महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने तेथून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून पडण्याच्या घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या. या घटनेमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ इजा झाली असून. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.
पुलावरील तेल गळतीच्या घटनेमुळे संभाव्य मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी ताबडतोब वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार त्वरीत करण्यासाठीच्याही सूचना केल्या.
त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपसात समन्वय साधून, पुलावरून वाहतूक निर्धोक व्हावी, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. यांनतर या पुलावरील निसरडा झालेला भाग कोरडा करून स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.






