जीवनगंध; पूनम राणे
मे महिन्यातील रणरणत्या उन्हात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. झाडाचे पान सुद्धा हलत नव्हते. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. पक्ष्यांच्या घशातून आवाजही निघत नव्हता. सारे प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण करत होते.
अशावेळी एका इमारतीचा शेखर नावाचा द्वारपाल आपल्या कामावर आला होता. केबिनमध्ये पंखा होता; परंतु त्याची हवाही उष्ण येत होती. बागेतल्या झाडांनी मान टाकली होती. द्वारपालाला हे पहावत नव्हतं. तो तिथून तसाच उठला. नळाला पाईप जोडला आणि झाडांना पाणी देऊ लागला. येणारे जाणारे त्याला विचारू लागले, अरे ,”तू तर द्वारपाल आहेस!” मग झाडाला पाणी द्यायचे कामही करतोस.”
तो म्हणाला, साहेब खरं सांगू, मला झाडाझुडपात राहायला आवडतं. ही झाडं आहेत म्हणून तर आपण जिवंत आहोत. आणि एक सांगू का साहेब, प्राणीपक्ष्यांची कत्तल करणारे काम करण्यापेक्षा हे काम करण्यास मला मनापासून आवडते. मी हे काम मनापासून करतो. बघा की साहेब, केव्हापासून या गवताच्या पात्याने टाकलेली मान कशी ताठ केलीये, पाणी मिळाल्यामुळे. आणि हे बघा, की त्या जास्वंदीच्या झाडावर किती सुंदर फूल फुलले आहे. या बागेतली फुले मनाला आनंद देऊन जातात. त्यांना माहीत असतं आपण संध्याकाळी कोमेजणार, तरीही दुसऱ्याच्या उपयोगी पडणं त्यांना आनंद देणं, हे काम न बोलता मोकाटपणे ही झाडेझुडपे करत असतात.
साहेब,”इथे बरं का मला ४० वर्षे झालीत, कामाला आहे. पण मला या कामाचा कधीच कंटाळा येत नाही. मी मनापासून आनंदाने हे काम करतो. आणि जे काम मनापासून करतो, स्वीकारतो त्या कामाचा आळस, कंटाळा केव्हाच येत नसतो.” पाहा...पहा...ना, बाजूला त्या इमारतीच बांधकाम चालू असल्याने पानांवर किती धूळ बसली आहे. झाडाला श्वास सुद्धा घेता येत नाही. त्यांचाही जीव घुस वाटत असेल ना!” आणि तिथे पाहिलात का, साहेब, भल्या मोठ्या जाळीचं कुंपण लावलं असतानाही काही झाडांच्या फांद्या जाळीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. जिथे सूर्यप्रकाश मिळेल त्या दिशेने. “खरं म्हणजे साहेब, या निसर्गाकडून आपल्याला खूप काही छान शिकता येत. या झाडांसोबत राहून माझ्या मनाला खूप प्रसन्न वाटतं.
श्यामरावांना त्या द्वारपालाचे कौतुक वाटले. कमी शिकलेला असला तरी त्याच्या मनाचा मोठेपणा त्याची वैचारिक पात्रता नक्कीच शिक्षित माणसालाही लाजवेल अशीच होती.
शामराव म्हणाले, अरे माझा रो हाऊस आहे. तिथे येतोस का कामाला! माझ्याकडे... नको... नको... साहेब... इथं मला चाळीस वर्षे झालीत. इथल्या प्रत्येक वस्तूची झाडाझुडपांशी माझे नाते निर्माण झाले. हात-पाय चालतील तोपर्यंत मला इथेच नोकरी करायची आहे. शामरावांना शेखरचे कौतुक वाटले. ते म्हणाले, अरे तुझ्यासारख्या सुपुत्राला पाहून भारत मातेलाही धन्यवाद वाटेल. कारण आजकाल अशी, निष्ठा, आपलेपणा आणि समर्पण दिसून येत नाही.






