- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे
आपल्या आसपास चार माणसे अशी, चार माणसे तशी आपण नेहमी पाहतच असतो. प्रत्येक माणसाचं एक वेगळं वेगळं काही वैशिष्ट्य असतं. गुण असतात. दोष असतात. अशा काही दोषांवर आपण आज नजर टाकणार आहोत. पहिला दुर्गुण आहे अहंकार. काही लोक अहंकारामुळे आपल्या आयुष्यातले मौल्यवान नातं गमावून बसतात. आणि काहीजण नाती वाचवत-वाचवत स्वतःची किंमत हरवून टाकतात.
नातं टिकवायचं असेल तर दोघांनाही एकमेकांची किंमत ओळखावी लागते. फक्त एकानेच समजूतदारपणाने वागून चालत नाही, आणि फक्त एकाचा अहंकार चालू दिला, तर नातं तुटायला वेळ लागत नाही. काहींना आपल्या रूपाचा, पैशाचा किंवा प्रतिष्ठित पदाचा खूप मोठा गर्व असतो. पण गर्व करून काहीच उपयोग नाही. आपण येताना बरोबर काही आणत नाही आणि जाताना बरोबर काहीही घेऊन जात नाही.
राहता राहिली गोष्ट संगतीची. आपल्या संगतीत असलेली सोबतची माणसं. आपल्याला आपल्या रंगरूप, पैसा, परिस्थितीने हलकं मानत असतील! तर त्यांची साथ तेव्हाच सोडा!! आपल्याला दुर्लक्षित करत असतील आणि स्वतःला खूप शहाणे, अति शहाणे समजत असतील तर त्यांची संगत तेव्हा लगेच सोडा. जिथे आपला सन्मान होतो. तिथेच सन्मानानं राहायचं. नाती टिकवण्याच्या ओघात स्वतःचा बळी द्यायचा नाही. कोणाची लाचारी पत्करायची नाही. मग तिथे प्रेम असू किंवा कोणतेही नाते असो. काहींना दुसऱ्याला झुकवण्यामध्ये अतिशय आनंद मिळतो.
दुसरा दुर्गुण आहे राग. मानवाचा दानव करतो तो राग. अति राग भीक माग अशी अवस्था होते त्या माणसाची. एखाद्या माणसाला राग येत असेल तर त्यांनी ध्यानधारणा करावी, विपश्यनाला जावे, मेडिटेशन करावे, चांगल्या छंदात प्रतिभेमध्ये, कलेमध्ये आपल्याला वाहून घ्यावे. आपली सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि सृजनता या ठिकाणी आपली शक्ती कामी लावावी. स्वतःचा स्वभावदोष ओळखून आत्मपरीक्षण करावे. आपल्यामुळे कुणाला नाहक मनस्ताप, मानहानी, अपमान घडू नये. याची दक्षता घ्यावी. शंभर चांगले गुण असतील, पण एका रागामुळे एका सेकंदात सगळ्याची होळी होते. असा राग काय कामाचा? राग शांत झाल्यावर कळतं की आपल्याला नुकसान किती झाले आहे ! आणि न भरून येणारं नुकसान झालं की आयुष्यभर पश्चातापाशिवाय पदरी काही पडत नाही. यावर उपाय नंबर एक उलटी गिनती सुरू करायची दहा ते एकपर्यंत. दाताखाली जीभ चावायची. इष्ट देवतेचे नामस्मरण सुरू करायचे. समोरच्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी चांगले केले असेल ती गोष्ट आठवायची जाणीव ठेवायची आणि सगळ्यात लास्ट अँड बेस्ट आपण माणूस आहोत मानव आहोत दानव नाही. कोणाशीही भांडणतंटा, खोडी, घालूनपाडून बोलणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, अवहेलना करणे हे करण्यापूर्वी त्याने आपल्यासाठी काहीतरी केले असेल, त्याच्याशी काहीतरी नाते असेल ते विसरून चालेल का. ज्याप्रमाणे शेतामध्ये तृण वाढते तसे मनामध्ये विष वाढले की राग येतो. शेतातले तन आणि मनातला ताण यांचा निचरा करायचा. एखाद्याचा राग विनाकारण दुसऱ्यावर काढू नका. आपल्या परिस्थितीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आपणच तो राग शांतपणे गिळून घ्यायचा. हे ज्याला जमलं त्याला जीवन जगता आलं.
तिसरा दुर्गुण मिथ्या खोटे बोलणे... कोणत्याही गोष्टीवरून वादविवाद टाळावा. आपले दुर्गुण लपवण्यासाठी कोणाशी खोटे बोलू नये. लांडीलबाडी, चोरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचारी किंवा अन्य फसवणूक. कोणाचा शारीरिक, मानसिक छळ असा कोणताही दुर्गुण लपवण्यासाठी खोटं बोललं जातं. हे अतिशय मोठं पाप आहे. आपल्या लहानपणी शाळेच्या फलकावर लिहिलेले असायचे नेहमी खरे बोलावे. आपल्या मनावर कायम ते कोरले गेले पाहिजे. बालपणीचे संस्कार असतात. हळूहळू माणूस विसरतो. आपल्याच धुंदीमध्ये बेभान होऊन माणूसपणाही विसरून जातो. तेव्हा हरिपाठ, गीताई, मनाचे श्लोक वा अन्य कोणतेही स्तोत्र वाचावे. कधीच खोटे बोलू नये. कारण म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा. आळस पुढील दुर्गुण आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळसे कार्यभाग नासे. उद्योगी माणसाच्या पाई नेहमी लक्ष्मी वसते. पण आळशी माणसाच्या बाबतीत ती ढुंकूनही बघत नाही. योग्य वयात काबाडकष्ट करून मिळवलेल्या स्व मिळकतीवर वेगळाच रुबाब आणि आनंद असतो. तेच कामधंदा न करता ऐशोराम, चैनी, लोभी, निष्क्रिय जगणे म्हणजे जगणे नाही. व्यक्तीला ध्येय नाही तर यासारखे दुर्दैव नाही. कोणी म्हटलेच आहे, आराम हराम है. शरीराला त्या त्या वयामध्ये हालचाल महत्त्वाची आहे. आता घाम गाळला तर नंतर अश्रू गाळण्याची वेळ येणार नाही. म्हणून करू तितकं थोडं असं म्हणत करत राहा. कामात बदल हीच खरी विश्रांती असे लोकमान्य टिळक म्हणत.
आज आपण बरेच मानवी स्वभावातील छटा आणि दुर्गुण पाहिले. असेच आपण पुढील लेखात पाहणार आहोत. (क्रमशः)






