Sunday, April 26, 2026

कुपर रुग्णालयाला महापौरांची भेट, रुग्णांसह नातेवाईकांनी केली प्रश्नांची सरबती

कुपर रुग्णालयाला महापौरांची भेट, रुग्णांसह नातेवाईकांनी केली प्रश्नांची सरबती

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची ६ मार्च २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. मात्र, या पाहणीदरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील आरोग्य सेवा सुविधांबाबत तक्रारींचीच सरबती करत महापौरांनाच भंडावून सोडले. महापौरांनी या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात याचे निवारण आता कायमस्वरुपी होवून रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापौरांनी कुपर रुग्णालयात जावून पाहणी करतानाच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांबाबत माहिती घेतली. या पाहणीदरम्यान काही रुग्णांनी रुग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध नसल्यामुळे ती बाहेरून आणावी लागत असल्याची तक्रार मांडली. तसेच रुग्णालयातील एका ठिकाणी उद्वाहन (लिफ्ट) बंद असल्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र कार्यरत नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व बाबींची तत्काळ दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्ती करून सेवा सुरळीत करण्याचे सक्त निर्देश दिले.

तसेच, रक्तपेढी खासगीकरणामुळे रुग्णांना प्लेटलेट्ससह काही घटक बाहेरून आणावे लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत असल्याची बाबही या भेटीदरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मांडली. तसेच त्यांच्या अडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. या आणि इतर विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करुन सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनासोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे, असे महापौरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आश्वासित केले. त्यानंतर

रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, उपचार प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा आणि कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी महापौरांनी सविस्तर चर्चा केली. नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >