व्याधींच्या आधीची समाधी

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


आमच्या पुष्पा भावे मॅडम नेहमी जयंताची उदाहरणे द्यायच्या, जयंता म्हणजे जयंत पवार..! मला कळायला लागलं तेंव्हा तो महाराष्ट्र टाइम्समध्ये स्थिरावला होता. त्याचे लेख, नाट्यपरीक्षण, भावे मॅडम मुद्दामहून वाचायला लावत. प्रत्यक्षात भेट फार उशिरा झाली त्याच्याशी, पण प्रत्येक कथेतून गिरणगावात फेरी मारायला लावली त्याने. तो कामगार वस्तीत राहायचा, मीदेखील विक्रोळीच्या कन्नमवार नगरात, म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठ्या लेबर हाऊजिंग कॉम्प्लेक्समध्ये. दोघांचे जगण्याचे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक निकष सेम होते, पण सर्वात आधी त्याची वस्ती देशोधडीला लागली आणि पंचवीस वर्षांनंतर माझी...! त्याची वस्ती नामशेष व्हायला आणीबाणीचे पडसाद कारणीभूत होते, तर माझी वस्ती निकामी व्हायला जागतिकीकरण...! हे आज तुलनात्मक लिहू शकतो कारण, मला जयंत पवारच्या लिखाणाशी कनेक्ट व्हायला सेकंदही लागत नाही. 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या त्याच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी मिळाला आणि जयंता सो कॉल्ड अप्पर क्लास बुद्धीवंताना दिसून आला. सुर्वे, ढसाळ कसे नंतर कळले, तसंच जयंताचं झालं. तसा तो अधनं मधनं नाटकातून, पुस्तकांतून, सिनेमातून भेटतच असतो पण परवा नीलेश पवारचं ‘जन्म एक व्याधी’ पाहिलं आणि करकचून मिठी मारून गेला. जयंताच्या कथा मला 'कथा' कधी वाटल्याच नाहीत. खाटेवर विव्हळत पडलेल्या पेशंटबरोबर जसं बोलावं ना, तसा तो व्यक्त व्हायचा. छेडलं की त्याचा नायक विचारायचा, आणखी किती सकारात्मक बोलू ? त्या दिवशी नीलेश पवार जयंताच्या रूपात वावरताना पाहिला. नीलेशचा करकरणारा धीर गंभीर आवाज, नात्यांची कागदी कुंपणं टराटरा फाडत होता.


मुंबईतील महानगरीय जीवन, सामाजिक विसंगती आणि वंचितांच्या संघर्षांचे चित्रण नेमके कसे मांडावे याचे भान तिघांनाही (लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता) परफेक्ट समजल्याने ‘जन्म एक व्याधी’ हा एकपात्री दीर्घांक तुमचा ताबा घेतो. दुसऱ्या महायुद्धानंतर कशी पोकळ आणि निरर्थक 'आयुष्यं' जन्माला आली आणि मेली, तशीच गिरणीकामगारांच्या १८ जानेवारी १९८२ च्या संपानंतरची भयाण पार्श्वभूमी जयंत पवारांच्या प्रत्येक कथेला असावी असा भास होत राहातो. जन्म एक व्याधीलाही अशीच काहीशी पार्श्वभूमी असावी असा भास होतो पण ती सामाजिक स्थिती गृहित धरा असा लेखकाचा अट्टहास मात्र नाही. मात्र संपकाळातल्या कथा त्याच काळात जन्मल्याने त्यांना चटक्यांच्या आशयाची बैठक आहे. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहातील सर्वच कथा आशयघन असल्या तरी नाटकाचा जो फॉर्म दिग्दर्शक कै. रघुनाथ कदम यांना या कथेसाठी अपेक्षित आहे, म्हणूनच त्यांनी ही कथा, प्रथम पुरुषी एक वचनी, संहिता स्वरूपात आणली असावी. म्हणजे थोडक्यात जयंत पवार स्वतःची कथा सांगताहेत की काय? या भासातून ‘व्याधी’ मार्गक्रमण करत राहते. जयंत पवारांचे लिखाण समजून घेणे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी कल्पनाशक्तीला प्रचंड ताण द्यावा लागतो. शब्दांचे अर्थ, त्यामागील भाव आणि त्यातील वेदना समजून घेणे म्हणावे तितके सोपे नाही. हे मी त्यांनी लिहिलेल्या नाटकातून अभिनय करताना (होड्या, अशांती पर्व आणि लियर) जे अनुभव घेतले, त्याला स्मरून सांगतो.


