बाहुली

जीवनगंध : पूनम राणे


आज आठवड्याचा बाजार होता. रोजच्यापेक्षा रस्त्यावर येणाऱ्या गाड्या भरगच्च भरून येत होत्या. गावातील प्रत्येक जण मिळेल ती गाडी पकडून बाजारात चालले होते. आज बाजार भरगच्च भरला होता. महिन्याला लागणारे सामान घेण्यासाठी प्रत्येकाची धांदल उडाली होती. कांदे-बटाटे, नारळ, तूरडाळ, साखर, चहापावडर यांसारख्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केली होती.


छोटी अनिशा आपल्या आजोबांसोबत बाजारात आली होती. आज तिच्या शाळेला सुट्टी होती. महिन्याच्या बाजारासोबतच रंगीबेरंगी खेळण्याच्या गाड्यांची ही दुकाने जागोजागी थाटलेली होती. प्रत्येक जण आपल्या समोरील वस्तू संपवण्यासाठी पोटतिडिकीने ओरडत होता. ते सारे पाहून छोट्या अनिशाचे देहभान हरपले होते. तिची चिमुकली नजर इकडे तिकडे फिरत होती.


खेळणी विक्रेते लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत होते. कोणी फुग्यात हवा भरून उंच उंच उडवत होते. खेळणी पाहिजे, खेळणी पाहिजे, म्हणत काही छोटी मुले आपल्या पालकांसमोर आग्रह करत होती.


अनिशाला एक बाहुली फार आवडली होती. बाहुलीचे बोलके डोळे लक्ष वेधून घेत होते. ती बाहुली खूप सुंदर आणि आकर्षक होती. गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. तिच्या केसांचा पोनी बांधला होता. तिला किल्ली दिल्यानंतर ती उभी राहून दोन हाताने टाळ वाजवत होती आणि ऊर्जा संपताच टाळ वाजवणे बंद करत होती आणि खाली कोलमडून पडत होती.


अनिशाने आजोबांकडे हट्टच केला.मला हीच बाहुली पाहिजे. आजोबांनी बाहुली विक्रेत्याला बाहुलीची किंमत विचारली. बाहुलीची किंमत त्याने दोनशे रुपये सांगितली. आजोबांनी दोनशे रुपये देऊन ती टाळ वाजवणारी बाहुली विकत घेतली. बाहुली हातात मिळताच अनिशा खूप आनंदली. ती बाहुली पिशवीत न ठेवता आपल्या हातात घेऊनच अनिषा आजोबांचा हात धरून चालत होती. सतत आपल्या बाहुलीकडे पाहत होती. तिच्याशी बोलत होती.


इतर सामान खरेदी करून अनिशा आणि आजोबा घरी परतले. घरी येताच अनिशाने आपली बाहुली सर्वांना दाखवली. आजूबाजूची सारी मुले तिच्या सभोवती गोळा झाली. किल्ली देऊन तीच टाळ्या वाजवणे सगळेजण पाहत होते. प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुलला होता.


अनिशाने ही बाहुली जतन करून ठेवली होती. ती बाहुलीवर प्रचंड प्रेम करत होती. तिचे केस विंचरणे, रुमालाने तिचा चेहरा पुसणे. तिला नटवणे हे तिचे नित्याचे चालले होते. इतकेच नव्हे तर, तिला आपल्या बाजूला घेऊनच ती नेहमी झोपत असे. अनिशा नियमितपणे शाळेत जात होती. शाळेतून आल्यानंतर ती बाहुली सोबत खेळत होती.


आज अनिषाची परीक्षा होती. परीक्षा देऊन ती घरी येत असताना पाय घसरून पडली. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिचा पाय मुरगळला होता. एकुलती एक असल्याने घरातील प्रत्येकाचीच ती लाडकी होती. घरातील सर्वांनीच तिची विचारपूस केली. तेव्हा ती म्हणाली, ‘माझा पाय खूप दुखतो आहे त्यामुळे मी उद्या परीक्षेला शाळेत हजर राहू शकणार नाही’. यावर आजोबा म्हणाले, हरकत नाही, तुझ्या शिक्षकांना मी जाऊन भेटतो. आपण काहीतरी तोडगा काढू. खचून जाऊ नकोस.


असे म्हणत आजोबा बाहुली घेऊन अनिशाकडे आले आणि म्हणाले, ‘तुझी आवडती बाहुली बघ’, हिला आपण किल्ली दिल्यानंतर ती उभी राहून तिला मिळालेल्या ऊर्जेमुळे ती दोन्ही हाताने टाळ वाजवते. तसेच आहे, कोणत्याही प्रसंगी धीर सोडायचा नसतो. कोणतीही गोष्ट कठीण नसते. आजोबांनी प्रत्यक्ष उदाहरणातून ही गोष्ट पटवून दिल्याने अनिशाला तिने घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून चांगली समजली. चार-पाच दिवसांतच तिला चांगले चालता येऊ लागले. तिसरीत असल्याने राहिलेले पेपर तिने पुन्हा दिले. या परीक्षेला तिला चांगले गुण मिळाले, इतकेच नव्हे तर ती वर्गात सर्वप्रथम आली. घरी येऊन ती आजोबांच्या गळ्यात पडली.

Comments
Add Comment

सोमधाराचा सांगावा

पर्यावरण-मिलिंद बेंडाळे सोमधाराची शांतता आजही तशीच आहे; परंतु त्या शांततेत एक संदेश दडला आहे. निसर्ग आपल्याला

नात्याची हत्या

नोंद-भागा वरखडे   मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरण किंवा पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने मोठी

नर्मदा परिक्रमा

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे   भारतात गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती यांसारख्या अनेक पवित्र नद्या आहेत.

टाईमपास

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर   मागच्या मार्च महिन्यातली गोष्ट. सकाळी साडेनऊ दहाच्या सुमाराला मी कार घेऊन कामासाठी

व्यर्थ हा अमृताचा वसा...

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे   कोणताही कलाकार थोडाफार बंडखोर असतोच. जग ‘जसे आहे तसे’ त्याला मान्य नसते.

चला जाऊया पंढरी!

स्मृतीगंध-लता गुठे   आषाढी एकादशी जवळ आली की, महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांच्या मनात पंढरपूरची आस जागते.