दिवस-रात्र कसे होतात ?

सीता व नीता या दोघी बहिणी रोजच्यासारख्या सायंकाळी आपली शाळा आटोपल्यावर घरी आल्या. आपला अभ्यास उरकून घेतला. त्या त्यांच्या मावशीजवळ प्रश्न विचारण्यासाठी जाऊन बसल्या.
“मावशी सकाळी सूर्य उगवण्याआधी आपण झुंजूमुंजू झाले असे म्हणतो. ते कसे असते?” सीताने शंका विचारली.


“संधिप्रकाशासारखीच प्रक्रिया सकाळी सूर्योदयापूर्वीही होत असते. संधिप्रकाशासारखाच प्रकाश आपणास रात्रीचा अंधार संपल्यानंतर सकाळी पूर्व दिशेस सूर्योदयाच्या आधी दिसतो. त्यालाच ‘झुंजरूक’ किंवा ‘झुंजूमुंजू’ असे म्हणतात. सूर्य क्षितीजाखालून किंचितसा वर डोकावताच हा झुंजरूक सुरू हाेतो. सूर्य जसजसा वर येतो तसतसा हा झुंजरूक हळूहळू वाढत जातो, तसतसे तांबडे फुटते, हळूहळू दिवस उजाडू लागतो. शेवटी प्रत्यक्ष सूर्यच पूर्णपणे उगवतो नि चोहिकडे स्वच्छ उजेड पडतो. त्यालाच दिवस म्हणतात. आले ना आता लक्षात?” मावशीने प्रेमाने विचारले.



“होय मावशी! हे तर लक्षात आलं. आता संधिप्रकाशानंतर रात्र कशी होते हे सांगशील तर बरे होईल.” नीता म्हणाली.
“आणि मावशी! रात्रीनंतर दिवस कसा काय होतो गं? ते सुद्धा सांग आम्हाला.” सीताने नीताच्या प्रश्नात भर घातली.
“सांगते. तेही सांगते,” मावशी सांगू लागली, “आपली पृथ्वी ही स्वत:भोवती फिरताना सतत सूर्याभोवतीसुद्धा फिरत असते हे आताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेच आहे. लक्षात आहे ना?” मावशीने अंदाजे खडा टाकला.
“होय मावशी.” दोघीही म्हणाल्या.


“फारच छान!” मावशी म्हणाली, “तुम्ही दोघीही अभ्यासात्मक गोष्टी चांगल्या लक्षात ठेवता, ही आनंदाची बाब आहे. असे लक्षात ठेवत गेल्याने व वारंवार आठवून पाहत गेल्यानेच तर स्मरणशक्तीची चांगली वाढ होते.” मावशी पुढे सांगू लागली, “आपल्या पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जो कालावधी लागतो त्याला एक दिवस म्हणतात. त्याचेच आपण आपल्या सोयीसाठी चोवीस भाग केलेत व त्यांना आपण तास म्हणतो. म्हणजेच पृथ्वीला स्वत:भोवती एक गिरकी पूर्ण करण्यास २४ तास लागतात म्हणून एक दिवस हा २४ तासांचा असतो.”


“पण मावशी दिवस तर सहसा १२ तासांचाच तर असतो ना?” सीता विचारत पुढे बोलली, “आणि तू तर सांगते की दिवस हा २४ तासांचा असतो.”
“बरोबर आहे ते.” मावशी बोलली, “२४ तासांच्या दिवसाला खरे तर एक वार असे म्हणतात. त्यालाच अहोरात्र किंवा दिनरात्र अथवा रातदिन म्हणतात. सांगा बरे एकूण किती व कोणकोणते वार आहेत?” मावशीने प्रश्न केला.
“एकूण सात वार आहेत मावशी आणि ते म्हणजे...” सीता उत्तर देत असतानाच मध्येच नीता बोलत “रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार.” असे खडाखड आळीपाळीने दोघींनीही वारांची नावे सांगितली.
मावशी पुढे म्हणाली, “मानवाने त्याच्या सोयीसाठी या चोवीस तासांचे म्हणजे एका वाराचे दोन भाग केले आहेत. पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या ठिकाणी पूर्वेकडे सूर्य उगवल्यापासून म्हणजे एका सूर्योदयापासून तर तो परत त्याच ठिकाणी पुन्हा उगवेपर्यंतच्या म्हणजे दुस­ऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला एक वार म्हणतात. जोपर्यंत सूर्य आपणास दिसतो त्या काळाला दिवस म्हणतात. असा १२ तासांचा दिवस होतो. तसेच ज्यावेळी सूर्य दिसत नाही त्या काळाला रात्र म्हणतात. अशी १२ तासांची रात्र असते. म्हणूनच १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असे म्हणतात आणि एक दिवस व एक रात्र मिळून एक खरा दिवस किंवा वार होतो.”
“चला आजची चर्चा आपण जरा थांबवू. मला एक पुस्तक वाचायचे आहे.” मावशी बोलली.
“हो मावशी.” दोघीही म्हणाल्या व मावशीजवळून उठल्या.

Comments
Add Comment

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले

चोराच्या उलट्या बोंबा

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर घटना सांगते. एक अमेरिकन बाई पायऱ्या उतरत होती. पायऱ्या अतिशय

एका भुताची गोष्ट!

कथा-रमेश तांबे एक होतं भूत. त्याला रोज रोज स्मशानात राहायचा खूप कंटाळा आला होता. तो म्हणायचा, काय हे आमचे जीवन. या

योगायोग काय असतो पहा!

स्मृतीपटल-अनिल रा. तोरणे यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा बोलले जाते; परंतु

कृतघ्नता

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे केलेल्या उपकारांची जाण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता! उपकाराची फेड अपकाराने!! उपकार