व्यक्तीशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय व्यक्ती नाही. एखादी व्यक्ती जन्मापासून जोडली गेलेली नाती, कौटुंबिक नाती, समाजातील नाती आणि आयुष्यातील अनेक बऱ्या-वाईट अवस्थेमधून जीवनात जडलेल्या व्याधींचे भेदक चित्रण त्यांच्या ‘जन्म एक व्याधी’ या आत्मकथनातून आपल्या प्रत्ययाला येते. गिरणगावातील एका चाळीतील अतिशय छोट्या खोलीत, गोंधळलेल्या वातावरणातील बालपण, पौगंडावस्था आणि तरुणपण, या अवस्थेतले कौटुंबिक जीवनाचे त्याकाळी अपरिहार्य असलेले जीवनानुभव, त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर ताज्या आठवणी असल्यासारखे सांगितल्यासारखे लिहावेसे वाटले असतील. तर त्यावरून त्या आठवणी आणि ते अनुभव त्यांच्या मनात किती खोलवर प्रभाव पाडून गेले असतील, ते प्रेक्षकांना बघितल्यानंतरच कळू शकते. नीलेश पवारने नेमका हाच मुद्दा अभिनयासाठी अधोरेखित केलाय. या दीर्घांकात व्यक्त होण्यासाठी त्यांनी तीन मेथड्सचा वापर केलाय. पहिली मेथड, एक्स्प्रेशनिझम म्हणजेच अभिव्यंजनवाद..! अभिव्यंजनवाद ही २०व्या शताब्दीच्या सुरुवातीला युरोपात उदयास आलेली एक कलावादी आणि साहित्यिक प्रवृत्ती आहे. यात कलावंत आपल्या अंतर्मनातील भावना, अनुभव आणि आंतरिक प्रतिक्रिया यांचे प्रतिकात्मक आणि तीव्र चित्रण करतो, बाह्य वस्तूंच्या प्रत्यक्ष प्रतिबिंबापेक्षा अंतःस्थ भावनांना प्राधान्य देतो. Expressionism म्हणजे कलाविषयकाच्या अंतःप्रत्ययाची प्रामाणिक आणि सारमय अभिव्यक्ती. यात कलावंत बाह्य जगाचे विरूपण करून आंतरिक आवेग, असंतोष किंवा जीवनदृष्टिकोन व्यक्त करतो. ही क्लिष्टता समजून उमजून अभिनयाने संहितेला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम नीलेश पवार करतात.


‘जन्म’ ही देणगी आहे, की शिक्षा?
मानवी नाती ही आधार आहेत की व्याधी?


अस्तित्व हे आशेचं नाव आहे की न संपणाऱ्या वेदनेचं? या एकपात्री सादरीकरणात नायक स्वतःच कथानकाच्या अानुषंगाने येणाऱ्या सर्व व्यक्तिरेखा साकारतो-कधी वडिलांचा धाक, कधी आईची असुरक्षितता, कधी दारूच्या नशेत बडबडणारा भाऊ, तर कधी स्वतःचा गोंधळलेलं अंतर्मन. प्रकाश आणि सावल्यांच्या खेळातून स्मृतींचं जग जिवंत होतं जातं. पार्श्वसंगीत कथानकाला भावनिक स्पंदन देतं, तर शांततेचे विराम नाटकाची खरी तीव्रता वाढवतात. शशिकांत कांबळीच्या पार्श्वसंगीताला आणि अक्षय धांगट यांच्या प्रकाशयोजनेला कडक सलाम. कै. रघुनाथ कदमने दिग्दर्शित केलेला दीर्घांक ‘जन्म एक व्याधी’ नीलेश पवारने पुनःर्जिवीत केली आहे.

Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक