Saturday, June 13, 2026

सामूहिक शेती गरजेची

सामूहिक शेती गरजेची

ग्रामीण भागातील वाढते स्थलांतर, शेतीकडे होणारे दुर्लक्ष आणि ओसाड पडणाऱ्या सुपीक जमिनी ही चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेतीचा मार्ग स्वीकारल्यास उत्पादन, उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी वाढू शकतात. सामूहिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून गावाच्या शाश्वत विकासाचा प्रभावी पाया ठरू शकते.

मी माझ्या आयनल गावच्या प्राथमिक शाळेत शिकत असताना पांडुरंग साटम, विजय साटम, दशरथ दहिबावकर आणि शांताराम दहिबावकर यांच्या जमिनीवर सामूहिक पद्धतीने भातशेती केली जात असे. त्या काळात गावातील लोक एकमेकांना सहकार्य करत शेतीची सर्व कामे मिळून करायचे. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके भात उत्पादन होत असे. मेहनतीमुळे तांदळाचे चार निर्मळ गोठे भरत आणि कुटुंबांची अन्नाची गरज सहज भागत असे. गावात एकोप्याचे वातावरण असल्याने शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होती. मात्र आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली दिसते. अनेक शेतजमिनींवर काजू व आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत, तर काही सुपीक जमीन ओसाड पडलेली दिसते. यामागे पावसाचा अनियमितपणा, मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर ही प्रमुख कारणे आहेत. अनेक कुटुंबे शहरांकडे वळल्याने गावातील घरे वर्षातील बहुतांश काळ बंद असतात.

परिणामी शेतीकडे दुर्लक्ष होत असून रानांची निगा राखली जात नाही. याचा परिणाम म्हणून माकडे, गवारेडे आणि बिबटे यांसारखे वन्यप्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. विशेषतः माकडांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही ठिकाणी बंद घरांची कौले काढून माकडे घरात वास्तव्य करत असल्याचे चित्र दिसते. या अडचणींमुळे अनेक शेतकरी शेती सोडून शहरात नोकरी करण्यास प्राधान्य देत आहेत. एकेकाळी हिरवेगार दिसणारे वाफे आणि सडे आज विद्रूप अवस्थेत दिसतात.

अशा परिस्थितीत गावाच्या विकासासाठी सामूहिक शेती हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. गावातील शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. सामूहिक शेतीमध्ये अनेक शेतकरी मिळून शेती करतात आणि उत्पादनाचे समप्रमाणात वाटप करतात किंवा जमीन मालकाला ठरलेला हिस्सा देऊन उर्वरित उत्पादन वाटून घेतात. आजही शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचते. मात्र सामूहिक शेतीमध्ये एकमेकांचा आधार मिळत असल्याने संकटांचा सामना करणे सोपे जाते. कामांची विभागणी झाल्याने श्रम कमी होतात, उत्पादन वाढते आणि नफा-तोट्यात सर्वांचा समान सहभाग राहतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा पद्धतीमुळे गावातील सामाजिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात. सामूहिक शेतीमुळे गावातील अल्प व मध्यमभूधारक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. याचा परिणाम त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने ते आपला विकास करू शकतात. जर गावातील शेतकऱ्यांचा एकत्रितरीत्या अभ्यास केल्यास आपल्या राज्यातील प्रत्येक गावात सामुहिक शेतीची गरज आहे.

सामुहिक शेतीमुळे शेतकऱ्यांना बळकटी येते. एकत्रित शेती केल्याने शेतीशी अनुसरून अवजारे, बी-बियाणे, खते व कीटकनाशके जास्त खरेदी केल्याने त्याच्या उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. हल्ली बैलजोडीने नांगरणी फार कमी प्रमाणात केली जाते. त्याच्याऐवजी ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते. म्हणजे सामूहिक शेती करीत असताना ट्रॅक्टरचा वापर केल्याने इतर खर्च कमी होतो. एकटा शेतकरी असल्याने नेहमीच त्याला पाण्याची समस्या जाणवत असते. सामूहिक शेती केल्याने ठिबक सिंचन, शेततळी, नदीला केटी बंधारा याच्या सहाय्याने पाणीपुरवठा करू शकतो. म्हणजे जल संसाधनांचा प्रभावीपणे वापर करू शकतो. एका शेतकऱ्याकडे सर्वच कौशल्य असतात असे नाही तेव्हा एकत्रित शेती केल्याने प्रत्येकाजवळ असलेल्या कौशल्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. तसेच एकजूट असल्याने कामाची श्रमविभागणी करू शकतात. जेव्हा सामूहिक शेती केली जाते तेव्हा त्या शेतमालाला चांगला भाव येतो. उत्पादित शेतमाल सरळ बाजारपेठेत नेला जातो.

त्यामुळे अधिक फायदा होतो. यामध्ये दलालांचे उच्चाटन होते. सामूहिक शेतीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धान्य प्रक्रिया, मालाची प्रतवारी व किंमत ठरविणे शक्य होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गावातील सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून संपूर्ण गावाचा शाश्वत विकास साधता येतो. यासाठी गावाच्या विकासासाठी सामूहिक शेती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे गावाची हरवलेली शान पुन्हा मिळवायची असेल तर सामूहिक शेतीचा मार्ग स्वीकारणे काळाची गरज आहे.

Comments
Add Comment