मुंबई : भारतभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी प्रतिष्ठित परिषद ISECTCON 2026 यंदा Mumbai येथे दिनांक २७–२८ फेब्रुवारी २०२६ रोजी Hotel Aurika Mumbai Skycity येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद Indian Society of Extra Corporeal Technology (ISECT) तर्फे आयोजित केली जात असून आधुनिक परफ्यूजन सायन्स आणि रुग्णसेवा सुधारणा यांवर सखोल चर्चा होणार आहे. या भव्य परिषदेचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेमध्ये देशभरातील नामांकित तज्ञ, आंतरराष्ट्रीय वक्ते, वैज्ञानिक सत्रे, ई-पोस्टर सादरीकरण, उद्योग प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असेल.
कोविड-१९ च्या कठीण काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असताना संजीवन शास्त्रज्ञ आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक भूमिका बजावली. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वसन, रक्ताभिसरण सहाय्य आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले त्यांचे योगदान आरोग्यसेवेतील समर्पण, कौशल्य आणि मानवी मूल्यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. लहान मुलांमधील जन्मजात हृदयविकार तसेच हृदय प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या उपचार प्रक्रियांमध्येही त्यांच्या अचूक कौशल्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे. परफ्यूजन विज्ञानातील नव्या संशोधनांना चालना देणे, आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणे आणि तज्ञांमधील ज्ञानविनिमय वाढवणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन रवींद्र शिवाजी सावर्डेकर (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), राजेंद्र कोकणे (अध्यक्ष), जगन्नाथ कालुगडे (उपाध्यक्ष), विकास माळी (चेअरमन), योगेश लुडबे (कोषाध्यक्ष), शशिकांत मेमाणे (सहसचिव) आणि रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली होत असून देशभरातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी ISECTCON 2026 ज्ञान, नवोपक्रम आणि व्यावसायिक सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.