‘दशावतारा’तील प्रागतिक बदल

पाचवा वेद : भालचंद्र कुबल


‘दशावतारी नाटकांसदर्भात मी तीन लेख पाचव्या वेदातून प्रसिद्ध केले होते. त्याबाबत अनेक वाचकांच्या प्रश्नांना समाज माध्यमांद्वारे उत्तरे देखील दिली होती. पारंपरिक दशावताराचे आताचे स्वरूप थोडे तांत्रिकदृष्ट्या विकसित झाले आहेत आणि प्रयोगशीलतेच्या अानुषंगाने क्रांती देखील झालेली आढळते. क्रांती हा शब्दप्रयोग मी इथे जाणूनबुजून करण्याचे कारण म्हणजे दशावताराच्या सैद्धांतिक आणि परंपरेला छेद देणारी प्रयोगशीलता सद्यस्थितीत दिसू लागली आहे. पूर्वी एका बाकड्यावर चालणारे आख्यान आता व्यावसायिक नाटकांप्रमाणे सेटवर दिसू लागले आहे. काही दशावतारी नाटके ट्रीक सीन्सनी सादर होताना दिसताहेत आणि त्यात क्रांतीचे पुढचे पाऊल म्हणजे नव्याने स्थापन झालेली महिला दशावतारी मंडळे...!


दशावतारी नाटकं ही विधीनाट्य असल्याने देवळाच्या सभामंडपात सादर केली जात. स्त्रीयांच्या मासिकधर्मास देवकार्यात निःषिद्ध मानले गेल्यामुळे परंपरेनुसार दशावतारी नाटक स्त्रीयांसाठी वर्ज्य समजले गेले होते. परिणामी स्त्रियांचा सहभाग आजही पारंपरिक दशावतारी नाटकांमधे आढळत नाही. दशावताराचे गाढे अभ्यासक कै. डॉ. तुलसी बेहरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अभ्यासवर्गासाठी पहिला महिला दशावतारी प्रयोग १९९८-९९ साली केल्याचे आठवते. पुढे तसाच एक प्रयोग त्यांनीच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कोकणात घेतल्या गेलेल्या लोककला शिबिरात केल्याचीही नोंद आहे, मात्र अशाच प्रकारचा महिला दशावतार त्यांची कन्या तन्मयी बेहरे आजही मुंबईत सादर करीत असते. आमच्या कोकणात मात्र महिला दशावतार सादर करण्यास परंपरांचा प्रचंड विरोध सहन करावा लागला; परंतु तरीही या विरोधांना न जुमानता महिलांनी सुरू ठेवलेले दशावतारी नाट्य प्रयोग मराठी आणि त्यातही कोकणी पुरोगामित्वाची साक्ष आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजे साधारण २०१४ साली वेंगुर्ल्यातील मंगला परुळेकरांनीही कुडाळातल्या महिलांना घेऊन पारंपरिक दशावताराचे दोन प्रयोग केल्याचे पुरावे आहेत. ज्या लोककला प्रकाराला परंपरावादाची झापडं ८०० वर्षांपासून बांधली आहेत, ती झुगारून कलाकार हा जेंडरलेस असतो, हे दर्शविणारा प्रयत्न निश्चितच माझ्या मते दखलघेण्याजोगा ठरतो.


असाच एक महिला दशावतार महिला दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीमध्ये सादर करण्यात आला. काही वर्षांपूर्वी मी आय. एन. टी.च्या वतीने डॉ. तुलसी बेहरे आणि रामचंद्र वरक यांच्या सहयोगाने दशावताराचे शिबीर घेतले होते. त्यातही पाच मुलींना प्रवेश देण्यात आला होता. त्याच शिबिरातील माझा विद्यार्थी गौरव शिर्के याने हा प्रयोग घे भरारी फाऊंडेशन व महापुरुष दशावतारी नाट्य मंडळाच्या सहयोगाने सादर करण्यात आला. एक अप्रतिम व देखणे नाटक बघितल्याचे समाधान या प्रयोगाने दिले. "ताम्रासूर वध" हा नाट्यप्रयोग स्वतः गौरव शिर्के याने लिहून दिग्दर्शित केला. दशावतारी नाटकाला स्क्रिप्ट नसते. पात्रे प्रसंगानुरूप संवादाची देवाणघेवाण करीत असतात. असे नाटक लिहिले जाणे हेच मुळात परंपरेला आव्हान आहे, असे मी समजतो. या नाटकात परंपरेप्रमाणे पूर्वरंग सादर केला गेला नाही म्हणूनच मी त्यास नाट्यप्रयोग असा उल्लेख केला. कारण ताम्रासूर वधाचे आख्यान खरे तर उत्तररंगात अपेक्षित असते; परंतु बदलत्या कालानुरूप जशी तीन अंकी नाटके दोन अंकांवर आणि तिथूनही प्रवास करत दीर्घांकार आली, त्यातलाच हा प्रकार असावा. पूर्वरंगातील गणेश पूजन, संकासुराने वेद पळविणे मग ते परत मिळवणे, भटजीची पूजा या गोष्टी लोकांच्या इतक्या अंगवळणी पडल्यात की आमच्या सिंधुदुर्गातील प्रेक्षकांना त्या पात्रांचे संवादही तोंडपाठ असतात. असो, तर अशा पूर्वरंगावर काट मारून हे नाटक सादर करण्यात आले. ताम्रासुराचे पात्र रंगविणाऱ्या रेखा कुमठेकर, समीक्षा मडगावकर - नारद, सुश्मिता नाईक - कृष्ण, सलोनी वंजारी - बलराम, मोहिनी मडगावकर - सत्यभामा, स्वप्नाली कारेकर - वैजयंती, वैभवी घाटगे- रुक्मिणी आणिअरुणा नाईक - कृत्या यांनी सादर केलेल्या भूमिका अत्यंत वाखाणण्याजोग्या होत्या.


सावंतवाडी हे दशावतार कलेचे प्रमुख केंद्र आहे, ज्यात निगुडे, कवठी येथील मंडळे कार्यरत आहेत. महिला सहभागाने ही कला अधिक जिवंत होत आहे. सावंतवाडी राजवाड्याजवळ दशावतार महोत्सव २०२६ (७-१० जानेवारी) सादर झाला, ज्यात विविध मंडळे सहभागी झाली. यात चेंदवनकर, सिद्धेश्वर, गोरे दशावतार मंडळे आणि श्री देवी माऊली नाट्य मंडळाचा समावेश होता, पण थेट "महिला दशावतार मंडळ सावंतवाडी"चा उल्लेख मात्र कुठेही दिसून आला नाही. मात्र तळकोकणात अशा महिला मंडळांची परंपरा वाढत आहे. दशावतार ही विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित कोकणची पारंपरिक नाट्यकला आहे, महिलांच्या सक्रिय सहभागाने ही कला अधिक समृद्ध होत आहे आणि त्याचा उंचावणारा आलेख अधोरेखित करणारा हा एक आढावा...!


Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक