Friday, May 15, 2026

अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम

अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम

मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपविण्यात आली आहेत. त्यानंतर मंत्रालयातील कार्यालयीन व्यवस्थेबाबत निर्णय घेण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७ मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे. ही सर्व दालने यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वापरात होती.

दरम्यान, मलबार हिल येथील ‘देवगिरी’ हा शासकीय बंगला देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून या बंगल्यात वास्तव्यास होते. आता नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही हाच बंगला अधिकृत निवासस्थान म्हणून देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment