ्या आईला या सगळ्या पारंपरिक गोष्टी करायला फार आवडायच्या. गुढी कशी उभारायची, हे तिने आम्हाला शिकवलेच होते. आम्ही रांगोळ्या काढायचो; पाकातले चिरोटे आम्ही आणायचो. घरी गोडधोड केले जायचे, म्हणजे श्रीखंड पुरी वगैरे...! नंतर मी सासरी आले. आमच्या घरी सुद्धा सर्व काही पारंपरिक पद्धतीने केले जाते. मी सासरहून चिपळूणची आहे. आमचे मूळ घर चिपळूणचेच असल्याने गुढी उभारण्याचा मान अजूनही तिथेच आहे. त्यामुळे मी अजून कधी मुंबईत माझ्या घरी गुढी उभारली नाही. त्यामुळे गुढी उभारण्याचे जे कौतुक असते ते आम्ही थोडे 'मिस' करतोय. पण बाकी घरात गोडधोड वगैरे आम्ही सर्व करतो.


माझ्या दोन लेकी खूप आनंदाने गुढीपाडवा साजरा करतात. गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये नऊवारी वगैरे नेसून त्या सहभागी होतात. यावर्षीचा गुढीपाडवा मात्र माझ्यासाठी विशेष यासाठी आहे की माझी धाकटी मुलगी किया हिचा वाढदिवस यंदा नेमका गुढीपाडव्याच्या दिवशी आला आहे. त्यामुळे यंदा आमच्याकडे खूप जास्त सेलिब्रेशन असणार आहे. आम्ही कलाकार आहोत. गुढीपाडवा किंवा कुठलाही सण म्हटला की आम्ही आमच्या घरी तो साजरा करतोच आणि त्यानंतर आम्ही जातो रंगमंचावर...! रसिकांच्या सोबतही आम्हाला सण साजरा करायला मिळतो. त्यानिमित्ताने खूप कौतुक, देवाणघेवाण, शुभेच्छा असे सर्व काही होते. यंदा गुढीपाडव्या दिवशी माझा दमण येथे संध्याकाळी प्रयोग आहे. त्यामुळे सकाळी घरी गुढीपाडवा साजरा करणार, कियाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आणि दुपारी आम्ही दमणला जायला निघणार. तिथेही सर्वांसोबत आमचा गुढीपाडवा साजरा होणार आहे.



आरोग्याकडे लक्ष द्यायचंय - शर्वरी लोहोकरे (अभिनेत्री)


आपण ३१ डिसेंबरला नवीन वर्ष नेहमीच सेलिब्रेट करतो. सगळ्यांनी एकत्र जमून, पार्टी करून ते साजरे केले जाते. तसे ते करू नये किंवा त्यात काही गैर आहे, असे मला अजिबात वाटत नाही. पण त्याचबरोबर आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे; ती जपत आपण आपले मराठी नवीन वर्ष सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरे करायला हवे. गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या नवीन वर्षात मी काही ठरवले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे या नवीन वर्षात मी माझ्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायचे ठरवले आहे. सध्या माझी 'तुला जपणार आहे' ही दैनंदिन मालिका सुरू आहे. त्यात व्यग्र असल्याने माझे माझ्या तब्येतीकडे थोडे दुर्लक्ष होत आहे. तर यापुढे मी माझ्या प्रकृती सांभाळण्यावर जास्त लक्ष देणार आहे.



शेवटच्या ओळीसाठी मुहूर्त शिल्पा नवलकर (अभिनेत्री-लेखिका)


साधारण गेली दोन वर्षे माझ्या डोक्यात माझे नवीन नाटक घोळत होते. खरे तर लेखनाचे ७५ टक्के काम मेंदूचे असते आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते उतरवून काढणे हे पुढचे काम २५ टक्के असते. माझे विचारांचे काम गेल्या दोन-अडीच वर्षांत बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. पण ते लिहून काढणे काही माझ्याने होत नव्हते. पण आता मी ते नाटक लिहून पूर्ण करत आणले आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जरी ते लिहून झाले; तरी मी शेवटची एक ओळ लिहायची ठेवीन आणि गुढीपाडव्याला मी ती ओळ लिहून नाटक पूर्ण करीन. त्यासाठी यंदा गुढीपाडव्याचा खास असा मुहूर्त आहे.


बाकी गुढीपाडवा हा सण माझ्या घरी खूपच उत्साहाने साजरा होतो. खरे तर माझ्या माहेरी फारसे कधी सण साजरे केले गेले नाहीत. पण माझ्या लग्नानंतर आणि विशेष करून मला मुलगी झाल्यानंतर मी आपले सगळे सण घरात साजरे करायला लागले. कारण मला असे वाटते की हल्ली फारच ओरड होते की आपल्यावर बाहेरच्या संस्कृतीचा कसा मारा होतो आणि आपल्या नसलेल्या गोष्टी आपण करतो वगैरे...! मला असे वाटते की बाहेरून आपल्याकडे जे येते; तेही आपण आनंदाने स्वीकारावे. आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहेत; त्या सगळ्या आपल्या घरात आपण पाळल्या तर त्या मुलांसाठी पुरेशा असतात. आपले सगळे सण आपल्या घरात साजरे केले जायला हवेत, आपल्या मुलांना ते कळायला हवेत. गुढीपाडव्याचा सण साग्रसंगीत गुढी उभारून, तिची पूजा करून मी, माझा नवरा आणि माझी मुलगी असे आम्ही तिघेही उत्साहाने साजरा करत असतो.

Comments
Add Comment

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या