टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता गायकवाड.
प्राजक्ता गायकवाडचे शालेय शिक्षण पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील शाळेत झाले. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धा, शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये तिचा सहभाग होता. एकांकिकेमध्ये, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तिने हिरीरीने भाग घेतला होता. अभ्यासात ती हुशार होती. अभ्यासासोबत तिचा सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग वाखाणण्याजोगा होता. कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवी तिने ग्रहण केली.
तू माझा सांगाती, नांदा सौख्य भरे, आई माझी काळूबाई, स्मार्ट सुनबाई, चेकमेट, फौजी, गुगल आय यामध्ये तिने काम केले होते. तिने दाक्षिणात्य चित्रपटामध्ये देखील कामे केली. तेथील तिचा अनुभव कायमस्वरूपी तिच्या स्मरणात राहिला. त्यानंतर तिच्या जीवनात ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका टर्निंग पॉइंटच्या रूपात आली. या मालिकेतील तिची येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या आज देखील लक्षात राहिलेली आहे. त्यावेळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या असे विचारले असता ती म्हणाली की लोक येऊन माझ्या पाया पडायचे. काही जण नव्या जन्मलेल्या बाळाला घेऊन माझ्याकडे यायच्या.
ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यामध्ये भिडेवाडा हे नाव विशेष नावाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड, मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलीची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्ज्वलित केला. त्यामुळे भिडेवाडा केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची व परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक भिडेवाडा आता रूपेरी पडद्यावर झळकला आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेल्या एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाली की सावित्रीबाईमुळे आजच्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत अग्रेसर आहेत. त्या काळी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आज स्त्रियांना सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. आज स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रांत आरक्षण जरी असले तरी स्त्रिया कर्तृत्वाने खूप पुढे गेलेल्या आहेत.
या चित्रपटातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारण्याअगोदर कशी तयारी केली असे विचारल्यावर ती म्हणाली की, सावित्रीबाईंचा पेहराव कसा असावा याबद्दल चर्चा केली, त्याप्रमाणे त्यांची साडी, कपाळावरील कुंकू, आभूषणे घातली गेली.
महात्मा जोतिबा फुले हे सावित्रीबाईपेक्षा वयाने मोठे होते, त्या दोघांमधील जिव्हाळ्याचे संबंध या चित्रपटात पाहायला मिळतील. जोतिबांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई मोठ्या धीराने उभ्या राहिल्या. त्यांचा दत्तक मुलगा यशवंतला त्यांनी कशा प्रकारे वाढविले, डॉक्टर बनविले हे सारे चित्रपटात पाहायला मिळेल. कोणत्याही स्त्रीला वाटते की आपले मूल असावे, त्यावेळी महात्मा जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना समजावले की आपण जी भिडेवाडा मध्ये शाळा सुरू केली आहे, तेथे येणारे विद्यार्थी हे आपलेच विद्यार्थी आहेत. महात्मा जोतिबा गेल्यानंतर सावित्रीबाईंना खूप संघर्ष करावा लागला, महामारीमध्ये त्या एकट्याच बाहेर पडल्या आणि लहान मुलांसाठी त्यांनी कार्य केले. ज्या सावित्रीबाईंच्या गोष्टी माहीत नाही त्या दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे. प्राजक्ताला या लहान वयात चांगल्या ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल ती स्वतःला नशीबवान मानते.