- संस्कृती; विभा मसुरकर
रात्रीचे १० वाजले होते. मुंबईच्या एका आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत उभा राहून विजय आपल्या महागड्या ‘स्मार्ट वॉच’कडे पाहत होता. घड्याळाच्या स्क्रीनवर लाल रंगात फ्लॅश होत होतं- Stress Levels: High. Please take a deep breath. विजयने एक सुस्कारा सोडला. महिन्याला लाखो रुपये देणारी कॉर्पोरेट नोकरी, फाईव्ह स्टार जिमचं सबस्क्रिप्शन आणि वजनानुसार मोजूनमापून खाल्लेला सॅलडचा आहार... तरीही स्ट्रेस लेवल हाय? त्याच्या मनातली अस्वस्थता कमी होत नव्हती. त्यातच उद्या त्याला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. सकाळी गडबडीतच त्याने ऑफिस गाठलं. “ सर, मीटिंगसाठी क्लायंट वाट पाहत आहेत. तुमच्या प्रेझेंटेशनची तयारी…”
असिस्टंटच्या या वाक्याने विजयच्या डोक्याची नस सणकली. अचानक त्याच्या छातीत एक तीव्र कळ आली. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि टेबलवर ठेवलेली बीपीची गोळी पाण्याचा घोट घेत गिळली. वयाच्या अवघ्या चाळिशीत रोज गोळ्या खाण्याची वेळ येईल, अशी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. तो विचार करू लागला, ‘मी उत्तम डाएट करतोय, रोज जिमला जातोय, मग माझं शरीर मला साथ का देत नाहीये?’
डॉक्टरांनी त्याला सक्त ताकीद दिली - “विजय, काही दिवस कामातून ब्रेक घ्या. हा सततचा मानसिक ताण तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.” मागचापुढचा विचार न करता त्याने गाडी काढली आणि थेट गावचा रस्ता पकडला.
त्याचा मित्र आनंद... ज्याने शहरातील लाखो रुपयांची नोकरी सोडून गावीच राहायचा निर्णय घेतला होता…. त्या आनंदकडे तो निघाला होता. दोन बालमित्र, दोन वेगळी आयुष्य आणि जगण्याचे दोन टोकाचे रस्ते.
दोघेही एकाच वयाचे, एकाच गावात लहानाचे मोठे झालेले. पण चाळिशीनंतर दोघांच्या जगण्याच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक पडलेला. विजय हा आधुनिक, यशस्वी पण सतत तणावात राहणारा ‘ओव्हर ऑप्टिमायझर’ आहे, तर आनंद हा निसर्गाच्या जवळ, स्वतःशी प्रामाणिक राहून जगणारा माणूस आहे. शहरातली धावपळ सोडून त्याने शहराच्या कडेला एक छोटं बागकामाचं दुकान सुरू केलंय. त्याला झाडांमध्ये आणि मातीमध्ये रमायला आवडतं. विजय गावी पोहोचला.
आनंद अंगणातील खाटेवर पहुडला होता. विजय जवळ जाऊन पोहोचला तरी त्याचा त्याकडे लक्ष नव्हता. आकाशातील चांदण्या मोजत असावा बहुतेक... चेहऱ्यावर होते तेच नेहमीचे निवांत हसू! विजयने हळुवार आवाजात हाक मारली. “अरे आनंद, मी आलोय रे.” आनंद एकदम गडबडून कॉटवरून उठला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की त्याचा परमप्रिय मित्र विजय समोर उभा होता. “अरे विजय, तू आणि इथे ?” त्याने विजयला घट्ट आलिंगन दिले. त्याची ऊबदार मिठी विजयच्या मनाला स्पर्श करून गेली. “चल, हातपाय धुवून घे. तुझ्या वहिनीचा स्वयंपाक तयार झाला असेलच. अरे आधी कल्पना तरी द्यायची होती. तुझ्यासाठी चांगला गोडधोडाचा स्वयंपाक केला असता तिने. आता जे आहे ते गोड मानून घे.” आनंदच्या घरी जेवताना विजयने घाबरतच विचारलं, “आनंद, तू जेवताना एवढं तूप-भात खातोस? यात किती कॅलरीज आहेत माहितीये? कोलेस्टेरॉल वाढेल! तुझी फिट राहण्याची काही स्ट्रॅटेजी आहे की नाही?”
आनंद मनमोकळा हसला, “विजय, आरोग्याचा अतिविचार करणं ही एक शिक्षा आहे. मी अन्नाचा आनंद घेतो, टेन्शन नाही. आणि माझी जिम? ही समोर दिसणारी बाग हीच माझी जिम आहे. दिवसभर चालणं, वाकणं, रोपं लावणं ही माझी नैसर्गिक हालचाल आहे. त्यासाठी मला वेगळा व्यायाम करावा लागत नाही.” रात्रीच्या जेवणानंतर आनंद आणि विजय अंगणात बसले होते. विजय अतिशय अस्वस्थ होता आणि आनंद एकदम शांत. “तुला माहिताय आनंद, कधीकधी सकाळी उठून ऑफिसला जावंसंही वाटत नाही रे. त्या कॉर्पोरेट जगतात रोज मुखवटा लावून वावरावं लागतं. पण काय करणार? एवढा मोठा पगार, स्टेटस... कसं सोडणार? आता मेहनत घेतली तर साठीनंतरचे आयुष्य आरामात जाईल ना.” आनंद विजयच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाला, विजय, एका गोष्टीचं उत्तर दे. ही नोकरी तुझा श्वास वाढवतेय की कमी करतेय? सतत डाएट फूड खाणे, कॅलरीज मोजणे, महागड्या जिममध्ये जाणे आणि स्मार्ट वॉचवर सतत स्वतःचे स्ट्रेस लेव्हल्स आणि हार्ट रेट चेक करणे यातच तुझा दिवस जातो. आपण विचार करतो की रिटायर झाल्यावर जगू. पण मानसिक ताण देऊन तुझ्या शरीराला रोज थोडं थोडं मारतोयस तू. जेव्हा रिटायरमेंट येईल, तेव्हा शरीरच शिल्लक नसेल तर त्या करोडोंच्या बँक बॅलन्सचा काय उपयोग? “पण मग मी स्वतःशीच खोटं बोलतोय असं तुला वाटतं का आनंद?”
“हो मित्रा.” विजय तुला आठवतेय, रॉबिन शर्मा यांची A monk who left his Ferrari ही लोकप्रिय कादंबरी आपण दोघांनीही वाचली होती. त्यातील Master your mind आणि Embrace the present या संकल्पना तुला खूप आवडल्या होत्या. त्यावर तू आम्हां मित्रांना लेक्चर पण दिलं होतं. ते सर्व स्वतः आचरणात आणायचे तू विसरतोयस असं नाही वाटत का तुला? तू आतून काही वेगळाच आहेस आणि जगाला काही वेगळंच दाखवतोस. तू नावडती नोकरी पैशासाठी करतोयस, स्वतःच्या मनाशी खोटं जगतोयस. तुझा हा क्रॉनिक स्ट्रेस... सततचा ताण तुला आतून संपवतोय. बरं आता शांत झोप. उद्या बोलू. जास्त विचार करू नको. सकाळी लवकर उठून माझ्या बागेत नेतो तुला.” विजय शांत झाला. त्याने रात्री बेडवर पडल्या पडल्या विचार केला, ‘मी जिममध्ये तासनतास घालवतो, मोजून जेवतो, तरीही माझं आयुष्य तणावाखाली आहे. आणि हा आनंद... किती शांत आहे तो!”
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून ते दोघं आनंदच्या बागेकडे निघालो. वाटेत एक साधारण पंचायशीच्या घरातले गृहस्थ भेटले. ते हातात पुस्तकं घेऊन कुठंतरी घाईघाईने निघाले होते. आनंदने त्यांना हाक दिली. “निघालात का नारायण काका. सध्या किती मुलं आहेत.” “सध्या तीस आहेत. दिवसागणिक पटसंख्या वाढतेय.” “ व्वा... उत्तम.
नारायण काका, हा माझा मित्र विजय. मुंबई हून आलाय. मोठ्या पदावर काम करतो तिथे. खूप हुशार आहे. आपली बाग दाखवायला निघालोय. तुम्ही निघा काका. मुलं वाट पाहत असतील तुमची. आणि विजय, हे आमचे नारायण काका. पंचायशीच्या वयातही मुलांना शिकवतात आणि तेही मोफत.” “अरे वा! पण काका तुम्ही वयाच्या या टप्प्यावर विश्रांती घेतली पाहिजे. तुम्हाला थकवा नाही का येतं. ” “अरे थकवा कशाला येईल? हे तर माझे टॉनिक आहे. मुलांना माझे शिकवणे आवडते. माझी वाट पाहत असतात ही मुलं. अरे बाबा, थकवा तर तेव्हा येतो जेव्हा माणसाला वाटतं की त्याचं काम संपलं. या मुलांना माझी गरज आहे याची जाणीवच मला रोज नव्याने जगायचा उत्साह देतं. माझ्या जगण्याचं कारण मिळतं मला. ‘माझी कोणाला तरी गरज आहे ‘ही भावनाच मला रोज सकाळी अंथरुणातून ताजतवानं उठवते.” “पाहिलंस विजय? काकांकडे जगण्याचा एक स्पष्ट उद्देश आहे, ज्याला जपानी लोक ‘इकिगाई’ म्हणतात. तू ५० जणांचे ग्रुप्स सांभाळतोस, पण तुझ्या एका आवाजावर धावून येईल असा एकही माणूस तुझ्या शेजारी नाही. सोशल मीडियावर तुझ्याकडे हजारो लोक असतील, पण रात्री मन मोकळं करायला तुझ्याकडे एकही खरा माणूस नाही.
हा एकटेपणा माणसाला आतून पोखरतो. ‘माझी कोणाला तरी गरज आहे’ ही भावना माणसाचं आयुष्य वाढवते. तुझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, पण सकाळी उठण्याचं असं कोणतं आत्मिक कारण तुझ्याकडे आहे का?” विजयकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. तो विचार करू लागला, ‘मी आजवर फक्त सुखाची साधनं गोळा करत राहिलो, पण सुख जगायचं मात्र विसरून गेलो.’ सकाळपासून गावात बरीच भटकंती झाल्यामुळे विजयला सपाटून भूक लागली होती. दुपारी आनंदकडे जेवणाचा मस्त बेत होता. जेवताना विजय सतत मोबाईलवर कॅलरीज चेक करत होता. आनंदच्या नजरेतून ते सुटले नाही. “ विजय, पहिल्यांदा तो मोबाईल बाजूला ठेव.
स्क्रीनमध्ये बघून जेवण्यापेक्षा पानातल्या अन्नाचा आनंद घे.” “अरे पण आनंद, वजन वाढेल ना! डाएट कंट्रोल केलं नाही तर कसं होईल?” “विजय, आरोग्याचा अतिविचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी फॅशन आणि सर्वात मोठी शिक्षा आहे. तू काय खातोस यापेक्षा, ते कशा मनःस्थितीत खातोस हे महत्त्वाचं आहे. तू सॅलड खातानाही टेन्शनमध्ये असतोस. मी ही सुखाची भाकरी देवाचे आभार मानून खातो. अन्नाचा आनंद घेणं ज्याला जमतं, त्याला कधी आजार होत नाहीत. निसर्गाने दिलेलं शरीर निसर्गाच्या नियमाने चालतं, तुझ्या घड्याळाच्या आकड्यांवर नाही.” “खरं आहे आनंद. मी एवढी काळजी घेतो तरी माझे वैद्यकीय रिपोर्ट चांगले नाही येत.”
“विजय, तू वरून स्वतःला कितीही फिट दाखवण्याचा प्रयत्न केलास, तरी तुझा हा आजार शरीराचा नाही, मनाचा आहे. तू स्वतःच्या मनाशी खोटं बोलत जगतोयस. तुला ती कॉर्पोरेट नोकरी, तिथलं राजकारण अजिबात आवडत नाही, तरीही तू पैशासाठी मनाविरुद्ध काम करतो आहेस. तू ‘नंतर’ जगण्याच्या आशेने ‘आज’चा बळी देतोयस. ” तिसऱ्या दिवशी विजयने निघण्याची तयारी सुरू केली. पण या तीन दिवसांत त्याच्यात एक सुप्त बदल झाला होता. त्याने त्याचं ‘स्मार्ट वॉच’ बॅगेत बंद करून ठेवलं होतं.
निघताना विजयने आनंदला घट्ट मिठी मारली, “आनंद, माझा मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट आहे. पण खरा श्रीमंत आणि सुखी तर तू निघालास! मी आजपासून ‘नंतर’ जगण्याचा विचार सोडून देणार आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहून ‘आज’ जगणार आहे.” आनंदने विजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “विजय, अजूनही वेळ गेलेली नाही. आयुष्य ‘नंतर’वर ढकलू नकोस. ‘रिटायर झाल्यावर जगू’ हा विचार सोड आणि आजपासून जगायला सुरुवात कर. स्वतःच्या मनाला जे पटतं तेच कर. माणसं जोड, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे... ताण घेणं थांबव. जास्त जगण्याचं रहस्य महागड्या जिममध्ये किंवा डाएट प्लॅन्समध्ये नाही, तर ते स्वतःशी प्रामाणिक राहण्यात, माणसं जोडण्यात आणि तणावमुक्त जगण्यात आहे.”
विजयने हसून होकार दिला. गाडीत बसताना त्याने मागे वळून पाहिलं. आनंद तिथेच उभा होता. लांबून येणाऱ्या एका लहान मुलाला हसून हाक मारत होता. आनंदच्या चेहऱ्यावरचं ते हसू सांगत होतं की, तो प्रत्येक क्षण आनंदाने जगत होता.
विजयने गाडी सुरू केली. आज त्याच्या छातीतली ती कळ गायब झाली होती आणि मनावरचं ओझंही हलकं झालं होतं. त्याने मोबाईल काढला आणि बऱ्याच वर्षांत फोन न केलेल्या एका जुन्या मित्राचा नंबर डायल केला... एका नवीन, तणावमुक्त आयुष्याची सुरुवात करण्यासाठी!






